पवारांना पंतप्रधान करण्यासाठी कलमाडी यांनी केली होती जीवाची पराकाष्टा


 पवारांना पंतप्रधान करण्यासाठी कलमाडी यांनी केली होती जीवाची पराकाष्टा




 राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंह राव यांच्याऐवजी शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी खासदार सुरेश कलमाडी यांनी आपल्या जीवाची पराकाष्टा केली होती, असा खुलासा नुकताच एका पुस्तकात करण्यात आला आहे. रशीद किडवाई यांनी लिहलेल्या '२४ अकबर रोड' या पुस्तकात याबाबत भाष्य करण्यात आले आहे. तसेच या पुस्तकात काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन राजकीय घडामोडींबाबत भाष्य व मजेशीर घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. रशीद किडवाई हे आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राहिले आहेत. तसेच ते सध्या कोलकाता येथील टेलीग्राफ दैनिकाचे सहयोगी संपादक म्हणून काम पाहत आहे. त्यांच्या '२४ अकबर रोड' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग, मणिशंकर अय्यर यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. तसेच या प्रकाशनावेळी अय्यर यांनी ' काँग्रेस पक्ष ही मोठी सर्कस आहे' असे म्हटले होते. त्यामुळे काँग्रेसच्या वर्तुळात खल माजली होती.

किडवाई यांनी आपल्या पुस्तकात २४ अकबर रोडचे राजकीय पटलावर असलेले महत्त्व यावर भाष्य केले. या रोडवरच देशाचे महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. किडवाई यांनी निर्णय जवळून पाहिले आहेत. त्याचा अनुभव त्यांच्या लेखनातून दिसत आहेच.

देशातील अनेक घडामोडींची त्यांनी विस्तृत माहिती दिली आहे. त्यातील एक माहिती म्हणजे राजीव गांधी यांची १९९१ साली हत्या झाल्यानंतर काँग्रेस पक्षात निर्माण झालेली पोकळी याबद्दल आहे. याविषयी भाष्य करताना किडवाई यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, १९९१ साली राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेस पक्षाने बहुमत मिळवले होते. त्यावेळी पंतप्रधान पदाच्या जागेवरुन काँग्रेस पक्षात बरेच मतप्रवाह होते. यात त्यावेळी टॉपचे मानले जाणारे नेते नरसिंह राव, शरद पवार, अर्जुन सिंग व डॉ. शंकरदयाल शर्मा यांची नावे पंतप्रधानपदाच्या चर्चेत होती. यात शऱद पवार पंतप्रधान व्हावेत म्हणून कलमाडी यांनी आपल्या जीवाची कशी पराकाष्टा घेतली होती याचे विवेचन केले आहे. त्यावेळी कलमाडी यांनी पुढाकार घेत 'मराठा स्ट्राँगमॅन' अशी ओळख असलेल्या शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी 'मॅनेज दिल्ली' हे अभियान राबवले होते. सध्या तिहार तुरुंगात असलेले काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांना एके काळी दिल्ली दरबारी 'लॅव्हीश' फाइव्हस्टारमध्ये पार्ट्या आखणारे तरबेज नेते मानले जायचे.  आपल्या लौकिकाला जागत कलमाडींनी पवारांचे लॉबिंग करण्यासाठी एका रात्री नव्याने लोकसभेत निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदारांसाठी एका पंचतारांकित हॉटेलात 'लॅव्हीश डिनर' चे आयोजन केले होते. यात सुमारे वेगवेगळ्या राज्यातील ६४ खासदारांनी सहभाग घेतला होता. शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी त्यावेळी सुरेश कलमाडी यांनी चंगच बांधला होता. यामुळे काँग्रेस पक्षासह सर्वच नेत्यांना याचा धक्काच बसला होता. त्यावेळी सोनिया गांधी राजकीय क्षेत्रात सहभागी झाल्या नव्हत्या. मात्र त्यांनासुध्दा या घटनेने धक्का बसला होता. नंतर अनेक नाट्यमय घडामोडींमुळे पवारांची डाळ शिजली नाही. त्यानंतर नरसिंह राव पंतप्रधानपदी विराजमान झाले. मात्र मुसद्दी राजकारणी म्हणून ओळख असलेले पवार यांना महत्त्वाचे असे संरक्षणमंत्रीपद दिले गेले होते. तर, त्यानंतर कलमाडी यांनी आपल्याला पंतप्रधान करण्यासाठी केलेल्या धडपडीमुळे कलमाडी यांना काही काळ रेल्वेमंत्री करुन पवार यांनी परतफेड केली होती.
 अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)