कंपनी स्वायत्त मात्र सरकारी खाक्यानेच कारभार
बीएसएनएलच्या कव्हरेज मधून सर्व सामान्य बाहेर
बीएसएनएलचा बोजवारा भाग 1
चाकण :
भारतात दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएलने क्रांती घडवली असे अभिमानाने सांगितले जात असले तरी ही कंपनी स्वायत्त असूनही , ती सरकारी खाक्यानेच चालत आहे . त्यामुळे औद्योगिकरणाने चाकण सारख्या भागाचा लोकसंखेचा विस्तार एकीकडे लाखोंच्या पटीत वाढत असताना,दुसरीकडे मात्र इतर खाजगी कंपन्यांच्या तुलनेत आपलीशी वाटणारी
भारत संचार निगमची (बीएसएनएल) दूरध्वनी सेवा निरनिराळ्या कारणांनी लोकांना नकोशी वाटू लागली आहे.गेल्या काही काळात कायम स्वरूपी बंद झालेल्या दूरध्वनी जोडां मुळे
ही बाब अधोरेखित होत आहे.
बीएसएनएल सेवे बाबतची कमालीची अनिश्चितता , ब्रॉडबँड सेवेचा बोजवारा, नवीन कनेक्शन साठी क्लिष्ट पद्धती, आपल्या सेवां संदर्भात नागरिकांना माहिती न देणारे अन्
ग्राहकांच्या तक्रारीं बाबत अनास्था दाखविणारे येथील ढिम्म प्रशासन , या मुळे बीएसएनएल सेवेचा या भागात अक्षरशः बोजवारा उडाला आहे. चाकणसह पंचक्रोशीतील लोकसंख्या
अडीच लाखांच्या पुढे असताना केवळ सातशे च्या आसपास दूरध्वनी जोडच सुरु राहिले आहेत. त्यातीलही बहुसंख्य ग्राहक एमआयडीसीतील कारखानदार आहेत. दूरध्वनी सारख्या
महत्वाच्या सेवेतही 'सरकारी काम अन् बारा महिने थांब ' असा शिरस्ता येथील अधिकारी मंडळीनी लावला असल्याने अन्य खाजगी कंपन्यांच्या मोठ्या विस्ताराच्या तुलनेत चाकण
भागातील दूरध्वनी जोडांची संख्या मात्र थेट निम्म्यावर आली आहे. मोबाईल मुळे ही संख्या घटल्याचे कारण पुढे करण्यात येत असले तरी बीएसएनएल ची दूरध्वनी सेवा अत्यंत
असमाधानकारक असल्यानेच येथील शेकडो ग्राहकांनी आता "बीएसएनएल'कडे पाठ फिरवून ते स्पर्धक कंपन्यांचे ग्राहक झाले आहेत ही बाब दुर्लक्षून चालणार नसल्याचे नागरिकांचे
म्हणणे आहे. "बीएसएनएल' मोबाईलची सेवा सातत्याने विस्कळीत राहत असल्याने या सेवेचे ग्राहक याभागात नगण्य आहेत.या मोबाईल ग्राहकांची अधिकृत
आकडेवारी स्थानिक अधिकाऱ्यांकडे उपलब्धच नाही.
अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनमानी मुळे असलेले ग्राहकही टिकविणे बीएसएनएलला सुमार दर्जाच्या सेवेने टिकविणे अशक्य झाले आहे. त्यामुळे येथील या विभागाचा डोलारा लाखो रुपयांच्या प्रचंड तोट्यात आल्याने
चाकण शहरात नवीन लहान कार्यालय सुरु करून आंबेठाण रस्त्यावरील मोठ्या कार्यालयाचा अतिरिक्त खर्चाचा ताण कमी करण्याची नामुष्की बीएसएनएल वर ओढवली असल्याचे सर्वश्रुत आहेच.
बीएसएनएलची देयके (बिल) ग्राहकांना नियमित पणे मिळत नाहीत, बंद पडलेले दूरध्वनी महिनोंमहिने सुरु होत नाहीत, वाय-मॅक्स घेण्याची इच्छा असणाऱ्यांना प्रथम अधिकाऱ्यांच्या
इच्छा पुऱ्या करण्याची जबाबदारी पेलावी लागत आहे ,या बाबत माहिती घेण्यासाठी गेलेल्या संबंधित कार्यालयात गेलेल्या अनेकांना संबंधित अधिकारी कर्तव्या पेक्षा अधिकाराचा दंडुका
दाखवीत आहेत. त्यामुळे वादावादीचे ते अगदी हातापायीचे प्रकार सातत्याने होत असल्याने या कार्यालयांकडेही लोक फिरकेनासे झाले आहेत.येथे नव्याने आलेले बीएसएनएलचे अधिकारी श्री.वटकर लोकांना थेट पैसे मागत असल्याची तक्रार अनेक नागरिक करू लागले आहेत. ब्रॉडबँड सेवेसाठी गेल्या काही काळात
बीएसएनएल वर अवलंबून असणाऱ्यांनी तांत्रिक बिघाड आणि विस्कळीत सेवा व अधिकाऱ्यांची मग्रुरी पाहून बीएसएनएल ची सेवा बंद करीत अन्य खाजगी पर्यायांना पसंती दिली आहे.
अगदीच नडलेल्या मंडळींकडून 'अडला नारायण... म्हणी प्रमाणे येथून हातपाय जोडून कामे करवून घेतली असल्याची विपर्यस्त स्थिती निर्माण झाली आहे.
चौकट :
अधिकारी म्हणतात...
बीएसएनएलचे या विभागाचे उपमंडल अभियंता एस.डी.नायकवाडे यांनी या बाबत सांगितले कि,चाकण परिसरात सध्या बीएसएनएलची 700 कनेक्शन (जोडण्या) आहेत ,
यात सुमारे 150 ब्रॉडबँड व लीज (इंटरनेट साठीची )कनेक्शन्स आहेत.मात्र दोन लाखांच्या पुढे गेलेल्या चाकणच्या लोकसंखेत हि कनेक्शन अन्य खाजगी स्पर्धक
कंपन्यांच्या तुलनेत नगण्यच असल्याची वस्तुस्थिती आहे.
-----------------
'वाय-मॅक्स' यंत्रणा पडलीये धूळखात
माहिती देण्याचे कष्टही करेनात अधिकारी
बीएसएनएलचा बोजवारा 2
चाकण :
"वाय-मॅक्स' या वेगवान व कार्यक्षम वायरलेस ब्रॉडबॅंड सेवेसाठी कोट्यवधी रुपये खर्चून बीएसएनएलने खरेदी केलेली "बीडब्ल्यूए' (ब्रॉडबॅंड वायरलेस ऍक्सेस) ही यंत्रणा गेल्या दीड वर्षां
पासून धूळखात पडून आहे. या सेवेसाठी केलेली कोट्यवधींची भांडवली गुंतवणूक अर्थहीन गुंतवणूक ठरल्याने बीएसएनएलच्या तोट्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
वाय-मॅक्स ही यंत्रणा कंपनीने पुणे जिल्ह्यात औद्योगिक भागाचा विचार करून चाकण, बारामती, भोर आणि लोणावळा अशा चार ठिकाणी बसविली असली तरी
अशा यंत्रणेला फारसे ग्राहक नाहीत ,मात्र चाकण भागात ज्यांना या सुविधेची गरज आहे त्यांनी अर्ज करून आणि पैसे भरूनही त्यांना अद्याप पर्यंत ही सुविधा केवळ अधिकाऱ्यांचा
गरजा पूर्ण न् झाल्याने मिळाली नाही. या प्रकारची माहिती वरिष्ठ कार्यालयातही आहे, मात्र या बाबत सर्वांनीच डोळ्यावर कातडे ओढण्याची भूमिका घेतली आहे.
मोबाईल ग्राहकांप्रमाणेच वायरलेस ब्रॉडबॅंड ग्राहकांनाही जलद व कार्यक्षम इंटरनेट सेवा देता यावी, यासाठी बीएसएनएलने थ्री- जी स्पेक्ट्रमबरोबरच सुमारे 2800 कोटी रुपयांची
भांडवली गुंतवणूक करून बीडब्ल्यूए (ब्रॉड बॅंड वायरलेस ऍक्सेस) स्पेक्ट्रमही घेतले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र व औद्योगिक पट्ट्यातील ग्राहकांच्या वेगवान दळणवळणाच्या विविध प्रकारच्या
गरजा कार्यक्षमपणे भागवू शकणारी ही यंत्रणा कंपनीने पुणे जिल्ह्यात चाकण, बारामती, भोर आणि लोणावळा अशा चार ठिकाणी बसविली. डोंगरांवर उंच ठिकाणी उभारण्यात
आलेल्या बीटीएसच्या (बेस टर्मिनल स्टेशन) चाचण्याही यशस्वी झाल्या. मात्र गेल्या वर्षभरात एकाही ग्राहकाला त्याचा जोड न देता आल्याने थ्री-जी स्पेक्ट्रमप्रमाणेच बीडब्ल्यूए हा
देखील बीएसएनएलसाठी पांढरा हत्ती ठरला असल्याची जनभावना आहे .
मोबाईल टॉवरद्वारे (बीटीएस) दिल्या जाणाऱ्या सध्याच्या वायरलेस ब्रॉडबॅंड सेवेच्या मर्यादांवर मात करणाऱ्या बीडब्ल्यूए सेवेद्वारे बीटीएसपासून पंधरा किलोमीटरच्या परिघातील
ग्राहकाला जलद व अखंडित वायरलेस इंटरनेट सेवा मिळू शकणार आहे. म्हणूनच बीएसएनएलने ही गुंतवणूक केली असून ती कार्यान्वित केल्यास अशा प्रकारची अत्याधुनिक सेवा
देणारी ती देशातील पहिलीच कंपनीही ठरणार आहे. तथापि, तिच्या चाचण्या होऊन वर्ष लोटले तरी व्यापारी तत्वावर ती ग्राहकांसाठी उपलब्ध करण्याचा मुहूर्तच बीएसएनएलला
अद्याप सापडलेला नाही.
ज्या ठिकाणी वायरलाइन ब्रॉडबॅंड सेवा देणे अशक्य असते, तेथे वायरलेस इंटरनेट सेवा दिली जाते. सध्या त्यासाठी मोबाईलचे "बीटीएस' वापरले जातात. मात्र, त्यांची रेंज (पोच)
फार तर एक ते दीड किलोमीटरच्या परिघातच मिळू शकते. तर, "बीडब्ल्यूए' यंत्रणेच्या "बीटीएस'ची रेंज तब्बल पंधरा किलोमीटरच्या परिघात मिळते. इतकेच नव्हे तर त्याद्वारे
ग्राहकाला अतिजलद (8 ते 32 एमबी पर्यंत) इंटरनेट सेवा मिळू शकणार आहे. औद्योगिक ग्राहकांचा विचार करूनच कंपनीने पुणे जिल्ह्यात चार ठिकाणी ही सेवा पुरविण्याची तयारी
केली. तिच्या चाचण्याही घेतल्या. परंतु, नंतर सारे काही ठप्प झाले.
बीएसएनएलच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात सांगितले की , यंत्रणा पुरविणाऱ्या ठेकेदार कंपनीने सुरुवातीला काढता पाय घेतल्याने बीएसएनएलला ही सेवा सुरू करता
आली नव्हती . हे तंत्रज्ञान कसे वापरायचे हे ठाऊक नसल्याने बीएसएनएलच्या तंत्रज्ञांचाही नाइलाज झाला होता , मात्र, या प्रकारास बीएसएनएलच्या व्यवस्थापनाचा निष्काळजीपणाच
जबाबदार असल्याचा आरोप इच्छुक ग्राहकांनी केला आहे.
चौकट :
अधिकारी म्हणतात...
या संदर्भात बीएसएनएलच्या पुणे विभागाच्या वरिष्ठ कार्यालयात संपर्क साधला असता वाय-मॅक्स कनेक्शन चाकण भागात उपलब्ध करून देत येत असल्याचे
व मागणी झाल्या पासून जास्तीत जास्त दोन आठवड्यांमध्ये अशी सुविधा उपलब्ध करून देता येत असल्याचे या कार्यालयाचे डी .जी.एम .श्री.कुलकर्णी
यांनी सांगितले.प्रत्यक्षात चाकण मध्ये मागणी झालेले कनेक्शन महिन्यांचा कालावधी लोटूनही न मिळू शकल्याने संबंधित ग्राहकाने वाय-मॅक्स जोडणी साठी अन्य
खाजगी पर्याय निवडल्याची बाब बीएसएनएलला अंतर्मुख करायला लावणारीच मानली जात आहे.
-----------------
....तर डोलारा सावरणे अशक्य
बीएसएनएलचा बोजवारा 3
चाकण:
खाजगी मोबाईलधारकांची संख्या कोट्यावधीच्या पुढे गेली आहे. सरकारला हजारो कोटी रुपयांचा महसूल देवूनही या कंपन्या नफा मिळवतात. पण देशव्यापी पायाभूत सुविधा
असतानाही भारत संचार निगम ही सरकारी कंपनी तोट्यात गेली त्याची कारणे कर्मचार्यांची प्रचंड संख्या, त्यांचे प्रचंड वेतन आणि अकार्यक्षम कारभार, हेच आहे असे याच क्षेत्रातील
जाणकार मंडळी सांगतात.
सध्या या कंपनीचे सुमारे पावणे तीन लाखांहून अधिक कर्मचारी आणि कामगार आहेत. कंपनी स्वायत्त असली तरी, ती सरकारी खाक्यानेच चालते.
कंपनीच्या ज्येष्ठ अधिकार्यांना वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ग्राहकांना अधिक चांगली सेवा द्यावी, असे वाटत नाही. आठवड्यातले दोन दिवस सुट्टी
आणि अन्य सरकारी कार्यालयांप्रमाणे संथ गतीने कंपनीचे काम चालते. बीएसएनएलच्या कर्मचार्यांच्या मानसिकतेत कंपनी तोट्यात गेली तरीही फारसा बदल झालेला नाही.
लोकाभिमुख सेवा द्यावी, असे त्यांना वाटत नाही. एके काळी लँडलाईनची मक्तेदारी केवळ याच कंपनीकडे होती. पण गेल्या काही वर्षात ही संख्या झपाट्याने कमी होते असल्याची
बाब केवळ चाकण सारख्या भागाचा प्रातिनिधिक स्वरुपात विचार केल्यास समोर येत आहे.
ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण तातडीने होत नसल्याने आणि सुलभतेने मोबाईलची जोडणी मिळत असल्याने, बीएसएनएलच्या सेवेवर आणि कारभारावर वैतागलेले ग्राहक जोडणी
तोडून टाकतात. वार्षिक उत्पन्नाच्या 50 टक्के महसूल कर्मचार्यांच्या पगारावरच खर्च होतो. अशा स्थितीत हा वाढता तोटा भरून काढण्याचे मोठे आव्हान कंपनीसमोर आहे.
याशिवाय कर्मचार्यांची संख्या कमी करण्याशिवाय पर्याय नाही. सध्या तरी कर्मचार्यांना पोसण्यासाठीच ही कंपनी चालवली जाते, अशी स्थिती आहे. कारभार अधिक कार्यक्षम आणि
लोकाभिमुख करावा लागणार आहे. सरकार दूरसंचार निगम आणि कर्मचार्यांनी कंपनीच्या भवितव्याचा गांभीर्याने विचार केला नाही तर सध्याच्या स्पर्धेच्या जगात
हा डोलारा सावरणे शक्य होणार नाही असे याच क्षेत्रातील वरिष्ठ मंडळींकडून सांगण्यात येत आहे.
खेड तालुक्यात उरलेत 4400 कनेक्शन:
संपूर्ण खेड तालुक्यात सध्या फक्त 4 हजार 400 बीएसएनएल कनेक्शन असून त्यातील अनेक कनेक्शन बंद असल्याची स्थिती आहे.मर्यादित लोकसंख्या असताना
कधी काळी दीड हजारांहून अधिक अनेक्षण असणारया चाकण मध्ये आता केवळ 700 जोडण्या शिल्लक आहेत.या संपूर्ण भागात अन्य खाजगी कंपन्यांची
आकडेवारी वीस हजारांहून अधिक असताना बीएसएनएलची हि आकडेवारी नगण्यच मानली जात आहे.इंटरनेटच्या वापरासाठी साठी किरकोळ अपवाद सोडल्यास जवळपास सर्वच जणांकडून खाजगी
पर्याय वापरले जात आहेत. खेड तालुक्यात बीएसएनएलच्या या उर्वरित कनेक्शन च्या देखभाल आणि दुरुस्ती साठी 8 अधिकारी आणि 42 कर्मचारी असा
50 जणांचा ताफा कार्यरत आहे ,अधिकारी आणि कर्मचार्यांची हि अधिकृत आकडेवारी खेड विभागाचे डिव्हिजनल इंजिनिअर एस.व्ही.तोडेवाले यांनी दिली.
मोठ्या संखेने अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असतानाही नादुरुस्त अवस्थेतील दूरध्वनी तातडीने सुरु का होत नाहीत हा प्रश्न नागरिकांसाठी अनुत्तरीत आहे.
------------------
बीएसएनएलच्या अडचणींची अखंडित शृंखला
केबल चोरी व खोदाईत सेवा होतेय वारंवार खंडित
बीएसएनएलचा बोजवारा 4
चाकण:
भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) मोबाईल व लॅन्ड लाईनची परिस्थिती झपाट्याने न सुधारल्यास दिवसेंदिवस "बीएसएनएल'ला याबाबत मोठा व्यावसायिक फटका बसतच
राहण्याची चिन्हे आहेत. विविध विकास कामांसाठी प्रशासन व नागरिक यांच्या कडून मोठ्या प्रमाणावर खोदाई होते . त्यामुळे "बीएसएनएल'च्या केबलचे मोठे नुकसान होऊन सेवाही
ठप्प होते. यामुळे उद्भवणाऱ्या विविध तांत्रिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर "बीएसएनएल'च्या कर्मचाऱ्यांनाही दिवसेंदिवस काम करणे कठीण होत आहे या कडेही सर्वानीच लक्ष देण्याची
गरज निर्माण झाली आहे.
निरनिराळ्या कामांसाठी "जेसीबी'च्या सहाय्याने रस्ते निष्काळजीपणे खोदले जातात. त्यामुळे केबल तुटून दूरध्वनी सेवा खंडित होतात. ही कामे बऱ्याचदा रातोरात होऊन जातात.
परिणामी दुरुस्ती करण्यासाठी आम्हाला केबल नेमकी कोठे तुटली आहे, हे शोधण्यासाठी खूप वेळ लागतो, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
भारतातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या बीएसएनएलच्या सेवेत जाणीव पूर्वक अडथळा आणण्याचे पातक काही खाजगी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांकडून होत असल्याचा आरोप अधिकारी
आणि कर्मचारी मंडळींकडून खाजगीत होत आहे. केबल तोडण्यापासून चोरून नेण्यापर्यंत संबंधित मंडळींची मजल गेली आहे. सध्याच्या वेगवान स्पर्धेत बीएसएनएलला मागे टाकण्यासाठी
खरोखरच असे अभद्र प्रकार होत आहेत का ? याचे पोस्ट मोर्टम करण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्वस्त दरातील तत्पर सेवा देणाऱ्या खासगी मोबाईल आणि लॅन्ड लाईन कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित केल्याने "बीएसएनएल'चे ग्राहक दिवसेंदिवस कमीच होत आहेत. त्यातच बीएसएनएलचे
लालफितीच्या कारभारामुळे बंद पडलेले दूरध्वनी एकेक आठवडा ते महिनाभर सुरू होत नाही. इंटरनेट सेवाही समाधानकारक मिळत नाही. या ग्राहकांच्या तक्रारी कायम आहेत.
दरम्यान परिस्थिती झपाट्याने न सुधारल्यास दिवसेंदिवस "बीएसएनएल'ला याबाबत मोठा व्यावसायिक फटका बसतच राहण्याची गंभीर शक्यता असून भारत संचार निगम
(बीएसएनएल) लँडलाइन सेवेला ऊर्जितावस्था देण्यासाठी सर्वच स्तरावर मोठे प्रयत्न करण्याची आता खरी खुरी गरज निर्माण झाली आहे.
"डब्लूएलएल'चा पर्याय उत्तम पण...
केबल दुरुस्तीची वारंवार उद्भवणारी समस्या विचारात घेता "डब्लूएलएल' म्हणजेच विनाकेबल दूरध्वनी सेवा आता उत्तम पर्याय आहे. रास्त दर, अत्याधुनिकता व अविरत
सेवा ही या सेवेची वैशिष्ट्ये असल्याने ग्राहकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असेही "बीएसएनएल'च्या अधिकार्यांनी सांगितले.प्रत्यक्षात ग्राहकांना
या बाबतची माहिती येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
बीएसएनएलचे या विभागाचे उपमंडल अभियंता एस.डी.नायकवाडे या बाबत म्हणाले कि,चाकण परिसरात सध्या डब्लूएलएल सेवा वापरकर्त्यांची नेमकी
आकडेवारी सांगता येणार नाही ,कारण अशा प्रीपेड कनेक्शनची माहिती पुणे कार्यालयालाच असते.
------------------ अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा