चाकणचे एसटी बस स्थानक अखेर प्रवाशांसाठी खुले
चाकणचे एसटी बस स्थानक अखेर प्रवाशांसाठी खुले
उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी हालचाली
चाकण :
गेल्या तीन वर्षांपासून नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेत सव्वा कोटी रुपयांहून अधिक खर्च करून अंतिम टप्प्यात आलेले चाकण येथील एसटी बसस्थानक प्रवासी व नागरिकांना फलाटावर बसण्यास खुले केल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. 'चाकण चे स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्याची मागणी' या मथळ्या खाली अविनाश दुधवडे यांनी पुढारीत नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या पार्श्वभूमीवर हे स्थानक अंतिम टप्प्यातील काम सुरु असतानाही प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे.
स्थानक सुसज्ज करण्यासाठीचे गेल्या तीन वर्षांपासून काम कासव गतीने सुरु असलेले काम आता अगदी अंतिम टप्प्यात आले असले तरी सर्व बाबींची पूर्तता एसटी महामंडळाचे कागदोपत्री सोपस्कर या सर्व बाबी पाहता आणखी किमान तीन महिने तरी हे बस स्थानक नागरिकांसाठी सुरु होण्याची शक्यता नसल्याची स्थिती दैनिक पुढारीने मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर या बस स्थानकाचे कम करणाऱ्या साई रचना कंपनीने नागरिकांना स्थानकावर निवाऱ्यात बसता येईल अशी व्यवस्था करण्यासाठी तातडीने काम हाती घेतले होते.
चाकण च्या या एसटी बस स्थानकाचे अनेक दिवस रेंगाळलेले काम नक्की केंव्हा पूर्ण होणार असा संतप्त प्रश्न प्रवासी विचारू लागले होते . 'बांधा वापरा, हस्तांतरित करा' (बीओटी) या तत्त्वावर चाकण एसटी बस स्थानकाचे काम करण्यात येत आहे.चाकण एसटी बसस्थानकाची सुमारे पन्नास वर्षापूवीर्ची इमारत मोडकळीस आली होती. या बसस्थानकात स्वच्छतागृह,प्रवाशांसाठी बसण्याची सोय, फलाट आदी काहीच सोयी,सुविधा नव्हत्या. पावसाळ्यात बसस्थानकाच्या आवारात पाणी साचत होते . तसेच मलमूत्राचे डबके आवारात साचल्याने प्रवाशांना दुर्गंधी सहन करावी लागत होती .त्यामुळे या आवारात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या बसस्थानकाचे अद्ययावत पद्धतीने काम व्हावे, अशी प्रवाशांची मागणी होती. तत्कालीन परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बसस्थानकाचे काम 450 चौरस मीटरचे बांधकाम व सुसज्ज व्यवस्था अशा स्वरुपातऑक्टोबर 2010 दरम्यान सुरू होईल व 'बीओटी' तत्त्वावर लवकरात लवकर केले जाईल असे जाहीर केले होते. मात्र २०१० पासून सतत तीन वर्षे नागरिकांना पावसात व उन्हात एसटी बस गाड्यांची वाट पहावी लागत होती. या नवीन बसस्थानकात सहा फलाट असून, एका वेळी सहा बस थांबू शकणार आहेत. प्रवाशांच्या सोयी साठी हे बांधकाम लवकर पूर्ण करण्यात असून तो पर्यंत सातत्याने मागणी होत असल्याने हे स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आल्याचे व उर्वरित काम तातडीने पूर्ण करणार असल्याचे साई रचना कंपनीचे एस .व्ही. पंढरपुरे व अधिकाऱ्यांनी सांगितले.
वृत्तपत्र विक्रेत्यांना हक्काची जागा देण्याची मागणी :
वृत्तपत्र ही लोकांची नित्याची गरज आहे. बहुतेक वृत्तपत्र विक्रेते रस्त्याच्या कडेला अतिशय कमी जागेत वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेऊन वृत्तपत्रांची विक्री करतात, मात्र प्रशासनाकडून त्यांच्यावर वारंवार कारवाई करण्याची धमकी दिली जाते या पार्श्वभूमीवर बस स्थानकातील वृत्तपत्र विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा देण्याची मागणी होत आहे.संबंधितांकडे वारंवार या बाबतची मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वृत्तपत्र विक्रेते नंदकुमार कर्नावट यांनी केला आहे.
-----------
अविनाश दुधवडे, चाकण 9922457475 .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा