पाझर तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू
कडाची वाडी येथील घटना
पाच तासांनी मिळाले मृतदेह
चाकण:-
चाकण जवळ कडाची वाडी (ता. खेड) येथील पाझर तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (दि.11) घडली. शाळांना दिवाळीची सुट्टी लागल्याने
हे दोन्ही भाऊ घरातील जनावरे चारण्यासाठी पाझर तलावाकडे गेले होते. जनावरे चारण्यासाठी सोडल्यानंतर ते दोघे पोहण्यासाठी या पाझर तलावात गेले असता हा प्रकार
घडला. पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या दोघांचे मृतदेह पाझर तलावातून शोधून बाहेर काढण्यात आले.
प्रतिक बळीराम खांडेभराड (वय 15) , व अभिजीत बळीराम खांडेभराड (वय 12, दोघे रा. खांडेभराड वस्ती ,कडाची वाडी ,चाकण ता. खेड) अशी या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या
दोन सख्ख्या भावांची नावे आहेत. हे दोघेही भाऊ चाकण येथील श्री शिवाजी विद्यामंदिर या प्रशालेत शिक्षण घेत होते. प्रतिक इयत्ता नववीत ,तर अभिजीत इयत्ता सातवीत
शिकत होता.
या बाबत चे वृत्त असे की, दिवाळीची सुट्टी असल्याने हे दोघे भाऊ आज सकाळी कडाची वाडी येथील पाझर तलवाकडे घरातील जनावरे चारण्यासाठी घेवून गेले होते. जनावरांना
चारण्यासाठी सोडल्यानंतर हे दोघे पाझरतलावात पोहण्यासाठी गेले असता खोल पाण्यात बुडाले. पाझर तलावालगत त्या दोघांची कपडे तशीच ठेवलेली असल्याने या बाबत गावातील
आणि परिसरातील नागरिकांना माहिती मिळाली.पाझर तलाव परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. पाणबुड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात करण्यात आले. मात्र गावातील
तरुणांनीच खोल पाण्यातून तब्बल पाच तासांनंतर म्हणजे सायंकाळी चार वाजनेचे सुमारास या दोन चिमुरड्यांचे मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश मिळविले.
या दोन्ही चिमुरड्यांचे मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. शवविच्छेदन केल्या नंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
बळीराम विठ्ठल खांडेभराड यांना प्रतिक व अभिजीत ही दोनच मूले होती. बळीराम हे पिंपरीत डी वाय पाटील मध्ये नोकरीस आहेत. मूले पाण्यात बुडाली असून पाण्यातून बाहेर
काढल्याची माहिती त्यांना मिळाली. मात्र काही तरी गंभीर घडल्याची शंका आल्याने त्यांनी घटना स्थळी असणाऱ्या भारतीय विद्यार्थी सेनेच्या रामदास धनवटे यांना फोन करून
मूले सुखरूप आहेत ना ? असा प्रश्न केला मात्र धनवटे यांचे वस्तुस्थिती सांगण्याचे धारिष्ट्य न झाल्याने त्यांनी केवळ आश्रुंनाच वाट मोकळी करून दिली.
दरम्यान चाकण चे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस या बाबत अधिक तपास करीत आहेत.
दिवाळीच्या दिव्यात नव्हे,
तर दुखाच्या वणव्यात जळाले संपूर्ण गाव :
कुणाचा मृत्यू कसा होईल, हे सांगणे कठीणच! कुणावर अकस्मात दु:ख कोसळेल, हे कुणाच्या ध्यानिमनीही नसते. असाच प्रकार आज (दि.11) कडाची वाडी येथे घडला.
एकाच दिवशी दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला; एन दिवाळी सणाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने संपूर्ण गावासह चाकण पंचक्रोशीवर शोककळा पसरली.
या दोन्ही भावंडांचे मृतदेहच पाझर तलावात पाच तास सापडले नाहीत. त्यामुळे या दुखद घटनेची माहिती संबंधित कुटुंबियांना लवकर देण्यात आली नाही ,
दु:खाच्या या सावटामुळे कडाच्या वाडीत दिवाळीचे दिवे जळालेच नाहीत. संपूर्ण गाव दु:खाच्या वणव्याने रात्रभर जळत राहिले.
------------------ अविनाश दुधवडे, चाकण ९९२२४५७४७४५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा