वन विभागाच्या हद्दीतली झाडे वाळली




वन विभागाच्या हद्दीतली झाडे वाळली
चाकण:
पाण्याअभावी चाकण आळंदी रस्त्यावरील वनविभागाच्या हद्दीतील सर्वच झाडे वाळून गेली आहेत. या तील काही झाडे आता किटकांनी पोखरण्यास सुरुवात केली आहे. वाळून गेलेल्या झाडांमध्ये जंगली झाडांसोबतच लिंब, वड, पिंपळ आदी बहुउपयोगी झाडांचाही  समावेश आहे. सर्वच झाडे निष्पर्ण झाल्याने यंदाच्या उन्हाळ्याची दाहकता अधोरेखित होत आहे. खेड तालुक्यातील काही गावांमध्ये दुष्काळामुळे प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही अशी बिकट अवस्था झाली आहे. कमी झालेला पाऊस ,दुष्काळाची तीव्रता आणि आणि यंदाचा असह्य उन्हाळा याचे दर्शन यंदा आतापासूनच या वनविभागाच्या हद्दीत पहावयास मिळत आहे.

 येथील वनविभागाच्या हद्दीतील डोंगरकपारीतील झाडांना सतत लागत असलेल्या वणव्यांमुळे डोंगर काळेकुट्ट व भकास होत असल्याचे सर्वश्रुत आहेच. येथील विविध प्रकारच्या झाडांचे व वृक्षांचे अज्ञातांनी लावलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन पर्यावरणाची व निसर्गसंपदेची हानी झाल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. या कडे वनविभागानेही सोईस्कर दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यातच आता यंदाचा  कमी पाऊस आणि उन्हाचा चढता परा यामुळे येथील झाडे अक्षरशः वाळून वठून चालली आहेत, लिंब, वड, पिंपळ आदी बहुउपयोगी झाडांची यात मोठी हानी होत आहे.या झाडांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वाढ झालेले गवत असून, ते सुद्धा या कडक उन्हाने वाळून गेले आहे. या गवताला काही लोक गंमत म्हणून, तसेच मुद्दामहून आग लावत असल्याने लागलेल्या आगीत बाजूची नवीन झाडेझुडपे, तसेच वृक्ष जळून खाक होत आहेत. काही झाडांना आगीच्या ज्वालांची धग लागल्याने झाडे करपून जात आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
----------
               अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)