चाकण मध्ये १३ वर्षांच्या शाळकरी विद्यार्थ्याचा निर्घृण खून

चाकण मध्ये १३ वर्षांच्या शाळकरी विद्यार्थ्याचा निर्घृण खून
खून करून मृतदेह फेकला गटारात
चाकण: 



तेरा वर्षांच्या शाळकरी विद्यार्थ्याचा गळ्यावर जबरदस्त वार करून निघृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.८) सकाळी उघडकीस आला. खून करण्यात आल्या नंतर या विद्यार्थ्याचा मृतदेह पुणे नाशिक महामार्गावरील तळेगाव चौकालगतच्या उड्डाणपुलाखालील गटारात टाकून देण्यात आला होता. राजू हरिराम पुरोहित (वय १३,वर्षे रा. गोकुळ कॉम्प्लेक्स ,चाकण,ता. खेड,जि.पुणे) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शनिवारी (दि.७) सायंकाळी पाच वाजल्या पासून हा मुलगा बेपत्ता झाला होता. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता या मुलाचे वडील हरिराम पुरोहित व नातेवाईकांनी चाकण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर आज सकाळी त्याचा मृतदेह पाय बांधलेल्या अवस्थेत राहत्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर गटारात मिळून आला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
  घटनेनंतर त्याचा एक मित्र बेपत्ता झाला असून खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चाकण पोलीस ठाण्यात राजूचे वडील हरिराम प्रतापजी पुरोहित ( सध्या रा. गोकुळ कॉम्प्लेक्स चाकण ,मुळ रा. बिल्लड ,ता. रोनिवाडा जिल्हा जालोर, राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार राजू शनिवारी सायंकाळी पाच वाजनेचे सुमारास त्याच्या रियाज नावाच्या एका मित्रा सोबत बाहेर गेला तो परतलाच नव्हता. हरिराम यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे कि, त्यांचा भाऊ भवरलाल प्रतापजी पुरोहीत हा पाच वर्षांपूर्वी चाकण मध्ये स्टीलचा व्यवसाय करीत होता. मात्र एका महिलेशी अनैतिक संबंधामुळे तो व्यवसायात पूर्ण बरबाद झाला. व राजस्थान येथे गावी निघून गेला. मात्र त्या महिलेशी असलेले संबंध संपले नव्हते. अनैतिक संबंध असलेल्या त्या महिलेच्या संसाराचीसुद्धा या मध्ये राख रांगोळी झाली होती. त्या महिलेच्या पतीने तिच्या पासून फारकत घेत चाकण मध्ये एकट्यानेच राहणे पसंत केले होते. त्याने गोकुळ कॉम्प्लेक्स जवळ पानाची टपरी टाकली होती. मात्र हरिराम पुरोहित यांच्या भावामुळे आपल्या संसाराची वाट लागल्याचा राग त्याच्या मनात होता. यापूर्वीही त्याने याच कारणावरून पुरोहित यांना मारहाण केली होती. शनिवारी दुपार पासून त्याची टपरी बंद असून तो फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.  
रियाजसुद्धा गायब :
पुरोहित यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटल्या नुसार त्यांचे स्वताचे स्टील चे (लोखंड ) दुकान असून त्यांनी आपल्याच शेजारी रशीद हामिद खान (मुळ रा. उत्तर प्रदेश सध्या रा. खंडोबामाळ, चाकण)  यास भाड्याने दुकान दिले असून त्याच्या दुकानातील रियाज (पूर्ण नाव नाही) याच्याबरोबर खुन झालेल्या राजूची मैत्री होती.  झालेल्या शनिवारी सायंकाळी जेंव्हा राजू घराबाहेर पडला तेंव्हा त्याने आपण रियाज सोबत काही वस्तू खरेदी करण्यासाठी चाललो असल्याचे सांगितले होते. तेंव्हा पासून राजू बेपत्ताच होता. सकाळी त्याचा मृतदेह सापडल्या नंतर रियाज गायब झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
पोलीस ठाण्यात जमाव :
या घटनेनंतर नातेवाईक आणि परिसरातील सर्व राजस्थानी समाज बांधव पोलीस ठाण्यावर जमले. यावेळी खेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, अनिल ( बंडू )सोनवणे, राष्ट्र्वादीचे शहराध्यक्ष संदीप परदेशी, आदींसह राजस्थानी समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. पोलिसांनी तातडीने आरोपींना ताब्यात घेण्याचे आश्वासन दिल्या नंतर जमाव येथून निघून गेला. चाकण ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाल्या नंतर सायंकाळी पाच वाजनेचे सुमारास नातेवाईकांनी राजुचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेतला. या गंभीर प्रकाराबाबत चाकण पोलिसांची पथके तपासासाठी रवाना करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी सांगितले.
 दरम्यान राजू हा चाकण येथील पायस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत होता. अभ्यासात हुशार असलेला राजू आपल्या वडिलांच्या स्टीलच्या दुकानातही त्यांना मदत करण्यासाठी थांबत असे. राजूला दोन मोठ्या बहिणी व एक लहान भाऊही आहे. या घटनेने येथील राजस्थानी बांधवांसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

अविनाश ल. दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
Avinash L.Dudhawade,chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)