गुन्हा दाखल असलेला अधीक्षक अखेर निलंबित...
... गुन्हा दाखल असलेला अधीक्षक अखेर निलंबित
दहा कोटींची जमविली होती संपत्ती
चाकण:
चाकण ग्रामपंचायतीच्या आज (दि.२६) झालेल्या वादळी मासिक सभेत अखेर चाकण पोलीस ठाण्यात बोगस आठ अ प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या कार्यालयीन अधीक्षकावर निलंबन कारवाई करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. गेल्या चार महिन्यांपासून संबंधित कार्यालयीन अधीक्षकाच्या निलंबनाचा प्रश्न टांगणीला लागलेला होता, त्यावर अखेर या निर्णयाने शिक्का मोर्तब झाल्याची चर्चा ग्रामपंचायत वर्तुळात आहे.
पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने पोलिसांत गुन्हा दाखल झालेले चाकणच्या तत्कालीन सरपंचाना या प्रकरणात अटक झाली होती. या प्रकरणात येथील उतारा मिळविणारा पांडुरंग सपाट नामक व्यक्ती सदगुरू बिल्डरचा मालक व आयफील सिटी या बड्या गृहप्रकल्पाचे मालक व एक कामगार आणि जमीन खरेदी विक्रीतला एक बडा मासा यांच्यावरही चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यातील काही मंडळीना अटक होऊन त्यांची सुटका झाली मात्र ग्रामपंचायतीचे अधीक्षक विजय भोंडवे यांनी वेळोवेळी जामीन मिळविल्याने अटक टळली होती. चाकण पोलीस ठाण्यात फसवणूक व विविध कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आल्या नंतरभोंडवे या अधीक्षकावर निलंबन कारवाई व्हावी व ग्रामपंचायतींच्या महत्वाच्या कागदपत्रांचे दप्तर त्यांच्याकडून काढून घ्यावी अशी जोरदार मागणी गेल्या सलग चार मासिक सभांना अनेक सदस्यां कडून करण्यात आली होती . मात्र प्रत्यक्षात कारवाई गेल्या चार महिन्यांपासून झालीच नव्हती. अखेर आज आयोजित करण्यात आलेल्या मासिक सभेत पुन्हा याच मुद्यावर सदस्यांनी सभागृह अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यानंतर सर्वानुमते संबंधित अधीक्षकावर निलंबन कारवाई करण्याचे बहुमताने ठरविण्यात आले. या वेळी सभागृहात सरपंच दतात्रेय बिरदवडे,माजी उपसरपंच अशोक बिरदवडे, साजिद सिकीलकर, माजी सरपंच व सदस्य काळूराम गोरे, सुधीर वाघ, अमोल घोगरे, दतात्रेय जाधव, रेश्मा लेंडघर,पांडुरंग गोरे, बानो काझी , आदी उपस्थित होते.
दरम्यान या बाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे , गटविकास अधिकारी अजिंक्य पवार यांनी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस असल्याचेही स्पष्ट केले होते. चाकण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी यांनी सांगितले कि, सर्वानुमते मंजूर करण्यात आलेल्या ठरावा नुसार आता संबंधित अधीक्षकावर कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान पोलिसांनी संबंधित अधीक्षक भोंडवे यांच्याकडे दहा कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जमविल्याची माहिती मिळविली असून त्याबाबत चौकशी होणार का? या कडे सामन्यांचे लक्ष लागले आहे.
--------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा