बाळासाहेब ठाकरे यांची चाकणची ती सभा
न भूतो न भविष्यती अशीच ...
चाकण: वार्ताहर
गेल्या पाच दशकांच्या खेड तालुक्याच्या इतिहासात झालेल्या जाहीर सभा पाहिल्यास , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही आठ अक्षरे टाळून पुढे जाताच येणार नाही अशी
वस्तुस्थिती तालुक्याने आणि विशेषतः चाकण करांनी पहिली आहे. एप्रिल 2004 साली चाकण च्या महात्मा फुले मार्केट च्या प्रचंड प्रांगणात लाखो नागरिकांच्या उपस्थितीत शिवसेना
प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीसाठी तत्कालीन खेड लोकसभा मतदार संघाचे सेना भाजपाचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ
झालेली ती सभा न भूतो न भविष्यती अशीच झाली.
या सभेतही बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांचा समाचार घेतला होता ,तो त्यांच्या नेहमीच्या बिनधास्त शैलीत.या भागात बाळासाहेबांची झालेली ती अखेरची सभा आजही
नागरिकांच्या स्मरणात आहे. छत्रपती शिवरायांची अवहेलना करणाऱ्या जेम्स लेन
पासून सोनिया गांधी ,शरद पवार यांच्यावर त्यांनी कडाडून आपल्या ठाकरी शैलीत हल्ला
केला होता.तर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बाबतही टिप्पणी केली होती.तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांच्या हस्ते मुंबईत छत्रपती शिवाजीमहाराजांच्या
पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.त्यावेळी जेम्स लेन प्रकरणावरून वाजपेयी यांनी विचारांची लढाई विचारांनी लढावी असे प्रतिपादन केले होते,त्या कार्यक्रमाला उपस्थित
असताना ठाकरे एक शब्दही बोलले नाहीत,अशी टीका विरोधकांनी केली होती.विरोधकांच्या त्या टीकेला बाळासाहेब ठाकरे यांनी चाकण मध्ये उत्तर दिले होते. त्या बाबत
ठाकरे यांनी म्हटले होते कि, वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान म्हणून बोलत असताना त्यांना लगेच उत्तर देणे बरोबर नव्हते.केवळ शिष्टाचार म्हणून आपण गप्प होतो याचा
अर्थ मुग गिळून गप्प राहिलो असा होत नाही,अशा शब्दात विरोधकांचे सर्व आरोप त्यांनी चाकण येथील सभेतच सर्वप्रथम खोडून काढले होते.कॉंग्रेस पक्षावर सोनिया गांधी
यांच्या विदेशी मुद्द्यावर घणाघाती हल्ला त्यांनी येथील सभेत चढविला होता.शरद पवार यांच्यावर टीका करताना सोनिया गांधी यांच्याशी फारकत घेतल्या नंतर पुन्हा एकत्रित
कसे येता असा प्रश विचारीत 'निश्चयाचा महामेरू,सकळ जणांचा आधारू,असे ब्रीद पवार यांना लावले जात आहे,ते त्यांना लागू होते का? असा सवाल करून पवार हे सोनियांचे
पायधरू आहेत ,त्यांच्या दुर्दैवाला काय म्हणावे अशी टिप्पणी केली होती.
चाकण परिसरातील नागरिक आजही आठ वर्षांपूर्वी झालेल्या त्या प्रचंड सभेचे किस्से सांगतात.बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त येताच चाकण मधील अनेकांनी त्या आठवणीना
उजाळा दिला.उत्तर पुणे जिल्ह्यात झालेली ठाकरे यांची ती सभा चाकण करांच्या दृष्टीने न भूतो न भविष्यती अशीच अखेरची आणि अविस्मरणीय ठरली ....
----------
अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५
.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा