वैदू समाजातील महिलांच्या पारंपारिक व्यवसायाला घरघर
वैदू समाजातील महिलांच्या पारंपारिक व्यवसायाला घरघर
सुई, बिबे, चाप, फण्यांची मागणी अत्यल्प
चाकण:
अत्याधुनिक सुविधांच्या जमान्यात सुया-पोती, बिबे, चाप, फण्या यांना फारशी मागणी राहिलेली नाही. वैदू समाजातील महिलांना आता या व्यवसायातून फारसे उपन्न मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वैदू समाजातील महिला भगिनींचा हा परंपरागत व्यवसाय धोक्यात आला असून त्यावर प्रापंचिक उदरनिर्वाह चालविणे अवघड होत आहे. अनेक पारंपरिक लघुउद्योग धंद्यांपैकी ग्रामीण भागात हा वैदू समाजाचा चालणारा परंपरागत व्यवसाय स्पर्धेच्या युगात आणि यांत्रिकीकरणाला सामोरे जाताना धोक्यात आला आहे.
एके काळी पाळण्यातच असताना आयुष्याचा जोडीदार शोधून समजउमज येण्याआधीच त्यांच्या जीवनात लग्नघटिका येत असे. हातातील खेळण्याकडे पाहत खेळण्या बागडण्याच्या वयातच लग्नाच्या अक्षता डोक्यावरदेखील पडत असत. पूर्वी हा समाज जडी-बुटी विक्री करून उदरनिर्वाह करायचा. मात्र, आधुनिक उपचारपद्धतींमुळे हा व्यवसाय लयाला गेला. मात्र, आता अज्ञानाने गुरफटलेला वैदू समाज काही प्रमाणात अज्ञानाची कात टाकत असला तरी बहुसंख्य समाज आजही दारोदारी फिरून किंवा आठवडे बाजारांमध्ये .सुई, बिबे, चाप, फण्या,पोतीआदी वस्तू विकण्याचे काम करताना पहावयास मिळतो. कुठेही शेतीसाठी जमीन नसलेल्या या समाजातील पुरुष मिळेल ती कष्टाची कामे करतात तर स्त्रिया सुई, बिबे,अशा वस्तू विकून प्रापंचिक उदरनिर्वाह करतात. या वस्तूंना आता फारशी मागणी राहिली नसल्याचे अशा वस्तूंच्या विक्रेत्या शांताबाई यांनी सांगितले.‘आज इथे, तर उद्या तिथे’ असे विंचवाच्या पाठीवरील या समाजाचे बिर्हााड. स्थलांतर करीत पिढय़ान् पिढय़ा शिक्षणापासून हा समाज वंचित राहिला.चाकण पंचक्रोशीतील वाड्यावस्त्या वरील समाज आता यास अपवाद ठरून स्थायिक झाला असला व समाजातील महिला पारंपारिक व्यवसाया व्यतिरिक्त भाजीविक्री, तांब्या पितळेच्या वस्तू , बेन्टेक्स सारख्या धातूंचे दागिने विक्री , वैगरे व्यवसाय करून कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असल्या तरी तुलनेने समाजात शिक्षणाचे प्रामाण कमीच राहिले आहे. पारंपारिक व्यवसाया व्यतिरिक्त शहरी भागात जावून अन्य व्यवसाय उद्योग धंद्यांमध्ये असणारी अत्यल्प मंडळी सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली असली तरी पारंपारिक आयुष्य व्यतीत करणाऱ्या व याच व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे,त्यामुळे हाताचा तोंडाशी मेळ घालताना त्यांना उपसावे लागणारे कष्ट कितीतरी पट अधिक आहेत. दुर्गम - ग्रामीण भागात पिछाडीस पडलेल्या या समाजाला समानतेचा स्तर प्राप्त होऊन त्या समाजाची उन्नती व्हावी यासाठी समाजाच्या अनेक संघटना प्रयत्नशील असल्या तरी 28 भटक्या् जातीं पैकी एक मानला जाणारा समाज राज्यभर विखुरलेला असल्याने शासन दरबारी समाजाच्या समस्यांची दखलच घेतली जात नसल्याची खंतही व्यक्त होत आहे.
-------------------
अविनाश दुधवडे,चाकण 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा