नुसती डागडुजी करून काय साधणार ?


नुसती डागडुजी करून काय साधणार ?
तळेगाव -चौफुला राज्यमार्ग रखडलेलाच

चाकण:
   पुण्यातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आखण्यात आलेला तळेगाव-चाकण-शिक्रापूर-चौफुला हा चौपदरी मार्ग नक्की कधी मार्गी लागणार हे कोणीही ठोस पणे सांगू शकत नाही.या रस्त्यावरील अपघातांची शृंखला पाहता या रस्त्याचे काम प्राधान्याने होण्याची गरज असताना या रस्त्यावरील केवळ खड्डे बुजवून मलमपट्टी होत आहे.या संपूर्ण रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम करावे नुसती डागडुजी करून काही होणार नाही अशी नागरिकांमध्ये मागणी आहे.
 शासन वडगावमावळ -तळेगाव-चाकण- शिक्रापूर-चौफुला हा मार्ग खाजगीकरणातून करणार असून अवजड वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांना पायबंद बसावा यासाठी हा रस्ता होणे गरजेचे आहे.शासनाच्या चालढकलपणा मुळे मंत्रिमंडळाची मंजुरी मिळून तीन वर्षे लोटल्या नंतरही व रस्त्याच्या कामाच्या खर्च कोट्यावधी रुपयांनी वाढतच आहे.कामाच्या दिरंगाईमुळे यासाठीच्या  निविदेचा आकडा चक्क  कोट्यावधीने  वाढला आहे .निरनिराळ्या अडचणीत सापडलेला या रस्त्याचे काम रखडलेलेच आहे.खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण मधील जाहीर कार्यक्रमांमध्ये या रस्त्याचे काम लवकरच होणार असल्याचे सांगूनही त्या दृष्टीने अद्याप एकही काडी हलल्याचे दिसत नाही.चाकण च्या तळेगाव चौकात या रस्त्याला अनेक दिवसांपासून खड्डे पडलेले आहेत.त्या बाबत उशिरा जागे झालेल्या प्रशासनाने केवळ खड्ड्यात भर घालण्याचे काम सुरु केले आहे.रस्ते दुरुस्ती करणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आहे. त्यांच्या अधिकार ज्या रस्त्यांवर आहे त्या रस्त्यांचीही  दुरवस्था झाली असल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे. या भागातील सार्वजनिक बांधकाम विभाग तर जणू काही शहरातील रस्त्यांशी आपला काही संबंधच नाही, या तोर्‍यात वागत आहे.

निविदांची रक्कम वाढतेय कोट्यावधींनी:
शासनाच्या मंजुरीमुळे बांधकाम खात्याने एप्रिल 2010 मध्ये सदर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या निविदा मागवल्या होत्या. यात वडगाव-चाकण यांसह शिक्रापूर, न्हावरा, महामार्ग क्र 55 व न्हावरा केडगाव, चौफुला महामार्ग क्र . 62 या चौपदरीकरणाचा समावेश होता. निविदा प्रक्रिया सुरू असून, पावसाळा झाल्यावर म्हणजे ऑक्टोबरमध्ये चौपदरीकरणाचे काम सुरू होईल, अशी माहिती दोन वर्षापूर्वी वर्षात बांधकाम खात्याकडून देण्यात येत होती. मात्र दोन  वर्ष उलटले तरी चौपदरीकरणास सुरुवात झालेली नाही. 2010 मध्ये वडगाव-चाकण या महामार्गाच्या निविदा बांधकाम खात्याने मागवल्या होत्या. त्यावेळे पेक्षा निविदेची रक्कम कोट्यावधी रुपयांनी वाढून ती तब्बल 750 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती.आता हा खर्च आणखी कोट्यावधी रुपयांनी वाढला असून नेमका किती आणखी खर्च वाढल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
                                                                      अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)