चाकण पंचक्रोशीत डेंग्यू,मलेरियाला पोषक वातावरण


चाकण पंचक्रोशीत डेंग्यू,मलेरियाला पोषक वातावरण
ठिकठिकाणी डासांची हजारो उत्पत्ती स्थाने 
रुग्णालयांत वाढतेय रुग्णांची गर्दी 

चाकण :

डेंग्यू मलेरिया सारख्या साथीच्या आजाराने चाकण सह पंचक्रोशीतील वाड्या वस्त्या गेल्या पंधरावड्या पासून फणफणल्या असल्या तरी स्थानिक प्रशासन अद्यापही 
हलल्याचे चित्र दिसत नाही.स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या निष्क्रियपणामुळे या पंचक्रोशीत हा आजार फैलावत असल्याचा आरोप 
नागरिकांकडून करण्यात येत आहे . या बाबतची जनजागृती तर दूरच पण पाण्यात औषधे टाकणे आणि धुरळणी करणे यासारखे साधेसाधे उपाय ही करण्यात
आलेले नाहीत .

दररोज ची  सफाई मोहीम हाती घेतल्याचा दावा स्थानिक ग्रामपंचायती कडून होत असला तरी प्रत्यक्षात  अजूनही प्रमुख रस्ते, गटारींवर घाणीचे साम्राज्य 
पसरले आहे. कॉलनी परिसरात गटारींचे पाणी रस्त्यावर, मोकळया जागेत सोडल्यामुळे डासांची उत्पत्ती अधिक होत आहे. त्यातूनही डासांची निर्मिती होऊन 
डेंग्यू, मलेरिया या साथ आजारांना पोषक वातावरण तयार झाले आहे. या भागातील विवध ग्रामपंचायतीचा  आरोग्य आणि स्वच्छता विभाग अद्यापही अंग 
झटकून कामाला लागलेला नाही. चाकण शहरात सुद्धा कुठेही चांगली स्वच्छता दिसून आली नाही. आरोग्य, स्वच्छता विभाग आणि प्रशासन केवळ कागदी
घोडे नाचविण्याचा प्रकार करीत आहे.
 
डेंग्यू मलेरिया आदी साथींच्या पार्श्वभूमीवर या भागात मोठय़ा प्रमाणावर स्वच्छता मोहीम हाती घेतल्याचा दावा करणारी ग्रामपंचायती ची  प्रशासने  किती 
खोटारडी आहे हे पुणे नाशिक महामार्ग,चाकण शिक्रापूर राज्यमार्ग,व त्या रस्त्यांवरून विविध गावांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये जाणारे रस्ते ,या ठिकाणी 
फेरफटका मारल्यानंतर स्पष्ट होत आहे . चाकणच्या महत्वाच्या चौकांमध्ये ग्रामीण रुग्णालय परिसर ,आंबेठाण  रोड परिसर आदी सर्वच भागात  
अस्वच्छता दिसून येत आहे . अनेक ठिकाणी सांडपाण्याची कित्येक दिवसांपासून त्याच अवस्थेत असलेली डबकी पहावास मिळत आहेत. 
अनेक घरांसमोर उघडे पाण्याचे हौद ,सांडपाण्याचे प्रवाह पहावयास मिळत आहेत.त्यामुळे स्वच्छ पाणी, गटारी आणि साचलेल्या कचर्‍यामध्ये डासांची 
निर्मिती होत आहे.
  डेंग्यू आजाराच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असल्याचा दावा निरनिराळ्या गावांतील पदाधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या 
अधिकाऱ्यां कडून केला जात आहे. याशिवाय धुरळणी, पिण्याच्या पाण्यातील औषधांचे वाटप  आणि इतरही उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती
ठिकठिकाणच्या प्रशासनाकडून देण्यात येत असली ; तरी चाकण परिसरातील विविध लहान गावे वाड्या,वस्त्या मधील  परिस्थिती वेगळीच असल्याचे आढळून
येते. चाकण शहर भागात विविध कॉलन्यांमधील ओपन स्पेसमध्ये काटेरी झुडपे वाढली आहेत. खासगी रिकाम्या प्लॉटमध्ये काहींनी सांडपाणी सोडले आहे. 
या सगळ्या बाबींचा परिणाम म्हणून डासांची पैदास होऊन साथीच्या आजारांचा फैलाव होत आहे.
 या संदर्भात चाकण  ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी यांनी सांगितले कि,चाकण शहरात धुरळणी करण्याचे काम एका खाजगी संस्थेला 
देण्यात आले असून येत्या दोन दिवसांमध्ये हे काम सुरु होणार आहे.
 
 कचरा जैसे थे  - 
पुणे नाशिकल महामार्गावर तळेगाव चौकालगतच्या उड्डाणपूला खाली ,आणि आंबेठाण चौकालगतच्या उड्डाण पुला खाली या भागातील या महामार्गालगतच्या 
सेवा रस्त्यावरील (सर्व्हीस रोड)कचरा जैसे थे आहे. चाकण  तसेच चांगल्या वसाहतीत नागरिकांच्या घराजवळूनच गटारींचे पाणी जाते, भामा आसखेड 
धरणावरून आलेल्या जलवाहिन्यांचे पाइप एमआयडीसीतील काही भागात फुटल्यामुळे रस्त्यावर स्वच्छ पाणी येऊनही डास निर्मिती होत आहे.गेल्या काही दिवसांपासून 
भर दिवसा ही डासांचा उपद्रव वाढला आहे.
डेंग्यूला नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. आपल्या घरातील घाण, कचरा 
अस्ताव्यस्त फेकू नये, समोरच्या मोकळया जागेत टाकू नये, कचरापेटी असल्यास तेथे टाकावी किंवा ग्रामपंचायतीच्या घंटागाडीत टाकल्यास अधिक चांगले.
प्रत्येकाने आपल्या शेजारच्यांनाही काळजी घेण्याचे आवाहन करावे. घराजवळील मोकळया जागेत गटारींचे पाणी किंवा नळाचे स्वच्छ पाणी साचून डबके होणार 
नाही याचीही काळजी घेतली पाहिजे,आठवड्यातून एक ड्राय डे पाळला पाहिजे असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.जिल्ह्यात पुन्हा उपटलेल्या स्वाइन 
फ्लूबरोबरच डेंगीला व साथीच्या आजारांना आटोक्‍यात  आणण्यासाठी आरोग्य विभागाला कसरत करावी लागणार आहे. 

स्वच्छते अभावी गटारे झालीत बंद -
 ज्या भागात सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारींची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने गटारीच बंद
झाल्या आहेत. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होत आहे. गटारींची स्वच्छता न झाल्याने घाण, कचरा साचतच गेला आहे. चाकण 
शहरातील बलुतं आली,खंडोबा माळ,आंबेडकर नगर आदी अनेक भागात भागात गटारी बंद झालेल्या असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

 
नागरिकांनीही काळजी घ्यावी - डॉ.कोसे 
 चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एल.डी.कोसे यांनी या संदर्भात सांगितले कि,व्हायरल फिव्हर मुळे चाकण ग्रामीण रुग्णालयात तापाच्या 
तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय रित्या वाढली असून मलेरिया ,टायफॉईड सारखे रुग्ण आढळून आले असले तरी डेंग्यूची तपासणी येथे होत 
नसल्याने अशा संशियीतांच्या रक्ताचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात येत आहे.
 दरम्यान या भागातील अनेक जणांना थडी ताप व रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होण्याच्या प्रकारांनी ग्रासले असून डेंग्यूची लागण झाल्याने मागील पंधरवड्यात 
येथील एक मनसेचे पदाधिकारी रुग्णालयात उपचार घेत होते.त्यामुळे या बाबी धोक्याचीच नांदी असून तातडीने उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांकडून
होत आहे.
----------------------अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)