मातंग समाजाचे पारंपारिक व्यवसाय धोक्यात


दोरखंडांचा परंपरागत व्यवसाय धोक्यात
मातंग समाजाचे पारंपारिक व्यवसाय धोक्यात 
केरसुणी,दोरखंड,वाजंत्री व्यवसायाला घरघर 
चाकण: नायलॉन व सुताच्या दोरखंडाच्या वाढत्या मागणीमुळे वाखापासून दोरखंड तयार करण्याचा मातंग समाजाचा परंपरागत व्यवसाय धोक्यात आला आहे. अनेक पारंपरिक लघुउद्योग धंद्यांपैकी ग्रामीण भागात चालणारा परंपरागत दोरखंड व्यवसाय आजच्या स्पर्धेच्या युगात आणि खुल्या अर्थव्यवस्थेला सामोरे जाताना जवळ जवळ बंद पडला आहे.औद्योगिकीकरणाने मातंग समाजाचा दोरखंड, शेतीची अवजारे व परंपरेचे गावगाडय़ाचे व्यवसाय संपुष्टात आले आहेत. वर्षभर शेतकर्‍यांना वाखापासून दोरखंड तयार करून पुरवायचे व त्याच्यावरच वर्षभराचे आर्थिक नियोजन करायचे असा या समाज बांधवांचा प्रयत्न गेल्या काही काळात प्लास्टीक व सुताच्या दोरखंडाच्या वाढत्या मागणीमुळे वाखापासून दोरखंड तयार करण्याचा मातंग समाजाचा परंपरागत व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे या समाजावर संकट ओढवले आहे. चाकण भागात या व्यवसायात सुरुवाती पासून असलेले बळवंत(अप्पा) खुडे यांनी या बाबत सांगितले की,पारंपारिक दोरखंड ,चऱ्हाट यांना गेल्या काही वर्षात मागणीच घटल्याने हा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली.त्यामुळे हा व्यवसाय गेल्या पाच वर्षांपासून बंद करण्यात आला असून अन्य व्यवसायावर उपजीविकेसाठी अवलंबून राहावे लागत आहे. पूर्वी वाख तयार करण्यासाठी घायपाताचा वापर केला जायचा.ओढय़ा नाल्याच्या कडेला असलेल्या झुडुपांतून घायपाताची पाले शोधून त्या पानांची उभी चिरफाड करून त्यानंतर त्यांच्या लहान-लहान पेंढय़ा बांधून व गावच्या आसपास असणार्‍या पाण्याच्या डबक्यात सुमारे चार ते पाच दिवस भिजत ठेवण्यात येत असत . पूर्ण भिजल्यावर सदरच्या पेंढय़ा वर काढून विशिष्ट पद्धतीने त्याला पीळ देऊन वाख तयार करून त्यांचे लहान मोठय़ा दोरखंडात रुपांतर केले जात असे.मात्र एवढे कष्ट करून देखील त्या मालाला उठाव मिळत नसल्याने हा व्यवसाय बंद करण्यात आला. नायलॉन (प्लास्टीक) व सुताच्या दोरखंडांना त्यांच्या रेखीव व टिकाऊपणामुळे मागणी वाढत आहे. एवढेच नव्हे तर बैलाच्या वेसणी, कंडे, मुसक्या हे साहित्यसुद्धा बाजारात तयार स्वरूपात मिळत असल्याने पारंपरिक दोरखंड व्यवसायाचे भवितव्य पूर्णत: संपुष्टात आले आहे .हाताचा तोंडाशी मेळ घालण्यासाठी आजही जे लोक हा व्यवसाय करतात. त्यांच्या पदरी काहीच पडत नसल्याचे चित्र आहे . सदरचा परंपरागत व्यवसाय बंद पडण्या अगोदर शासनाने या व्यवसायातला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी योग्य त्या बाबी उपलब्ध करून दिल्यास हा व्यवसाय जियंत ठेवता येईल , असा विश्‍वास या मातंग समाजातील बांधवाना वाटत आहे .समाजातील पुढारलेला हाताच्या बोटावर मोजण्या एवढा वर्ग सोडल्यास अनेक मंडळी आजही आपले पारंपारिक आयुष्य व्यतीत करीत आहे.मातंग समाजात कार्यरत असणाऱ्या संस्था संघटनांचे प्रतिनिधी संतोष खुडे,गुलाब पवार यांनी या बाबत सांगितले की, शासनाच्या दुटप्पी भूमिके मुळे समाजाला वतन नाही, जमीन नाही, पुनर्वसन नाही, शिक्षण नाही,रोजगाराची संधी नाही, उदरनिर्वाहाचे साधन नाही. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक शोषणातून समाज आजही फारसा मुक्त होऊ शकलेला नाही.अनेक समाज बांधव केरसुणी,दोरखंड,तयार करण्याच्या किंवा लग्न समारंभात वाजंत्री म्हणून काम करून उदार निर्वाह करीत होते.मात्र हे सर्वच पारंपारिक व्यवसाय कालबाह्य झाले आहेत.त्यामुळे हाताचा तोंडाशी मेळ घालण्यासाठी या समाज बांधवाना खूप कष्ट उपसावे लागत आहेत. ----------- फोटो : नायलॉन व सुताचे चऱ्हाट(दोरखंड) बैलाच्या वेसणी,मुसक्या हे साहित्य बाजारात असे तयार स्वरूपात मिळत असल्याने पारंपरिक दोरखंड व्यवसाय संपुष्टात आला आहे................अविनाश दुधवडे,चाकण..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)