पुणे जिल्ह्यात गॅंगवॉर ....

पुणे जिल्ह्यात  गॅंगवॉर  ....
  भोसरीमध्ये गुरुवारी दिवसाढवळ्या सचिन ऊर्फ गोट्या कुंडलिक धावडे (वय 35, रा. धावडेवस्ती) आणि अंकुश रामदास लकडे (वय 27, रा. आळंदी रोड, चाकण) यांचा धारदार शस्त्राने वार करीत गोळीबार करून निर्घृण खून करण्यात आला, तर संदीप रामचंद्र मधुरे (वय 30, रा. आकुर्डी) हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या खुनामुळे भोसरीत गॅंगवॉर वाढल्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन शहराध्यक्ष अंकुशराव लांडगे यांच्या खुनातील सराईत गुन्हेगार गोट्या धावडे हा मुख्य आरोपी होता. त्यामुळे या प्रकरणाचा बदला घेण्यासाठीच त्याचा खून केल्याचा संशय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अंकुश लकडे हा गोट्यावर हल्ला करणाऱ्यांच्या गटातील असल्याचा पोलिसांचा संशय आहे. लकडेबाबत अधिक माहिती उपलब्ध झालेली नसून, त्याचीदेखील गुन्हेगारी पार्श्‍वभूमी तपासण्यात येत आहे. बारा हल्लेखोरांपैकी काही जणांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांच्यामागावर पोलिसांचे पथक पाठविण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेखला व उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास गोट्या व संदीप हे अन्य तीन-चार जणांसह धावडेवस्तीतील घराजवळ असलेल्या गोट्याच्या ऑफिसमध्ये बसले होते. त्या वेळेस छोट्या टेंपोमधून (एमएच 24, जे. 8375) माकड टोपी घातलेले बारा हल्लेखोर उतरले. काही क्षणातच त्यांनी गोट्या व संदीपवर हल्ला चढविला. गोट्याच्या डोक्‍यावर असंख्य वार करण्यात आल्याने तो जागेवरच कोसळला. संदीपच्याही डोक्‍यावर वार करण्यात आले. गोट्यापासून काही मीटर अंतरावरच गवतात अंकुश लकडे याचा मृतदेह आढळून आला. पाठीतून डाव्या बाजूने गोळी बरगडीत शिरल्याने लकडेचा मृत्यू झाला आहे. त्यानेही गोट्यावर हल्ला करणाऱ्यांप्रमाणे माकड टोपी घातली होती. त्याच्या हातात कोयताही होता. त्यामुळे तो गोट्यावर हल्ला करणाऱ्यांच्या गटातील असल्याचा पोलिसांना संशय आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस सहआयुक्त संजीवकुमार सिंघल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेखला, परिमंडळ तीनचे उपायुक्त शहाजी उमाप, गुन्हेशाखेचे उपायुक्त राजेश बनसोडे, पिंपरीचे सहायक आयुक्त सुधीर चौगुले, सहायक आयुक्त (गुन्हे) विनोद सातव यांच्यासह विविध विभागांचे आणि पोलिस ठाण्यांचे निरीक्षक, अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. तोपर्यंत गोट्याला त्याच्या काही मित्रांनी नातेवाइकांच्या मदतीने भोसरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. पोलिसांनी घटनास्थळी येताच जखमी संदीपला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर परिसराची पाहणी करीत असताना गवतामध्ये लकडे याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. त्यानंतर श्‍वान, ठसे व न्यायवैद्यकीय पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. श्‍वानाने अंकुश लांडगे यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या टेंपोपर्यंत माग काढला. टेंपोमध्ये पोलिसांना दोन काडतुसे, तीन तलवारी, दोन हॉकीस्टिक, दगडांचा ढीग आणि एक दुर्बीण आढळून आली. न्यायवैद्यक पथकाला गोट्यावरील हल्ल्याच्या ठिकाणी असलेल्या दोन दुचाकींजवळ बंदुकीची "7.65' एमएमची एक पुंगळी (गोळीचे शेल) व एक चेपलेली गोळी, दोन तलवारी आढळून आल्या.

पिस्तूल, तलवारी, कोयता, दगड त्याचबरोबर दुर्बीण आदी हत्यारांचा वापर या हल्ल्यात करण्यात आल्याने, हा पूर्वनियोजित कट असल्याच्या संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गोट्या व लकडे या दोघांना खासगी रुग्णालयातून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आणल्यानंतर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. त्यानंतर दोघांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. या वेळी शहरातील काही राजकीय नेत्यांसह सुमारे पाचशे जणांचा जमाव रुग्णालयात जमला होता. तेथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गोट्याचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी सुरवातीला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. प्रथम आरोपींना पकडा; मगच मृतदेह ताब्यात घेऊ, असा पवित्रा त्यांनी घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर नातेवाइकांनी गोट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मोठ्या पोलिस बंदोबस्तात गोट्याचा मृतदेह त्याच्या घरी नेण्यात आला. रात्री उशिरा बंदोबस्तामध्येच गोट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोट्या धावडेने मरणोत्तर नेत्रदान केले, याची शहरात चर्चा होती.

दरम्यान, घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत अंकुश लकडेच्या मृतदेहाबाबत रुग्णालयाशी कोणीही संपर्क साधलेला नव्हता.
पुढील चार-पाच दिवस एक निरीक्षक, तीन फौजदार, पंधरा कर्मचारी आणि दंगल काबू पथक धावडे वस्तीत तैनात करण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस आयुक्त सुधीर चौगुले यांनी सांगितले.

घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे भोसरी परिसरात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. घटनेनंतर भोसरी-धावडे वस्ती येथील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली.

वैमनस्यातून पाचवा खून 
वैमनस्यातून अंकुशराव लांडगे यांचा खून झाल्यानंतर प्रत्युत्तरादाखल गोट्या धावडेचे चुलते चंद्रकांत धावडे यांना मारहाण करून जाळण्यात आले होते. त्याचदिवशी बॅंकेच्या एका रिकव्हरी एजंटचाही खून करण्यात आला. सहा वर्षांनंतर गुरुवारी गोट्या आणि अंकुश लकडे यांचा खून करण्यात आला. त्यामुळे या वैमनस्यातून आत्तापर्यंत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
















......... अविनाश दुधवडे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)