बैलांच्या खरेदी विक्रीत होतेय वाढ



किमतींचा आलेख चढता  
शर्यत बंदी उठल्या नंतरचे चित्र

चाकण:अविनाश दुधवडे
       बैलगाडा शर्यत बंदीला स्थगिती मिळाल्यानंतर चाकण मधील बैल बाजारात कमी झालेले बैलांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार चांगलेच वाढू लागले आहेत.शर्यतीच्या बैलांना मिळत असलेल्या भरपूर किमतींमुळे राज्याच्या विविध भागातून येथे बैल विक्रीसाठी येत असल्याची स्थिती आहे. खास  शर्यतीच्या बैलांना येथे मागणी असल्याने विविध जातींचे बैल येथे विक्रीसाठी आणण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.त्यामुळे काही भागातील शेतकरी दुष्काळी परिस्थिती मुळे चारा पाण्याच्या दुर्भिक्ष जाणवत असल्याने आपल्या शेती कामाच्या बैलांना थेट बाजाराचा रस्ता दाखवू लागले आहेत,तर काही गाडा मालक शेतकरी हौसे खातर
लाखो रुपये मोजून शर्यतीचे बैल खरेदी करीत असल्याचे विपर्यस्त चित्र येथील बाजारात पहावयास मिळत आहे.
  या शनिवारी येथील बाजारात विक्रीसाठी आलेल्या 360  बैलांपैकी 205 बैलांची विक्री झाली व 10 हजार रुपयांपासून 25 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाले चाकण येथील या जनावरांच्या बाजारात तब्बल 1 कोटी 35 लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास कातोरे व सचिव सतीश चांभारे यांनी सांगितले.

टाटांच्या नॅनो पेक्षा बैलजोडी महाग :
गेल्या काही वर्षांपूर्वी ग्रामीण जनतेच्या दळणवळणाचं महत्त्वाचं साधन असलेल्या बैलगाडीला आज तसं फारसं स्थान नसलं तरी बैलांच्या वाढत्या किमतीबरोबरच लाकूड व कारागिराच्या वाढलेल्या मजुरीमुळे शेतकऱ्यांचे वाहन असलेली ही बैलजोडी ‘नॅनो’ कारपेक्षाही महागडी झाली असल्याचे शेतकरी सांगतात . चांगल्या प्रतीची बैल जोडी साठ हजारां पासून लाख रुपयांपर्यंत आहे. शर्यतीच्या नामांकित बैलांच्या जोड्यांच्या किमतींच लाखांच्या पुढे सुरु होतात.  टाटांनी सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत एक लाख रुपयात नॅनो कार उपलब्ध करून दिली. पण एकेकाळी ग्रामीण जीवनाचा आधार ठरलेल्या बैलगाडीची किंमत सध्या दीड ते दोन लाख रुपयांवर गेली आहे. एका धष्टपुष्ट बैलाची किंमत 40 ते 80 हजार रुपयांपर्यंत गेली आहे. बैलजोडीसाठी एक लाख ते दीड लाख रुपये मोजावे लागत आहेत, तर बैलगाडी तयार करण्यासाठी 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो.त्यामुळे आजच्या घडीला ‘नॅनो’ स्वस्त व बैलगाडी महाग अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

----------------------------
                                                                                    Avinash Dudhawade, chakan   9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)