गुन्हेगारांना गचांड्या देणार कोण?
फोफावत्या गुन्हेगारीचा प्रश्न सामाजिक स्वास्थ्याच्या पथ्यावर
*गुन्हेगारांना गचांड्या देणार कोण?
*अनेक जन तडीपारीच्या रडारवर
--------------
चाकण सह खेड तालुक्यातील व जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारी जगताचा इतिहास गेल्या काही काळापासून रक्तरंजित झाला आहे. हे मागील
काही घटनांमुळे आता लपून राहिले नाही . आता ह्या फोफावत्या गुन्हेगारीचा प्रश्न सामाजिक स्वास्थ्याच्या पथ्यावर पडत असल्याचे नागरिक उघड पणे बोलू
लागले आहेत . काही गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व औद्योगिक भागात पूर्वी पासून आहे. या टोळ्यांत राजकारण्याच्या चेल्यां चपट्या पासून मध्यम व कनिष्ट
वर्गातील तरुणांचे प्रमाण वाढत आहे. नाक्यानाक्यावर उभा राहणारा तरूण त्यात शि़क्षीत वा अशिक्षीत दोन्हीवर त्या गुन्हेगारी टोळ्यांचा प्रभाव मोठ्या
प्रमाणात दिसून येत आहे . हा या टोळीचा तो ह्या टोळीचा .तो कंपनी टच आहे या चर्चा सर्वत्र होत आहे .
काहीवाट चुकलेले तरूण योगयोगाने म्हणा वा भाई बनण्याच्या इर्षेने,परिस्थितीमुळे, बेरोजगारी, झटपट पैसा मिळविण्याच्या नादात गुन्हेगारी क्षेत्रा कडे
आकर्षित होत आहेत ,स्वताचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याच्या नादात आपल्याच आयुष्याचा खेळखंडोबा करुन घेत आहेत .
कायधाचे उल्लधंन केल्यास तेथे गुन्हा घडतो ही झाली गुन्ह्याची सर्वसाधारण व्याख्या सांगितली जाते . चार ,पाच जण किंवा त्याहून अधिक यांनी एकत्र पणे
येऊन केलेला गुन्हा म्हणजे संघटीत गुन्हा. पण हाच सघटित गुन्हा अनेक जण येऊन म्होरक्यामार्फत करतात तेव्हा टोळी निर्माण होते. या टोळ्या
याभागातील औद्योगिक क्षेत्रात कामे, ठेके ,मिळविण्यासाठी धडपड करतात ,मग याच आर्थिक कारणावरून
त्यांच्यात अस्तित्वासाठी,हुकूमतीसाठी दंगे धोपे ,खुनखराबा निर्माण होतो .अशीच लढाई चाकण ,खेड तालुक्यासह जिल्ह्याच्या इंडस्ट्रीयल बेल्ट मध्ये सुरु
आहे. टोळ्या त्यांचे गुंड यांच्या दहशतीची सामान्यजनांनाही त्याची झळ बसत आहे . या भागातील गुन्हेगारीचे मूळ वाळू ,बांधकाम साहित्य ठेके, कामगार
पुरविण्याचे ठेके ,जमीन व्यवहार याभोवती फिरताना दिसत आहे. वाळू माफियांचा प्रश्नही प्रकर्षाने ऐरणीवर आहे.गुन्हेगारी जगतातील स्थान अबाधित राहावे, याकरिता
रक्तरंजित संघर्षाचा नवा ट्रेंड सुद्धा खेड तालुक्यात सुरु झाला आहे.बहुतांश घटनांच्या मुळाशी जाऊन सर्व पाळेमुळे खोदण्याच्या भानगडीत पोलिसांची न जाण्याची
वृत्ती राजकीय दबावानुसार काम करण्याची पद्धती ,मूळ घटनेला बगल देऊन बदलला जाणारा घटनाक्रम यामुळे खऱ्या गुन्हेगार मंडळींचे फावत असल्याची
जनभावन आहे.
निरनिराळ्या ठेकेदारीच्या माध्यमातून याभागात काहींनी या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर माया जमविल्याची अनेक उदाहरणे आहेत.
मात्र राजकारणी आणि पोलिसांची त्यांना साथ मिळत असल्याच्या पक्क्या समजातून नागरिकही 'नरो वा कुंजरो वा ' अशीच भूमिका घेत आहेत .संघटीत गुन्हेगारी
टोळ्यांना अंत झाला आहे असे पोलिसांकडून ठाम पणे सांगण्यात येत असले तर मग त्याच टोळ्यांच्यानावांचा वापर करून निरनिराळ्या घटनांत सर्वसामान्यांना
धमकावणारे खुले आम एकमेकांचे गळे घोटणारे आहेत तरी कोण हा प्रश्न निरुत्तरच राहतो.या भागात काही प्रस्थापित राजकीय पक्षांच्या मंडळीची प्रचंड
दहशत आहे .त्यांच्या नुसत्या नावावर ठेकेदारी ,जमीन व्यवहार असे अनेक व्यवसाय (नव्हे धंदे)या भागात चालतात.कितीही अन्याय झाला तरी
या मंडळीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही.कारण त्यांचा राजकीय वरदहस्त ,पोलीस प्रशासनाशी त्यांचा असलेला घरोबा या बाबत सर्व
सामान्यां सुद्धा सर्व काही कळून चुकले आहे.त्या मुळे अशा मंडळींचे पोलीस रेकोर्ड तयारच होत नाही .पोलीस म्हणतात त्यांच्या ( गुंडा बाबत)बाबत
एकही तक्रार नाही.त्या मुळे कायदा आणि सुव्यवस्था खुले आम अशी पायदळी तुडवली जाते.
जिल्ह्यात पोलीस अधीक्षक शहाजी सोळुंके यांच्यासारखा खमक्या अधिकारी, त्यांच्या जोडीला साधारणपणे अशीच दुसरी फळी जिल्ह्य़ाच्या पोलीस दलात
सध्या कार्यरत आहे. एकिकडे गुन्हेगारीविरुद्ध जोरदार कारवाया सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे गुन्हेगारी प्रचंड वाढते आहे. एक झाले की एक अशा गुन्हेगारी
साखळीने जिल्हाभर कमालीची दहशत निर्माण केली आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लागेबांधे ही या वाढत्या गुन्हेगारीतील आणखी चिंतेची बाब आहे. या प्रकारांनी जिल्ह्य़ातील सामाजिक वातावरण चांगलेच कलुषित झाले
आहे. कडक कारवाया सुरू असताना गुन्हेगारी फोफावते याचा अर्थ काय घेणार? असे का व्हावे? पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांवरील नैसर्गिक वचक संपुष्टात
आला की खालची यंत्रणा प्रमुखांना साथ देईना? कारणे अनेक आहेत.
परिस्थिती अशीच राहिली तर जिल्ह्य़ाच्या औद्योगिक भागातील गुन्हेगारी हाताबाहेर जाऊ शकते. पोलिसांचा दरारा वाटून उपयोग नाही, तो प्रस्थापित
झाला पाहिजे. त्यासाठी नागरिकांनाही सजग राहावे लागेल.
औद्योगीकारणाने याभागातील साधन राजकीय शक्ती नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. परंतु अवैध धंद्यात गुंतलेल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या
गुंतलेल्या राजकीय कार्यकर्त्यांवर कारवाईची गरज आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या आश्रयाला राहून गुंडगिरी करणारे गुंड, समाजकंटक यांचा बंदोबस्त,
तसेच चोरटय़ांचा बंदोबस्त झाला तर जिल्ह्य़ात शांतता नांदेल. अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याबरोबरच पोलीस यंत्रणा शुध्द करण्याचा अधीक्षकांचा प्रयत्न
असला पाहिजे अशी नागरिकांची अपेक्षा आहे. खमके पोलीस अधीक्षक मात्र अस्वस्थ अधिकारी, नखशिखांत भ्रष्टाचारात बुडालेले
पोलीस पशासानातील अनेकजण असा सुप्त संघर्ष सुरू आहे. यातून काम करावे लागणार आहे. संघटीत टोळ्यांसह , राजकीय गुन्हेगारी, भ्रष्ट
अधिकारी व चोऱ्या, दरोडेयांचा सामना हि पोलिसांना करावा लागणार आहे.
चाकण भागा सह खेड तालुक्यात गेल्या काही काळात राजकीय पदाधिकाऱ्यांचे झालेले खून या गोष्टी किती पराकोटीला पोचल्या आहेत याचा प्रत्यय येण्यास
पुरेशा आहेत.सातत्याने एकापाठोपाठ गुन्हे घडत असताना एकूणच राजकीय वर्तुळाकडे संशयाने पाहिले जात आहे. हाणामाऱ्या, बेकायदेशीर धंदे,
भेसळीसारखे प्रकार अशा अनेक गुन्ह्य़ांत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग लपून राहिलेला नाही. जमिनींचे गैरव्यवहार,
अधिकारांचा गैरवापर या गोष्टी तर नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र, गुन्हेगारांना पाठिशी घालण्याच्या राजकारण्यांच्या वृत्तीमुळे सामाजिक वातावरणात
अस्वस्थता निर्माण झाली आहे.
गुन्हेगारांना गचांड्या देणार कोण?
चाकण सह औद्योगिक भागात गुन्हेगारी वर्तुळात वावरले, की राजकारणात हुकमी संधी मिळते याची खात्री पटल्याने अनेकांनी गुन्हेगारीच्या पाठींब्यावर
लक्ष केंद्रित केल आहे.राजकारणात निवडून येण्याची क्षमता या निकषात गुन्हेगारीवर वर्चस्व हा महत्त्वाचा निकष प्रमाण मानला जाऊ
लागल्याने तरुणाई एक प्रतिष्ठित व्यवसाय म्हणून गुन्हेगारीकडे पाहू लागली आहे. हे थांबवायचे असेल तर घटना घडल्यानंतर तपास करण्याऐवजी राजकारणात
गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्यांना लोकनेतृत्व करण्यापासून चार हात दूर ठेवण्याची वेळ आली आहे. गुन्हीगारीचा राजकारणातील अचूक वापर हे बेरकी राजकारणाचे
सूत्र सर्वच मंडळी वापरत असल्याने या गुन्हेगारांना गचांडी देणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
क्रांतिवीरांचा संत हुतात्म्यांचा तालुका म्हणून नावलौकिक मिळालेल्या खेड तालुक्याला आता गुन्हेगारी कारवायांचा तालुका असा लौकिक प्राप्त झाला आहे. शहर व तालुक्याच्या
राजकारणात गुन्हेगारीतून चांगल्या पदावर काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने तरुणाईला आता त्याचे आकर्षण निर्माण झाले आहे. मुंबई, दिल्ली या
मेट्रो सीटीत पाहायला मिळणाऱ्या सिनेस्टाईल गुन्हेगारीचे चाकण खेडच नव्हे तर जिल्हाभर दर्शन होत आहे. शहराच्या व तालुक्याच्या राजकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या
लोकांनी आपले बस्तान चांगले बसवल्याने बेकारीमुळे त्रस्त झालेले सुशिक्षित युवक याकडे आकर्षित होत आहेत. अनेकांनी आज
राजकारणात आपले बस्तान बसवून "व्हाईट कॉलर' गुन्हेगारी सुरू केली आहे. पोलिस प्रशासनाने एखादी घटना घडल्यानंतर तपासासाठी पळापळ न करता
गुन्हेगारीचे मुख्य स्रोत पाहून त्यांना पायबंद घालण्याची आवश्यकता आहे.जिल्ह्याच्या अन्य भागातून व पार जिल्ह्यातून खेड तालुक्यात शासनाच्या विविध विकास प्रकल्पांच्या
पार्श्वभूमीवर होणारी गुंडांची आयातही सर्वसामान्यांनासह पोलिसांना डोकेदुखी ठरत आहे .त्यातच सत्तेचे गणित मांडताना निवडणुकीआधी उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
तपासण्याचे धारिष्ट्य कुठलाही राजकीय पक्ष दाखवीत नसल्याचे उघड सत्य सर्वाच्याच पथ्यावर पडत असून राजकारणाचा ट्रेंड बळी तो कानपिळी या तत्व पाशी थांबल्याचे
विपर्यस्त चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.व्हाईट कॉलरवर गुन्हेगारी थांबवण्याचे धाडस पोलिस करणार का, त्याला राजकीयपाठबळही मिळणार का, हे येणारा काळच
दाखवून देणार आहे.
गुंडपुंड निर्ढावलेले...
फितूर यंत्रणेचे आणि राजकारण व गुन्हेगारी यांच्यातील साटयालोटयाचे सर्व संदर्भ उघडे होणार आहेत. त्यातून बोध घेऊन आणि पडेल ती किंमत चुकवून स्वच्छता मोहीम
राबवायला सुरवातकेली पाहिजे.
पोलिसांना हप्तेबाजी केली, भ्रष्ठ अधिकाऱ्यांना मलिदा पुरवीत राहिले, राजकीय पक्षांना निवडणुकीवेळी आर्थिक आधार दिला की आपले कोणीही वाकडे करू शकत नाही अशी गुर्मी निर्माण झालेले
असे माफिया आज प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक प्रांतात बोकाळत चालले आहेत. सर्वत्र अशा संघटित टोळया निर्माण झालेल्या आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीेचे आणि राजकीय
संरक्षककवच मिळालेले माफिया कायद्याला जुमानत नाहीत. दहशतीच्या बळावर, लाचलुचपतीच्या बळावर त्यांनी जणू समांतर काळी
व्यवस्था उभी केलेली आहे. या टोळया राजकारण्यांनी पोसल्या आहेत, पोलिसांनी त्यांची खातिरदारी चालवली आहे आणि जो कोणी अशा विषयांत आवाज उठवील त्याला संपवण्यासाठी, त्याचा
आवाज कायमचा बंद पाडण्यासाठी हे लोक संघटितपणे पुढे सरसावत आहेत. एखाद्याचे अत्यंत निर्घृणपणे प्राण घेण्याइतपत असे गुंडपुंड निर्ढावलेले आहेत.
वार्तांकन करणारेही असुरक्षित ..
शहरां प्रमाणे ग्रामीण क्षेत्रातही गुन्हेगारीचे माजलेले स्तोम रोखण्यासाठी यावर प्रकाश टाकणे ही सुद्धा काळाची गरज बनली आहे.त्यात गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाल्याने
त्यांचेही वार्तांकन गरजेचे ठरू लागले.
गुन्हेगारी च्या धाव-पळीत ग्रामीण पत्रकारांचीही जबाबदारी वाढली. अगोदरच हे पत्रकार जीव धोक्यात घालून वार्तांकन करतात. त्यांना ग्रामीण गुन्हेगारीच्या घडामोडींवर
पुरेसा प्रकाश टाकण्यासाठी प्रसंगी जीवाची बाजी लावावी लागते.बहुतांश वेळा ग्रामीण पत्रकारांना बेजार करण्यासाठी निरनिराळ्या क्लुप्ती शोधल्या जाण्याचे प्रकार सर्वश्रुत आहेत.
सध्याच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमाध्यमांच्या जमान्यात जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणतेही वृत्त तातडीने प्रेक्षकांसमोर पोहोचवले जात आहे. मात्र वर्तमान पत्रात छापून येणाऱ्या
बातम्यांवर अद्यापही प्रचंड विश्वास असल्यानेच प्रिंट मीडियातील वार्तांकन करणाऱ्या मंडळींची जबाबदारी तूसभरही कमी झाली नाही.
त्यात अलीकडे गुन्हेगारांच्या वाढत्या कारवायांमुळे त्या संदर्भातील बातम्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशा बातम्या ऐकीव किंवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार देणे अनेकांना प्रशस्त वाटत नाही. त्यामुळे
थेट गुन्हेगारी विश्वात प्रवेश करुन किंवा त्यातील खबऱ्यांकडून बातम्या मिळवल्या जातात. हे काम जोखमीचे तसेच धोकादायक असते. पण हे धाडस करणाऱ्यांची संख्या
अलीकडे वाढत आहे. त्यातून काहींना जीव गमवावा लागला तर काहींना जायबंदी व्हावे लागले. जे. डें सारखा पत्रकारही यालाच बळी पडला.
* खेड तालुक्यातील 27 जन तडीपारीच्या रडारवर :
खेड तालुक्यातील सुमारे 27 गुंडोबावर तडीपारीचे प्रस्ताव प्रांताधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आले आहेत. ही आकडेवारी गुन्हेगारीच्या रुंदावलेल्या
कक्षा अधिरेखीत करीत आहे. याबाबत खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भारत पाटील यांनी सांगितले की,प्रांताधिकाऱ्यांकडे सुमारे 12 जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव
पाठविण्यात आहे असून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे 15 जणांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.या बाबत कुठल्याही परिस्थितीत कारवाया होणार असून गुन्हेगारीचा बिमोड
करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.जिल्हापरिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही कारवाया सुरु असून गेल्या दहा वर्षातील निवडणुकांदरम्यान गुन्हे
दाखल झालेल्यांवर तातडीने कारवाया सुरु करण्यात येणार आहेत.
----------------------------------- अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ / ९७६५५६६९०८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा