डोंगर कातळ फोडण्यासाठी सर्रास स्फोटकांचा वापर


डोंगर कातळ फोडण्यासाठी सर्रास स्फोटकांचा वापर

चाकण: 
   चाकण एमआयडीसी परिसरात जमिनींना आलेल्या सोन्याच्या मोलाने काही बाहुबली मंडळीनी डोंगर टेकड्यांना लक्ष केल्याची बाब वेळोवेळी समोर आली आहे.या साठी असलेले सगळे प्रचलित नियम धाब्यावर बसवून डोंगर,टेकड्या फोडून दगड फोडण्यासाठी ब्रेकर सारखी यंत्रणा खर्चिक होत असल्याने येथे सर्रास चक्क जिलेटीन, अमोनियम नायट्रेट आदी स्फोटकांचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. मोठमोठ्या  दगडांना -कातळाला भोके पाडायची, त्यात जिलेटीनच्या कांड्या ठासून भरायच्या आणि सेफ्टी फ्यूजच्या वायरी लावून मध्यरात्री धडाका उडवून द्यायचा,असे अघोरी प्रकार होत आहेत.
 
  राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा या वर्णनाला चाकण एमआयडीसी परिसरात असा सुरुंग लावला जात आहे.पुणे जिल्ह्याचा औद्योगिक पट्टा आणी आसपासच्या परिसरात जागांच्या किंमतीत झालेली प्रचंड वाढ गेल्या काही वर्षांपासून टेकड्या आणि लहान मोठ्या डोंगरांच्या मुळावर आली आहे.चाकण सारख्या भागात तर  डोंगर,टेकड्या नामशेष करण्याचा विडाच काही मंडळीनी भक्कम राजकीय पाठबळावर उचलला आहे . सर्रास सगळे नियम धाब्यावर बसवून मोठ मोठे दगड कातळ खिळखिळे करून जमीन दोस्त करून टेकडय़ा फोडून पाडण्यात येणाऱ्या भूखंडा मुळे टेकड्यांचे अस्तित्व एकीकडे धोक्‍यात आले असताना दुसरीकडे डोंगर फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शक्तीशाली जिलेटीन कांड्याच्या सातत्याने होत असलेल्या ब्लास्टिंगच्या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 चाकण एमआयडीसी मध्ये कुरुळी,निघोजे,महाळुंगे,खराबवाडी या भागात असले प्रकार राजरोस सुरु आहेत.खराबवाडी हद्दीतील वाघजाईनगर भागात या पद्धतीने मोठ्या प्रमाणात खोदाई झाल्याचे निदर्शनास येत आहे, ब्रेकर सारख्या यंत्राच्या साह्याने दगड फोडण्याचे काम अधिक खर्चिक असल्याने हे प्रकार घडविले जात आहेत. ब्लास्टिंग करिता वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांचा परवाना आहे किंवा नाही व कोणत्या स्वरूपाची स्फोटक वापरली जात आहेत , याची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.संबंधित भक्कम राजकीय पाठबळ असलेल्या बाहुबली मंडळीं असल्याने बाबत पुढे येवून बोलण्याचे अथवा विरोध करण्याचे धारिष्ट्य मात्र कुणीही दाखवीत नाही.कारण सरकारी यंत्रणा यासंबंधी कळवूनही किती दखल घेईल या बाबत सर्वांच्याच मनात शंका आहे.संबंधित बाहुबली मंडळीं विरोधात कोणी बोलावे, तर कोण कसा काटा काढेल नेम नाही. संसार कुटुंबाची त्यांच्या सुरक्षेची सर्वांनाच काळजी आहे.बड्या-बड्या राजकीय व्यक्तींच्या नावाखाली  चालणाऱ्या या प्रकारांची सध्या चलती आहे.त्यामुळे सामान्यांना  त्यांची भिती वाटते.म्हणून या बाबत धाडसाने वाच्यता होत नसल्याची वस्तूस्थिती आहे.दरम्यान या बाबत खेडचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी सांगितले की,अशा प्रकारे स्फोटकांचा वापर करण्यास बंदी असून या बाबतची माहिती घेण्यात येईल.

पाळेमुळे खोदण्याचे दिव्य ?
  जिलेटीनच्या कांड्या आणि अमोनियम नायट्रेटचा यासाठी बेकायदेशीर पणे होणारा पुरवठा नेमका कोठून होतो हा संशोधनाचा भाग आहे.एकवेळ दगडखाणी ,डोंगर -टेकड्या उध्वस्त करण्यासाठीच याचा वापर होतो ते ठीक आहे मात्र त्याचा अन्य असामाजिक कामासाठी वापर होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेणे गरजेचे आहे.कारण अमोनियम नायट्रेट बॉम्बमध्ये वापरण्यात येत असल्याने तसेच परवाना नसताना संबंधित मंडळींकडून हा साठा करण्यात येत असल्याने त्याविषयी संशय व्यक्त होत आहे.या धक्कादायक प्रकारांची पाळेमुळे खोदण्याचे दिव्या प्रशासनाला पार करावे लागणार आहे.
---------

                                                                                      अविनाश दुधवडे,चाकण,९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)