दाट धुक्याने चाकण परिसराला लपेटले



दाट धुक्याने चाकण परिसराला लपेटले 
रविवारच्या सकाळचे दृष्य  

चाकण:

चाकण पंचक्रोशीत दाट धुक्‍याने आज (दि.4) जणू दुलईच पांघरली होती. धुक्‍यामुळे सूर्यदर्शनही सकाळी आठच्या नंतर झाले. येथील रस्ते धुक्याच्या दुलईत लपटेल गेल्याने 
सकाळी कामावर निघालेले कारखान्यांमधील नोकरदार ,व वाहन चालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागली. इतके दाट धुके या हंगामात प्रथमच पडल्याने त्याचा
परिणाम काही पिकांवर होण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली .
थंडीला प्रारंभ झाला की आपोआपच धुके पडते. गेल्या काही दिवसांत वातावरणात सातत्याने बदल होत आहे. चार सहा दिवसांपूर्वी अस्तित्व दाखविणारी थंडी नंतर ढगाळ हवामानाने 
गायब झाली होती.  हुडहुडी भरावी इतकी थंडी अद्याप पडलेली नाही. गार वाऱ्याची झुळूक मात्र अधुन मधून जाणवत आहे. आज (दि.4) पहाटेपासूनच या संपूर्ण परिसरात 
दाट धुके पडले. जणू धुक्‍याचे साम्राज्य पसरले होते. दहा पंधरा  फुटांवरचेही नीटसे दिसत नव्हते. पहाटे फिरायला जाणाऱ्यांचीही आज चांगलीच अडचण झाली. काहींनी आज 
रोजच्या फेरफटक्‍याला बगल दिली. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील धुक्‍यामुळे प्रत्येक वाहनधारकांना वाहनांचे दिवे लावण्याशिवाय पर्याय नव्हता. एरवी प्रखरपणे पडणारे 
वाहनांचे दिवेही मंद वाटत होते. सकाळच्या कोवळ्या उन्हाचा अनुभवही आज घेता आला नाही. धुक्‍यामुळे रस्त्यावरची वर्दळही सकाळी साडेनऊनंतर वाढली. 
शहरातील अगोदर खराब असलेले रस्ते त्यात दाट धुके यामुळे सकाळी लवकर बाहेर पडणाऱ्या वाहनधारकांची चांगलीच पंचाईत झाली. तरीही काही वाहनधारक सुसाट वेगाने वाहन
चालवताना दिसत होते. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने धुके पडल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. याच पद्धतीचे वातावरण नेमके किती दिवस राहील याचा मात्र अंदाज येत
नसल्याचेही त्यांनी सांगितले. इतके दाट धुके पडल्याने त्याचा परिणाम फळबागा, पालेभाज्या तसेच अन्य पिकांवर होण्याची भीती आहे. एका दिवसात फारसा परिणाम होणार नाही; 
पण असेच धुके फार दिवस पडले तर त्याचा फटका बसू शकतो. धुक्‍याचा परिणाम म्हणून फळावर व अन्य पिकांवर बुरशीजन्य रोग पसरण्याची शक्‍यता आहे. 
अचानक पडलेल्या या धुक्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याचा मोह आवरत नसल्याचे चित्रही काही भागात पहावयास मिळत होते.                    अविनाश लक्ष्मण दुधवडे,चाकण ,९९२२४५७४७५                                    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)