चाकणमध्ये बोगस संमती पत्रे दाखवून लाटला रस्ता
चाकणमध्ये बोगस संमती पत्रे दाखवून लाटला रस्ता
पुणे जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षकाच्या पत्नीचा समावेश
बिंग फुटले ;मात्र अद्याप कारवाई नाही
चाकण:
स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारींमुळे खुद्द ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याचे चाकण परिसरातील 66 गुंठे जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून तिचा एफएसआय शेजारील बांधकामासाठी वापरल्याचे बिंग फुटले असले तरी पोलीस प्रशासनाकडून सावध पावले टाकण्याची भूमिका घेतली जात असून या प्रकरणी अद्याप स्थानिक पोलिसांनी कुठलीही माहिती नाही असे सांगत कानावर हात ठेवले आहेत.
चाकण परिसरातील शिल्पा येणजे ,छाया नगरे,कविता लंजीले ,प्रमोद लढे यांनी खंडू पानसरे यांची जमीन गट क्रमांक 1153 शेजारील 1154 व 1155 या गट क्रमांकाच्या जमिनी 2007-2008 मध्ये खरेदी केल्या होत्या.डॉ. चारुदत्त जोशी व कविता लंजीले यांनी पाच वर्षांपूर्वी ही जमीन खेड च्या प्रांत कार्यालयात अकृषिक परवानगी साठी अर्ज दाखल केला होता. नगर रचना विभागाकडे या बाबतची रस्त्याची कागदपत्रे सादर करताना लगतच्या शेतकऱ्यांची बोगस संमती पत्रे दाखल करण्यात आली होती असा खडू दगडू पानसरे यांच्यासह आठरा शेतकऱ्यांचा आरोप आहे. जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून तिचा चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजेच एफएसआय (फ्लोर स्पेस इंडेक्स)शेजारील बांधकामासाठी वापरल्याची तक्रार येथील स्थानिक काही शेतकर्यांनी केली आहे.चाकण शिक्रापूर रस्त्यावर बालाजी ग्रीन व्हॅली डेव्हलपर्सने मोठमोठ्या इमारती उभारल्या आहेत. ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक बलराज लंजिले यांच्या पत्नी कविता या गृहप्रकल्पात भागीदार आहेत. या इमारतीस शासकीय परवानगी मिळण्यासाठी 9 मीटर रस्ता दाखविणे आवश्यक होते. हा रस्ता नकाशावर दाखविता यावा यासाठी संबंधित बांधकाम व्यावसायिकाने बनावट कागदपत्रे तयार त्याआधारे एफएसआय वापरला असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
या प्रकरणात खुद्द ग्रामीण पोलीस दलातील अधिकार्याची पत्नी असून याबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशीचे सोपस्कर केले जात आहे. 18 शेतकर्यांच्या मालकीची ही जमिन आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे या जमिनीवर एफएसआय घेण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर बिल्डरकडून झालेल्या फसवणुकीची तक्रार या शेतकऱ्यांनी पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया व जिल्हाधिकारी कार्यालयात केली आहे. बलराज लंजिले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
म्हणून उघडकीस आला प्रकार...
चाकण मध्ये काही दिवसांपूर्वी राज घनवट या बिल्डरवर आणि आर्किटेक्ट सुहास गोरे यांच्यावर खोट्या संमती पत्रांच्या आधारे नगररचना विभागातून नकाशे मंजूर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल होऊन गजाआड व्हावे लागले होते.या घटनेचा तपास ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक बलराज लंजिले यांच्याकडेच होता. त्यामुळे या बिल्डरने पोलीस निरीक्षक बलराज लंजिले यांच्या चाकण मधील जागे बाबतची माहिती मिळवीत थेट पोलिसांकडेच बोट दाखविले . व आपल्यावर झालेली कारवाई अन्याय कारक असून खुद्द पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या याच तपासातील पोलीस अधिकाऱ्याने चाकण मध्ये आपल्या पत्नीच्या नावे जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून तिचा एफएसआय शेजारील बांधकामासाठी वापरल्याचे बिंग फोडले .त्यामुळे नगररचना विभागात नकाशा मंजूर करून घेताना त्यांनीही याच पद्धतीने गैरमार्गाचा अवलंब केला मग त्यांच्यावर कारवाई का नाही ? अशी ओरड करीत आरोप केले होते त्यामुळे या बाबत तक्रारी झाल्या होत्या अशी माहिती प्राप्त झाल्याचे असे उपविभागीय पोलीस अधिकारी भारत पाटील यांनी सांगितले.मात्र या बाबत कुठल्याही प्रकारचा गुन्हा येथील स्थानिक पोलीस ठाण्यात अद्याप पर्यंत नोंदविण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे .
तर चाकण चे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी राज घनवट या बिल्डरवर आणि आर्किटेक्ट सुहास गोरे यांच्यावर खोट्या संमती पत्रांच्या आधारे नगररचना विभागातून नकाशे मंजूर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता असे सांगितले.
---------------- अविनाश दुधवडे,चाकण ९७६५५६६९०८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा