...नांदणाऱ्याला पळवायचे आणि पाळणाऱ्याला नांदवायचे
राजकारणाचा नवा ट्रेंड
एका कार्यकर्त्याच्या हकालपट्टीचे वृत्त
चाकण:
विरोधी पक्ष समजल्या जाणाऱ्या पक्षातील आणि पंचवीस वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून विधानसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवीत सामान्यांशी जोडलेली नाळ दाखविणाऱ्या चाकण मधील एका निष्ठ्वंत कार्यकर्त्याला त्यांच्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या सूचनेवरून चक्क पक्षातून हाकलण्यात आल्याचे वृत्त चाकण मध्ये आज (दि.३०) आले.
हे वृत्त येताच त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते आणि चाकणपंचक्रोशीतील नागरिकांना शनिवारी आश्चर्याचा धक्काच बसला. कुठल्याही पक्षातील नेत्यांचा तेजोभंग करण्याची आणि सामाजिक प्रश्नावर आंदोलन छेडण्याची एकही संधी न सोडणारे चाकण मधील हे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक आणि तितकेच संयमी राजकारणी म्हणून चाकण पंचक्रोशीत आणि तालुक्यात ओळखले जातात. पंचवीस वर्षे पक्षात इमाने इतबारे काम केले . पण नियती किती विलक्षण असते याचा अनुभव घेत त्याच पक्षातून अत्यंत वाईट पद्धतीने हकलले जावे हा निर्णय या भागातील त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आणि सामान्य नागरिकांना बोचणारा असल्याची चर्चा या भागात सुरु झाली आहे. . एक-एक कार्यकर्ता गोळा करून चाकण मधील या कार्यकर्त्यांनी पक्ष मोठा केला. पण पक्षात सत्तेपुढे माना तुकविणारी आणि स्वाभिमानी अशी उभी फुट पडली असल्याचे त्यांचेच कार्यकर्ते गेल्या काही वर्षांपासून उघडपणे सांगत आहेत. म्हणून आज या एकाच पक्षातील अनेक जिवलग कार्यकर्ते परस्परांच्या विरोधात उभे आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाचं घरच तालुक्यात विस्कटलंय असे अनेक कार्यकर्ते आता सांगत आहेत. बंडखोरी करण्याची भाषा ही प्रत्येक पक्षात कमी-अधिक प्रमाणात होत असते त्यात नवीन असे काही नाही, पण तीन-चार पक्ष बदलून आलेल्यांना मानाची पदे देण्यात येत असून निष्ठावंत कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहातून नियोजन बद्धपणे बाजूला करण्यात येत आहे. त्यामुळे 'नांदणाऱ्याला पळ म्हणायचे, आणि पळणाऱ्याला नांद म्हणायचे ' या म्हणी सारखी अवस्था पक्षात झाल्याचे स्थानिक कार्यकर्ते , नागरिक बोलू लागले आहेत.
दरम्यान हकालपट्टी करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव अशोक खांडेभराड असून ते शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे नाजी उपजिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेवून शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली असून त्यांनी तालुक्यात आढळराव सेनाउभारायची असल्याचे म्हटले आहे.आपण यापुढेही शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून काम करणार असल्याचे निक्षून सांगितले.
---- अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
------------------------------ ---------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा