...तर देश राजकारण्यांनी विकला असता



                                                                     
                                                                     
                                                                     
                                             
...तर देश राजकारण्यांनी विकला असता : समीरण वाळवेकर 

चाकण:  
लोकशाहीच्या इतर स्तंभांपेक्षा माध्यमे जनतेच्या सदासर्वकाळ बरोबर असतात. ती कोणाला बधणारी नाहीत. माध्यमांमुळे जग सजग आहे; अन्यथा आपला देश राजकारण्यांनी विकला असता, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांनी चाकण ( ता. खेड) येथे केले. 
 जनता शिक्षण संस्थेच्या चाकण येथील श्री शिवाजी विद्यामंदिर प्रशालेच्या प्रांगणात चाकण रोटरी क्लबच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या (कै) शेठ धनराजजी सांकला स्मृती व्याख्यानमालेत "प्रसारमाध्यमे स्वातंत्र्य की स्वैराचार ' या विषयावर अखेरचे पुष्प गुंफताना वाळवेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील होते. वाळवेकर म्हणाले, राजकारण्यांवर प्रसारमाध्यमांचा दबाव आहे. एरवी राजकारणी बोलतात एक आणि करतात एक; परंतु आता थेट पडद्यावर बोलत असल्याने लपविता येत नाही. मात्र ते आपल्याला हवे तेच पत्रकारांशी बोलून जनतेपर्यंत पोचवितात. अलीकडे फोन टॅपिंगसारखे प्रकार सुरू झाल्याने दबाव वाढला आहे; परंतु माध्यमातही काही नाठाळ मंडळी आहेत; पण ती हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहेत. माध्यमांनीही स्वातंत्र्य काय आणि स्वैराचार काय तसेच माहिती आणि बातमी यातील फरकाची रेषा आखून घेतली पाहिजे. आगामी काही वर्षात निवडणुका माध्यमांच्या मार्फत लढविल्या जातील असे भाकीतही त्यांनी केले. व सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. कोणतेही सरकारी काम पैशाशिवाय होत नाही. माध्यमांमुळे हे नजरेस येत असून काही प्रकरणे पुन्हा सुरू करावी लागली आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन वाळवेकर यांनी येथे केले.   रोटरीचे उपप्रांतपाल भगवान घोडेकर यांनी प्रास्ताविक केले तर , उद्योगपती मोतीलाल सांकला यांनी आभार मानले. चाकण येथील श्री शिवाजी विद्यामंदिर प्रशालेच्या प्रांगणात चाकण रोटरी क्लबच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या (कै) शेठ धनराजजी सांकला स्मृती व्याख्यानमालेची उत्साहात सांगता झाली.  यंदाच्या व्याख्यानमालेसाठी अवधूत गुप्ते, यशवंत गोसावी, व्ही.डी.भट्ट ,डॉ.रफिक सय्यद, रेणुका गावस्कर आदींची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती, त्यामुळे चाकण पंचक्रोशीतील श्रोते वर्ग मोठय़ा संख्येने सर्वच व्याख्यानांसाठी उपस्थित होता. 

तर आयुष्य होईल उद्धवस्त :
माध्यमांनी बातम्या देताना भान ठेवले पाहिजे ,एखादी बातमी एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उद्धवस्त करू शकते असा सल्ला या व्याख्यान मालेच्या सांगता समारंभाचे अध्यक्ष व  खेड चे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला.  

----------Avinash Dudhawade,chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)