महिलेचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला


महिलेचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला 
खेड तालुक्यातील साबळेवाडी येथील घटना चाकण:अविनाश दुधवडे साबळेवाडी (ता. खेड ) येथे अंदाजे 50 ते 55 वर्षीय अनोळखी महिलेची गावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या कठड्यावर धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करून मृतदेह पाण्यात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. आज(दि.21) सकाळी दहा वाजता मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. या आणखी एका धक्कादायक खून प्रकरणाने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह जवळपासच्या भागातील महिलेचा असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. याबाबत चाकण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार या घटनेची माहिती साबळेवाडी येथील सुरेश हरिभाऊ शेटे यांनी चाकण पोलिसांना दिली. चाकण पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता या अनोळखी महिलेचा महिलेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत विहिरीच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. या विहिरीच्या कठड्या पासून खाली ओघळत गेलेल्या रक्ताच्या डागांमुळे खून येथेच करण्यात आल्याचे स्पष्ट होत असून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी याच विहिरीत फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला आहे . या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुशील कदम ,पोलिस उपनिरीक्षक मधुकर थोरात, एस.पी.येडे, कुमार कदम, आदींसह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन , उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटविण्याच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. आसपासच्या पोलिस ठण्यात गेल्या पाच-सहा दिवसात या वर्णनाची महिला बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे का, याचा तपास सुरू केला आहे. साबळेवाडी व आसपासच्या गावातील लोकांना याची माहिती देऊन मृतदेहाची ओळख पटते का, या दृष्टीनेही तपास सुरू आहे. सव्वा महिन्यातला तिसरा निर्घुण खून: चाकण परिसरासह खेड तालुक्याच्या काही भागांत गेल्या काही काळात निर्घुण पणे एकमेकांचे गळे घोटण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. एकमेकांना कंठस्नान घालण्यासाठी कोयत्यांसारखी धारदार हत्यारे सर्रास वापरात येवू लागली आहेत. मागील महिन्यात (14 मार्च)जमिनीच्या वादाच्या कारणावरून कोरेगाव खुर्द (ता.खेड) येथील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष दतात्रेय घनवट यांचा तलवारी आणि कोयत्यांनी सपासप वार करून निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर महिना भरात पोलीस पाटलाच्या मुलगा धनंजय वसंत आवटे (वय 38,रा.कुरकुंडी,ता. खेड) यांचा पिस्तुलातून गोळी झाडून व कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार कुरकुंडी (ता.खेड)येथे शनिवारी (दि.13 एप्रिल ) सकाळी नऊ वाजनेचे सुमारास घडला. या सलग घडलेल्या दुसऱ्या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडालेली असताना आज (दि.21) निर्घुण पद्धतीने गळा कापून पाण्यात फेकलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. चाकण पोलीस सुपारी देवून घडवून आणलेल्या कोरेगाव आणि कुरकुंडी खून प्रकरणातील सोकावलेल्या सुपारी किलर्सचा कसून शोध घेत असताना साबळेवाडीत उघडकीस आलेल्या तिसऱ्या थरारक घटनेने पोलिसांचीही झोप उडाली आहे. ---------------- फोटो मेल करीत आहे. फोटो ओळ: साबळेवाडी (ता. खेड) येथील याच सार्वजनिक विहिरीच्या काठावर महिलेचा गळा चीरल्याचे रक्ताच्या ओघळामूळे स्पष्ट होत आहे. .............Avinash Dudhawade,chakan 9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)