चाकण मागोवा २०१३
चाकण मागोवा २०१३
चाकण :
जागतिक दर्जाच्या अनेक मोठ्या उद्यागांनी येथे गुंतवणूक करण्याच्या घोषणा केल्या असल्याने अमेरीकेतील डेट्रॉईट शी होणारी चाकण च्या वाहन उद्योगची तुलना सरत्या २०१३ वर्षात सार्थ ठरली खरी मात्र अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे शिरपेचात मानाचे तुरे लावणारे हे वर्ष मोठ्या औद्योगिक मंदीने चाकण या वाहन उद्योगाच्या पंढरीचे चाक अडखळविणारेही ठरले. त्यातच ठिकठिकाणी टोकाला पोहचलेले वादंग व त्यातून घडलेले खून आणि दंगे धोपे, तलवार हल्ले , खुनाचे प्रयत्न ,चोर दरोडेखोरांकडून झालेल्या जबरी चोऱ्या ,घरफोड्या ,सक्रीय झालेले वाहन चोरटे,बेदरकार वाहन चालकांमुळे झालेले अपघात ,बेपत्ता व आत्महत्यांचा कायम असलेला सिलसिला,अवैध दारू धंदे, जमिनीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर सुरु झालेले गोलमाल,एक वेळच्या पाण्यासाठी महिलांना करावा लागणारा संघर्ष, संपूर्ण वर्षभर नगरपालिकेचा प्रलंबित पडलेला प्रश्न, नागरी सुविधांचा आभाव, अशा एकमेकांशी संबंधित असंख्य समस्यांनी व शासन व राज्यकर्त्यांकडून सोईने याभागातील समस्यांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे चाकण करांना सालाबाद प्रमाणे यंदाही अक्षरश भंडावून सोडले.त्यामुळे सरते वर्ष या असंख्य समस्या जणू अश्वथाम्याच्या वेदनेने भळभळत्या जखमे सारखे होऊन चाकण करांसाठी अशुभ गेले असेच म्हणावे लागेल.
आध्यात्मिक ,सांस्कृतिक, कार्यक्रमांमधून सामाजिक भान जोपासून काही अंशी उत्साहवर्धक वाटणारे सरते २०१३ वर्षे आगामी २०१४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा , विधानसभा निवडणुकांचे इच्छुकांना गोड स्वप्ने दाखविणारे , तयारीला लावणारे, व सातत्याने कार्यक्रमांमध्ये व्यस्त ठेवणारे ठरले. सरत्या वर्षात कांद्याने आपला डोळ्यात पाणी आणण्याचा गुणधर्म कधी शेतकऱ्यांना तर कधी सामान्य नागरिकांना दाखविला. गेल्या दहा-बारा' वर्षात लांडगा आला रे आला ... अशी अवस्था करून ठेवलेल्या विमानतळ प्रकल्पासाठी सरत्या २०१३ वर्षामध्ये प्रथमच सेझ भागातील जागा निश्चीत करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट झाल्याने पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला तर पूर्व भागातील शेतकऱ्यांनी बाह्या सावरल्या आहेत.
सरत्या वर्षात चाकण पोलिसांनी अनेक "हेवी क्राईम' अनुभवले. चाकण औद्योगिक क्षेत्रात असामाजिक प्रवृत्ती दडल्याच्या संशयाने पोलिसांची अनेकदा झोपही उडवली होती. त्यानंतर पोलिसांनी नाणेकर वाडी वैगरे भागात थेट कोम्बिंग ऑपरेशन राबविले होते . तेरा वर्षांच्या शाळकरी विद्यार्थ्याचा अपहरण करून करण्यात आलेला खून, अंधश्रद्धेतून चाकण मधील मायलेकरांचा देण्यात आले नरबळी, किरकोळ भांडणातून शेजाऱ्यांनी महिलेला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार, आणि बलात्कार करून अश्लील चित्रफित काढून विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा किळसवाना प्रकार अशा वर्ष संपताना घडलेल्या धक्कादायक प्रकारांनी चाकण पोलिसांना 'ना दिन को सुकून ना रात को आराम ' या म्हणीचा प्रत्यय दिला. खराबवाडी येथील हॉटेल मध्ये गोळ्या झाडूनमित्राची करण्यात आलेली हत्या , केळगाव मध्ये शेतमजूर दाम्पत्याचा निर्घृण खून , आठ वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून करण्यात आलेला खून , आणि १४ मार्च २०१३ रोजी जमिनीच्या वादाच्या कारणावरून कोरेगाव खुर्द (ता.खेड) येथील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष दतात्रेय घनवट यांचा तलवारी आणि कोयत्यांनी सपासप वार करून झालेला निर्घृण खून व त्यानंतर महिना भरात कुरकुंडी (ता.खेड) येथे पोलीस पाटलाच्या मुलाचा पिस्तुलातून गोळी झाडून व कोयत्याने सपासप वार करून करण्यात आला निर्घृण खून या सलगच्या घटनांनी पोलिसांना पळता भुई थोडी केली होती. ग्रामपंचायत नोंदींच्या प्रकरणात चाकण औद्योगिक क्षेत्रा लगतच्या मेदनकरवाडी व नाणेकरवाडीच्या दोन ग्रामसेवकांवर निलंबन कारवाई झाली. त्या नंतर मेदनकरवाडीचे विद्यमान सरपंच दोन माजी सरपंच ,नाणेकरवाडीच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना बेकायदा नोंदी प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. चाकण ग्रामपंचायतीमध्ये बोगस उतारे , आणि सरपंचपद निवडीची सापशिडी व गोंधळ , त्याच प्रमाणे राजकीय द्वेषाने गायरान अतिक्रमणाची तक्रार झाल्या नंतर खराबवाडी (ता.खेड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच ,उपसरपंचांसह अकरा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश त्यानंतर त्यास मिळालेली स्थगिती यामुळे २०१३ ह सरते वर्ष ग्रामपंचायतींच्या व कारभार्यांच्या चिरकाल स्मरणार रहाणारे ठरणार आहे.
क्राईम डायरी सांगते ... :
सरत्या २०१३ या वर्षात (नोव्हेंबर अखेर) चाकण परिसरात १3 खून ,४ खुनाचे प्रयत्न , व जबरी हाणामाऱ्या तलवार हल्ल्यांचे अनेक प्रकार घडले. वर्षभरात चाकण परिसरात ३ गंभीर स्वरूपाचे दरोडे, १८ जबरी चोऱ्या, ४० घरफोड्या, व १०६ वाहन व अन्य चोऱ्यांचे प्रकार घडले. या चोऱ्यांमधून ३ कोटी ५ लाखांचा माल चोरट्यांनी लांबविला . तर १ कोटी ३३ लाखांचा माल चोरट्यांच्या घशातून ओढून काढण्यात पोलिसांना यश आले. निरनिराळ्या रस्ते अपघातात ६१ निरपराध मृत्यूच्या दाढेत आले. बेदरकार वाहन चालकामुळे १५१ गंभीर स्वरूपाचे अपघात झाले. ५४ जन या अपघातातून गंभीर जखमी व जायबंदी झाले तर ३६ हून अधिक जन किरकोळ जखमी झाले. जमिनींशी संबंधित १४ ठकबाजीचे व ४ फसवणुकीचे, गुन्हे चाकण पोलीस ठाण्यात दाखल झाले. पाशवी बलात्काराचे ७ प्रकार या भागात मागील वर्षभरात घडले. बेकायदेशीर पद्धतीने दारू विक्री केल्या प्रकरणी २६ गुन्हे चाकण पोलिसांनी दाखल केले. स्वतःचा जीव घेत २५ जणांनी आत्महत्या केल्या तर आजार ,कर्जे ,निराशा ,प्रेमसंबंधातून,कौटुंबिक आणि अन्य कारणांनी १५७ जणांनी राहत्या घरातून बेपत्ता होणे पसंत केले. किरकोळ स्वरूपाचे ९८ तर गंभीर स्वरूपाचे ३९४ गुन्हे नोव्हेंबर २०१३ अखेर दाखल झाल्याचे चाकण पोलिसांची क्राईम डायरी सांगते.
......अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा