खेड बाजार समितीने केले तीनशे जणांचे परवाने रद्द
खेड बाजार समितीने केले तीनशे जणांचे परवाने रद्द
शेतकरी,भाजी विक्रेते,आडते आंदोलनाच्या पवित्र्यात
चाकण:
खेड कृषी उत्त्पन्न बाजार समितीने खरेदी विक्री (विकास नियमन) नियमाचे कारण पुढे करीत तब्बल 300 जणांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला असून संबंधिताना अनामत रकमांचे धनादेश परत पाठविण्यात आले आहेत .आश्चर्याची बाब म्हणजे लायसेन्स (परवाना)कमिटीचे अध्यक्ष व बाजार समितीचे संचालक बाळासाहेब गोरे यांनाही या बाबत अंधारात ठेवण्यात आले आहे.या विरोधात चाकण परिसरातील शेतकरी,गोरगरीब भाजी विक्रेते यांनी आज(दि.15) आयोजित केलेल्या बैठकीत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.आडत्यांनीही या अन्यायकारक निर्णया बाबत तातडीने पुनर्विचार न केल्यास शेतकरी,गोरगरीब भाजी विक्रेते यांना पाठींबा देवून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीने चाकण मार्केट यार्डातील भाजीपाला व कांदा बटाटा विभागातील एकूण 300 गोरगरीब शेतकरी ,भाजी विक्रेते यांना परवाने नुतनीकरण करण्यास नकार देत त्यांचे परवाने रद्द केले आहेत.या बाबत चाकण मार्केट यार्डात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सर्वानीच संताप व्यक्त केला.या बैठकीसाठी खुद्द बाजार समितीच्या परवान्यांचे अधिकार असणाऱ्या लायसन्स कमिटीचे अध्यक्ष आणि संचालक बाळासाहेब गोरे यांच्यासह कांदा बटाटा आडते असोसिएशनचे अध्यक्ष राम गोरे,तरकारी असोसिएशनचे हरिभाऊ गोरे,कुमार गोरे,संजय वाहिले,गणेश झगडे,प्रवीण खळदकर,आदींसह शेतकरी ,आडते मोठ्या संखेने उपस्थित होते.लायसन्स नुतनीकरण कमिटीचे अध्यक्ष आणि संचालक बाळासाहेब गोरे यांनी यावेळी सांगितले की,परवाने रद्द करण्याच्या निर्णयासंदर्भात आपणास कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती.एखाद्या संचालकांच्या आतेताई पणा मुळे सर्वांना वेठीस धरण्याचा निर्णय दुर्दैवी आहे.आडते असोसिएशनचे अध्यक्ष राम गोरे व कुमार गोरे यांनी परवाने रद्द करण्याच्या निर्णयास कडाडून विरोध केला असून या बाबत शासनाकडे आणि न्यायालयात जनहित याचिकेच्या माध्यमातून दाद मागितली जाणार आहे.बाजार समितीने या बाबत सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे,एका व्यक्तीने तीन पेक्षा अधिक जणांना जमीन असू नये या नियमाने काही जणांच्या परवान्यांना केराची टोपली दाखविताना त्यांना पूर्वसूचना देण्याची गरज होती,मात्र थेट परवाने रद्द करण्यात आल्याने या मागे बाजार समितीच्या निवडणुकांचे राजकीय षड्यंत्र असल्याचे स्पष्ट पणे दिसत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
कारवाई नियमानुसार :चांभारे
बाजार समितीच्या आदर्श उपविधी क्रमांक 7 मध्ये त्रयस्थ इसमाची हमी एक व्यक्ती तीन पेक्षा अधिक जणांना जमीन राहण्यास पात्र नसते मात्र काही जामीनदार अनेकांना जामीन असल्याचे निदर्शनास आले आहे,तसेच काही मंडळींनी एक आठवड्यापेक्षा अधिक काळ व्यापार केलेला नसल्याचे निदर्शनास आल्याने 2013-2014 या वर्ष करीता संबंधित 300 जणांचे परवाने नुतनीकरण समितीने नामंजूर केले आहेत.29 मार्च 2013 रोजी झालेल्या बाजार समितीच्या मासिक सभेमध्ये या बाबतचा ठराव करण्यात आला आहे ,या निर्णया विरोधात संबंधिताना आपले म्हणणे दुय्यम निबंधकांसमोर मांडता येणार आहे असे बाजार समितीचे सचिव सतीश चांभारे यांनी सांगितले.
शेतकरी,विक्रेते म्हणतात ...
बाजार समितीच्या या निर्णया बद्दल शेतकरी शांताराम बाळा गोरे यांनी सांगितले की,माझ्याकडे गेले तीस व्यापार केलेल्या विविध पावत्या असताना माझे लायसेन्स रद्द करताना कोणता निकष वापरला गेला तेच कळत नाही.भाजी विक्रेते महेंद्र गोतारणे यांनी सांगितले की,गेल्या तीन वर्षांपासून नियमित पणे व्यापार सुरु असतानाही आमच्या अनेक विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले.उदार निर्वाहाचे हे एकमेव साधन असणारे अनेक विक्रेते यामुळे देशोधडीला लागणार आहेत.या बैठकीमध्ये या संपूर्ण प्रकारासाठी बाजार समितीचा एक धनाढ्य संचालकच जबाबदार असून त्यानेच राजकीय सूडबुद्धीने हा प्रकार घडविल्याचा आरोप अनेक शेतकरी ,विक्रेते,आडत्यांनी केला .बाजार समितीच्या या निर्णयाने सर्वात मोठी उलाढाल असणाऱ्या चाकण उपबाजारात नवा संघर्ष सुरू झाला आहे.
----------------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा