ह्युंदाई कंपनीतील 76 कामगारांना विषबाधा


ह्युंदाई कंपनीतील 76 कामगारांना विषबाधा
कांदा-पोह्याच्या न्याहारीत उंदराची पिल्ले
एक जन अत्यवस्थ






चाकण:
चाकण औद्योगिक क्षेत्रातील खालुंब्रे (ता.खेड) हद्दीतील ह्युंदाई कंपनीतील 76 कामगारांना आज (दि.8)सकाळच्या न्याहारीतून विषबाधा झाल्याने औद्योगिक परिसरात एकच खळबळ उ़डाली आहे. संबंधित कामगारांनी खाल्लेल्या कांदा-पोह्यामध्ये उंदराची पिल्ले सापडली असून  त्यातूनच ही विषबाधा झाली आहे.या सर्व कामगारांना सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालयात (ता. मावळ) उपचारार्थ दाखल करण्यात आले असून एका कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे .
 धनाजी जोगदंड या कामगाराची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.या घटनेची माहिती ह्युंदाई कंपनीचे मनुष्यबळ विकास विभागाचे अधिकारी कृष्णात दिनकर पाटील (रा. चिंचवड पुणे )यांनी चाकण पोलिसांना दिली.
 या बाबतचे वृत्त असे की,आज सकाळी नऊ वाजता या कंपनीत आदिक रिसोर्ट (कॅन्टीन चालक) यांच्या कडून न्याहारीसाठी आलेल्या  कांदा-पोह्यामध्ये लहान-लहान उंदराची काही पिले मृतावस्थेत आढळून आली.मात्र तत्पूर्वी कंपनीतील प्रोडक्शन शॉप मधील सुमारे शंभर कामगारांनी हे कांदा पोहे खाल्ले होते.
त्या नंतर काही वेळातच सर्व कामगारांना उलट्या,मळमळ,हगवण आणि चक्कर येणे त्रास सुरू झाला.मग हादरलेल्या कंपनी व्यवस्थापनाने तातडीने सर्व कामगारांना सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालयात (ता. मावळ) उपचारार्थ दाखल केले.त्यातील सोळा जणांना उपचारां नंतर सोडून देण्यात आले असून 60 कामगारांवर अद्याप उपचार सुरु आहेत. त्यातील धनाजी जोगदंड या कामगाराची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.विषबाधा झालेल्या कामगारांमध्ये यशस्वी इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे (वाय आय टी )सुमारे 30 कामगार त्याच प्रमाणे कंपनीचे काही कामगार व ठेकेदारांचे काही कामगारांचा समावेश आहे.चाकण पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटना स्थळी धाव घेतली असून उंदराची पिले आढळलेले पोहे ताब्यात घेतले आहेत.चाकण चे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी पवना रुग्णालयात जावून रूग्णांची भेट घेवून,विचारपूस केली व परिस्थितीची माहिती घेतली.या बाबत चाकण पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
 दरम्यान या बाबत संबंधित कंपनीतील काही कामगारांनी सांगितले की, यापूर्वीही कंपनीकडून देण्यात येणाऱ्या न्याहारीमध्ये किडे मुंग्या सापडल्याचे वारंवार संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते ,मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अशी मोठी घटना घडली आहे.मात्र असे प्रकार या पूर्वी घडलेच नसल्याचे
कंपनीचे अधिकारी कृष्णात पाटील यांनी सांगितले.तर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी नंदकिशोर शर्मा यांनी सांगितले की,विषबाधा झालेल्या कुठल्याही कामगाराची प्रकृती चिंताजनक नाही.

खेळ कामगारांच्या जीवाशी:
कारखान्यांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा तपासणारी कोणतीही यंत्रणा उपलब्ध  नसल्याची बाब अधोरेखित होत आहे.अगदीच निकृष्ट दर्जाचे अन्न काही कंपन्यांकडून कामगारांच्या माथी मारले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.कंपन्यांमध्ये असलेले बहुतांश कॅन्टीन चालक दंडुकशाहीने हे ठेके चालवीत असल्याने
त्यांच्या विरोधात कामगाराच काय ,कंपन्यांचे व्यवस्थापनही ब्र शब्द काढत नसल्याची वस्तुस्थिती आहे.त्यामुळे थेट कामगारांच्या जीवाशीच खेळ सुरु असल्याचे चित्र चाकण एमआयडीसीतील अनेक कंपन्यांत सर्रास पहावयास मिळत आहे.

---------अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)