वेगवान वाहत्या पाण्यात पोहणे धोक्याची घंटा
22 तासांनी मिळाला भामा नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह
बुडून होणारे अपघात वाढताहेत
चाकण:
भामा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेला गोविंद अशोक पुनवटकर हा 21 वर्षांचा युवक वाकी बुद्रुक (ता.खेड) हद्दीत बंधाऱ्याजवळ सोमवारी(दि.15) दुपारी चार वाजनेचे सुमारास बुडाला . त्याचा मृतदेह आज (दि.16) दुपारी दोनचे सुमारास म्हणजे तब्बल बावीस तासांनी एनडीआरएफच्या जवानांना मिळाला . उन्हाळ्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर होणारे हे अपघात आणि भामा-आसखेड धरणांतून उजनी धरणात सोडण्यात येत असलेले एक हजारा क्युसेक प्रतिसेकंद इतके वेगवान पाणी यंदाच्या उन्हाळ्यात पोहणाऱ्या मंडळींसाठी धोक्याची घंटा आहे.
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर पुणे जिल्ह्यातील भामा-आसखेड धरणांतून उजनी धरणात चार अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यात येत आहे.
या वाहत्या पाण्यात पोहणे धोकादायकच आहे. परीक्षा संपून सुट्ट्या लागल्याने मुलांच्या आग्रहास्तव व पोहणे हा सर्वांत उत्तम व्यायाम मानण्यात येत असल्याने पोहण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र वाहत्या पाण्याचा वेग व संभाव्य दुर्घटनांकडे सर्वांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
वेगाने वाहत्या पाण्यात पोहणे धोकादायक असतानाही कडकडीत उन्हाच्या पार्श्वभूमीवर नद्यांमध्ये पोहणाऱ्यांची संख्या सुट्ट्यांचा काळ असल्याने वाढत आहे. सध्या उजनीत सोडण्यात आलेल्या पाण्याने एक हजारा पेक्षा अधिक क्युसेक प्रतिसेकंद वेगाने वाहणाऱ्या पाण्यातही शाळकरी मुले पोहताना चाकण भागात दिसतात ,आणि याकडे पालकही पूर्णपणे दुर्लक्ष करतात. ही बाब अतिशय दुदैवी आहे.पाण्याचा वेग इतका अधिक असतानाही जीव धोक्यात घालणाच्या प्रकारांमुळेच बुडून होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तत्काळ मदतीची सोय नसल्याने व वाहत्या पाण्यात जाण्याचे धाडस अग्निशमनदल व पण बुड्यांकडून दाखविले जात नसल्याने बुडालेला मृतदेह वर येण्याचीच अनेकदा वाट पहावी लागते. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की, पोहताना होणारे अपघातांचे प्रमाण वाढते हा प्रत्येक वर्षीचा अनुभव आहे.यंदा मात्र उजनी कडे निघालेले वेगवान वाहते पाणी धोकादायक असेच असून सर्वांनीच योग्य ती दक्षता घेण्याची गरज आहे.
पोहण्यासाठी स्वीमिंग पूलच नसल्याने....
चाकण सारख्या भागाचा मोठ्या विस्तार झालेला असताना अद्याप या भागात सार्वजनिक स्वीमिंग पूल नसल्यामुळे मुलांना नद्या,विहीर,व बंधारे या ठिकाणी पोहण्याचा ,पोहण्यास शिकण्याचा अंड घ्यावा लागत आहे.यातील गंभीर धोका व परिणामांची माहीत असूनही सोयच नसल्याने पालक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे.जोरदार वाहत्या पाण्याच्या प्रवाहामुळे कितीही चांगले पोहता येत असले, तरी दमछाक होण्याची मोठी भीती असते.खोल पाण्याच्या ठिकाणी अशी दमछाक झाल्यास बुडण्याचा सर्वाधिक धोका असतो ,असे शेकडो प्रकार आज वर या भागात घडले आहेत.
...तर कळवा एनडीआरएफला :
नॅशनल डिझास्टर रिस्पोन्स फोर्सच्या पथकाने (एनडीआरएफ) अर्थात राष्ट्रीय आपत्ती मोचन बल यांना अशा आपत्कालीन वेळी कळविल्यास तातडीने मदत मिळू शकते. भामा नदीवरील घडलेल्या घटनेत दुसर्या दिवशी म्हणजे आज (दि.16) माहिती मिळाल्या नंतर एनडीआरएफ च्या 45 जवानांनी अवघ्या अर्ध्या तासात गोविंद पुनवटकर याचा मृतदेह शोधण्यात यश मिळविले. या जवानांना यासाठीचे खास प्रशिक्षण समुद्रात देण्यात आलेले असते, असे एनडीआरएफचे (तळेगाव दाभाडे) डेप्युटी कमांडन्ट इथापे व डॉ. डी.एस.आमले यांनी सांगितले. (0214- 231509) या क्रमांकावर संपर्क साधूनही मदत मिळविता येते केवळ माहिती सत्य मिळावी असेही त्यांनी सांगितले.
-------- अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा