निवडणुकांची लगीन घाई
निवडणुकांची लगीन घाई
एकदा एका गावात .. मोठी लगीन घाई झाली
पायताणं नाही कुणाच्या .. पायामध्ये राहिली ।
फेटे आणि मुंडाशी .. डोईवर चढली
बिलवर , पाटल्या संगे .. नथ ही झुलली.....
याच कविते प्रमाणे सगळीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची लगीन घाई पहावयास मिळत असून आपलीच उमेदवारी
निश्चित होईल या अविर्भावात इच्छुक उमेदवार अंग झटकून कामाला लागले आहेत.राष्ट्रवादी वगळता या भागात बहुतेक पक्षांच्या
उमेदवारांची निश्चिती झाल्याचे मानण्यात येत असून मी सांगेन त्यांनीच निवडणुका लढवायच्या असा सज्जड दमच दादांनी भरल्याने
राष्ट्रवादीच्या कडव्या इच्छुकांनी दादा नामाचा जोरदार जप सुरु केला आहे.हाताच्या बोटावर मोजण्या इतपत दिवसांत प्रचाराची धुळवड
खेळायची असल्याने गट,गणातील उमेदवारी तातडीने निश्चित करताना विविध राजकीय पक्षांची तर मतदारांपर्यंत पोचताना उमेदवारांची
पाळता भूई थोडी होणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना उमेदवारांकरिता अवघ्या पंचवीस दिवसांत गट, गणाची निवड,
पक्षाची अधिकृत उमेदवारी, अर्ज दाखल व प्रतिस्पर्ध्यांच्या माघारीच्या प्रयत्नापासून अवघ्या सात दिवसांत प्रचाराची धुळवड उडवीत
व येनकेनप्रकारे विजयश्री खेचून आणण्यापर्यंतच्या सर्व कसरती कराव्या लागणार आहेत.
त्यामुळेच या सर्व गोष्टींसाठी अल्प काळ हाती असल्यानेच 'निघाले मी नांदायला ,अन् मडके नाही रांधायला ' अशी स्थिती उमेदवारांसमोर
निर्माण झाल्याचे चित्र सर्वत्रच पहावयास मिळत आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी अधिसूचना जाहीर झाली, यानंतर निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली
असून पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक पक्ष प्रमुखांचे उंबरठे झिजवू लागले आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समिती गट आणि गणांचे आरक्षण 13 ऑक्टोबरला जाहीर झाले. तेव्हापासून या निवडणुकांसाठी
इच्छुकांच्या हालचालींनी वेग घेतला. अनेकांनी गट आणि गण निश्चत करून मतदारांच्या भेटी घेण्यासाठी मतदारसंघात दौरे
सुरू केले. जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्यांनी पंचायत समितीचे सक्षम उमेदवार शोधून ठेवले.
येत्या 18 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांतर्फे उमेदवारांच्या
मुलाखती घेतल्या जात आहेत. काही पक्षांकडून इच्छुकांचे अर्ज भरून घेतले जात आहेत; मात्र कोणत्याही पक्षाकडून अधिकृत
उमेदवारांची घोषणा अजून झालेली नाही. उमेदवारी निश्चित समजून काही मातब्बर पुढाऱ्यांनी मात्र व्यक्तिगत प्रचार सुरू केला आहे.
बदलेल्या गटात सर्वेक्षण करून मतदारांचा अंदाज घेत आहेत.
30 जानेवारीला रिंगणातले उमेदवार निश्चित झाल्यानंतर जाहीर प्रचार सुरू होणार आहे. सहा फेब्रुवारीला जाहीर प्रचार बंद होणार
आहे. सात फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मतदानासाठी आता 25 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे; मात्र अनेकजण
उमेदवारी निश्चित न झाल्यामुळे भांबावून गेले आहेत.
आरक्षणामुळे काहींना अनायसे सत्तेत येण्याची संधी मिळणार आहे. ऐनवेळी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी, निवडणुकींचा अनुभव
नसलेल्यांना संधी मिळणार आहे. अशा मागास प्रवर्गातील उमेदवारांची जातपडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावपळ सुरू आहे.
प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या त्रुटी निघाल्यास हे उमेदवार सुटेकेचा श्वास घेत आहेत.
*नवख्यांची परवड:
फारसा अनुभव नसताना; परंतु निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारीच्या मुंडावळ्या बांधणाऱ्या उमेदवारांना मात्र निवडणुकीची सर्व
तयारी करावी करावी लागणार आहे. उमेदवारी मिळविण्यापासून ते प्रचारपर्यंत अनेक कसरती कराव्या लागतील. या सर्व गोष्टीसाठी
अत्यंत कमी कालावधी असल्याने नवख्यांची चांगलीच पंचाईत होणार आहे.
*पक्षांचे नेतेही भांबावले :
पालिका निवडणुकीपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने या जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांतील मातब्बर
पुढारीसुद्धा भांबावून गेले आहेत. विशेषतः आचारसंहिता लागू झाल्यापासून मतदानाच्या टप्प्यापर्यंत अवघ्या एक महिन्याचाच कालावधी
असल्याने या पुढाऱ्यांसमोर वेळ व नियोजनासह अनेक दिव्यप्रश्न उभे राहिले आहेत. याभागातील एकाचढ एक जिल्हा परिषदेचे गट
तुल्यबळ ठरणारे पंचायत समित्यांचे गण आक्रमक उमेदवार त्या त्या पक्षांचे नेतेही उमेदवाऱ्या निश्चिती करताना मोठ्या तणावात व
मोठ्या कोंडीत सापडल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा