खेड तालुक्यातील दोन खुनांतील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
चाकण:
कोरेगाव खुर्द (ता.खेड) आणि कुरकुंडी येथील खून केल्यानंतर फरार झालेल्या दोघांना चाकण पोलिसांच्या पथकाने आज(दि.24) आज शिताफीने अटक केली. एकाच पद्धतीने लागोपाठ झालेल्या दोन खुनांमुळे हादरलेल्या चाकण पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून हैद्राबाद,मुंबई,लोणंद, संगमनेर,शिर्डी, बालाजी, आदी ठिकाणी विशेष पथकांकडून या आरोपींचा कसून शोध सुरु होता. अखेर हे दोघे जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. आळेफाटा येथे हे दोघे वास्तव्यास असताना पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे .
संतोष मधुकर मांजरे (रा.कोरेगावखुर्द ,ता.खेड) , सागर बाळू जावळे (रा.कुरकुंडी,ता.खेड) अशी या खून प्रकरणी चाकण पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. संतोष मांजरे हा दोन खून प्रकरणात तर जावळे हा एका खून प्रकरणात पोलिसांना हवा होता.
मागील महिन्यात (14 मार्च 2013)कोरेगाव खुर्द (ता.खेड) येथील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष दतात्रेय नामदेव घनवट यांचा तलवारी आणि कोयत्यांनी सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेत संतोष मांजरे व त्याचा एक साथीदार यांच्यावर चाकण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
मांजरे याचा साथीदार पोलिसांनी पकडला होता ,मात्र मुख्य आरोपी असलेला मांजरे मात्र फरारीच होता. त्या नंतर एकाच महिन्याच्या आत (दि.13 एप्रिल )धनंजय वसंत आवटे (वय 38,रा.कुरकुंडी,ता. खेड) यांचा पिस्तुलातून गोळी झाडून व कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार कुरकुंडी (ता.खेड) घडला. यात
सागर जावळे हा मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांना संशय होता. कुरकुंडी (ता.खेड) येथील खुनाच्या घटनेला नाट्यमय कलाटणी मिळाली व कुरकुंडी गावचा सरपंच कैलास यशवंत कोळेकर (सध्या रा.थिगळस्थळ ,राजगुरुनगर ,मूळ रा. कुरकुंडी,ता. खेड) यानेच हा प्रकार सुपारी देवून घडवून आणल्याच्या संशयातून पोलिसांनी या सरपंचाला अटक केली. यातील धक्कादायक बाब म्हणजे महिनाभरापूर्वी कोरेगाव खुर्द येथे झालेल्या खुनात आरोपी असलेल्या फरारी संतोष मांजरे यानेच हा खूनही सागर जावळे याच्या साथीने सुपारी घेवून केल्याचे पोलीस तपासात निषन्न झाल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले व पोलिसांची झोप उडाली होती. त्यानंतर चाकण पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून हैद्राबाद,मुंबई,लोणंद, संगमनेर,शिर्डी, बालाजी, आदी ठिकाणी विशेष पथकांकडून या आरोपींचा कसून शोध सुरु केला होता ,मात्र त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता त्यामुळे चाकण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर चाकण चे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरीक्षक मधुकर थोरात ,राजू पवार, रमेश नाळे, यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी आळेफाटा येथे नियोजन बद्ध सापळा लावून अचानक छापा घालून आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
दोन्ही खुनांतील साम्य :
कोरेगाव खुर्द आणि कुरकुंडी या दोन्ही खुनात पोलिसांना बरेच साम्य आढळले होते. दोन्ही खुनांमध्ये सकाळचीच नऊ च्या दरम्यानची वेळ निवडण्यात आली होती. रस्त्यात आडव्या लावण्यासाठी व कट मारण्यासाठी दुचाक्यांच्या वापर करण्यात आला होता. दोन्ही खुणांच्या प्रकारात कोयत्यांनी अनेक सपासप वार करण्यात आले होते.
आता यातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने अनेक धक्कादाय घटनांवर प्रकाश झोत पडण्याची शक्यता असल्याचा पोलिसांना विश्वास आहे . अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा