बैलगाडा शर्यतींवरील बंदी त्वरित हटवा : खासदार राजू शेट्टी




बैलगाडा शर्यतींवरील बंदी त्वरित हटवा : खासदार राजू शेट्टी 
चाकणला रोखला पुणे नाशिक महामार्ग 
शासनाच्या दुटप्पी भूमिकेवर आढळरावांची टीका 
चाकण:
पैशावर खेळवली जाणारी घोड्यांची रेस चालते मग शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी यात्रा जत्रां मधून होणाऱ्या बैलगाडा शर्यतींना होणारा विरोध दुर्दैवी असून ,
प्राण्यांवर प्रेम कसे करावे हे मुलांप्रमाणे प्राण्यांना जपणाऱ्या शेतकऱ्यांना शिकविण्याची गरज नाही असे सांगत बैलगाडा शर्यतीं वरील बंदी हटवावी या साठी 
सगळे महाराष्ट्रातील शेतकरी एकत्र करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांनी चाकण (ता.खेड)येथे केली.
 
 राज्यातील बैलगाडा शर्यतींवर लावण्यात आलेली बंदी उठविण्याबाबत राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी आज  (दि.3)चाकण 
(ता.खेड )येथे बैलगाडा शर्यतींचे खंदे समर्थक शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वा खाली 
रास्तारोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले त्याप्रसंगी खा.शेट्टी बोलत होते.या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आमदार विजय शिवतारे,संजय उर्फ 
बाळा भेगडे,माजी आमदार दिगंबर भेगडे,बाबुराव पाचर्णे ,शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत ,जिल्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप सोमवंशी,
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र खराडे,बैलगाडा विमा कंपनीचे अध्यक्ष जयसिंगराव एरंडे,अशोक खांडेभराड ,आशा बुचके,अमृता गुरव,विजया शिंदे,गणेश
सांडभोर,राम गावडे,पांडुरंग गोरे,शेखर पिंगळे,स्वामी कानपिळे,लक्ष्मण जाधव,गणेश पर्हाड,आदींसह पदाधिकारी व बैलगाडा मालक मोठ्या संखेने उपस्थित 
होते.
पुढे बोलताना खा.राजू शेट्टी म्हणाले कि,बैलांची खिल्लारी जात ही धावण्यासाठी प्रसिध्द आहे,अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या शेतकऱ्यांनी विरंगुळा म्हणून 
बैलांची शर्यत यात्रांमधून आयोजित केल्यास त्यात काहीही गैर नाही.आमदारांनी या बाबत अशासकीय ठराव विधानसभेच्या अध्यक्षांकडे द्यावा,आणि शासनाने 
याबाबत बैलगाडा शर्यतींच्या बाजूने उच्च न्यायालयात प्रतिज्ञा पत्र सदर न केल्यास विधानसभेवर बैलांचा मोर्चा काढावा.या बाबत न्यायालयासमोर जावून 
बैलगाडा शर्यती हा आमचा शौक आहे असे सांगण्यात गैर काय?असा प्रश्न उपस्थित केला.
 खासदार शिवाजीराव आढळराव यांनी या वेळी सांगितले कि,बैलगाडा शर्यती व्हाव्यात अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे.यात कुठल्याही प्रकारचे राजकारण 
नाही,मला खासदारकी पेक्षा बैलगाडा शर्यती व्हायला हव्यात यासाठी अधिक रस आहे याची विरोधकांनी जाणीव ठेवावी.जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर 
खासदार आढळराव यांनी नाराजी व्यक्त केली. वळू च्या शर्यतींवर बंदी असताना जाणीवपूर्वक बैलांच्या शर्यतींवर बंदी लादण्यात आली आहे.शासनाची याबाबत
 भूमिका दुटप्पी असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी बैलगाडा शर्यती जो पर्यंत सुरु होत नाहीत तो पर्यंत लाल दिवा याभागात फिरकू देवू नका असे आवाहन केले,व राज्य शासन 
आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर आपल्या खास ग्रामीण ढंगाच्या खुमासदार शैलीतून जोरदार हल्ला चढवीत सर्वांचीच मने जिंकली.
आमदार विजय शिवतारे,संजय उर्फ बाळा भेगडे,माजी आमदार दिगंबर भेगडे,बाबुराव पाचर्णे ,अशोक खांडेभराड ,आशा बुचके,अमृता गुरव,विजया शिंदे
आदींसह बैलगाडा मालकांनी बैलगाडा शर्यतींचे जोरदार समर्थन केले.
  तदनंतर खासदार आढळराव यांच्या नेतृत्वाखाली काही वेळ पुणे नाशिक महामार्ग रोखून धरण्यात आला.खेड चे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांना निवेदन 
दिल्या नंतर महामार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.
 दरम्यान क्रूएल्टी टू अॅनिमल कायद्यानुसार बैलगाडा शर्यतीवर आणलेल्या बंदीला न जुमानता बैलगाडा शर्यती पूर्वीइतक्याच जोमाने घेतल्या  जाव्यात अशी 
बैलगाडा मालकांची जोरदार मागणी आहे.त्याच पार्श्वभूमीवर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी
यांच्या आजच्या जोरदार आंदोलनाच्या पवित्र्याने बैलगाडा शर्यत बंदीच्या विरोधातील आंदोलनाला पुन्हा एकदा चांगलीच धार चढली आहे.

चाकणला छावणीचे स्वरूप :
 आजच्या हल्लाबोल आंदोलना संदर्भात पोलिसांना प्राप्त झालेल्या गुप्त माहिती नुसार जाळपोळ वैगरे होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कुमक 
चाकण शहरात पाचारण करण्यात आली होती.उपविभागीय पोलीस अधिकारी,येथील पोलीस निरीक्षक परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवून होते. पिंजऱ्याची वाहने 
पोलिसांचा मोठा फौज फाटा यामुळे चाकण शहराला शनिवार या आठवडे बाजाराच्या दिवशी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
-------------------------       अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)