कांदा निर्यातमूल्य 150 डॉलरवर आणावेच लागेल


*सतत च्या अनिश्चिततेने कांद्याचे क्षेत्र भविष्यात घटण्याची शक्यता
*अद्यापही जुना कांदा बाजारातून हटलेला नाही
*कांदा निर्यातमूल्य 150 डॉलरवर आणावे अशी मागणी


---------------

मागील सप्ताहापासून सर्वच बाजारपेठेतील कांद्याचे भाव कोसळले असून, हे भाव जवळजवळ 400 रुपयांच्या सर्वसाधारण पातळीत खाली आले आहेत. केलेला
खर्चही भरून निघत नसल्याने उत्पादकांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. सतत च्या या अनिश्चितते मुळे या भागातील कांदा उत्पादनात अग्रेसर असणारा
मोठा कांदा उत्पादक शेतकरी वर्ग आगामी काळात कांदा लागवडी बाबतच गांभीर्याने विचार करीत असल्याने कांद्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली असून
शासनाने आता तरी डोळ्यावर कातडे ओढण्याची भूमिका सोडली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
'लाखा शिवाय बात नाही ,अन् वडापाव शिवाय खात नाही 'अशी अवस्था याभागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.कांद्याच्या लागवडी नंतर
बाजार भावाचे गणित मनोमन जुळवीत, लाखांचे आकडे जुळवीनाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्षात उत्पादन खर्चही येत नसल्याची स्थिती अनेकदा निर्माण झाली
आहे.शेतकऱ्यांनीही आयत्या वेळी आंदोलनांची हत्यारे उपसल्याची व कांद्याचे लिलाव बंद पाडून पुन्हा आपलेच नुकसान करून घेतल्याची स्थिती येथे अनेक
शेतकऱ्यांनी अनुभवली आहे.ग्राहक ते शासनापासून निर्यातदारापर्यंत डोळ्यात पाणी आणण्याचा गुणधर्म कांद्याने सर्वानांच वेळोवेळी दाखविला असला तरी
कांद्याच्या बाजारभावावर वर्षभराचे आर्थिक नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या कांद्याने सर्वाधिक रडविले आहे.शासन कांद्या बाबत आपली दुटप्पी भूमिका
सोडण्यास तयार नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी कांदा लागवडी बाबत गांभीर्याने विचार करीत असल्याची स्थिती शासना पासून सर्वांनाच अंतर्मुख होऊन विचार
करण्यास भाग पडणारी आहे.
सध्या आखाती देशात तसेच, कोलंबो व मलेशियात कांद्याची निर्यात काही प्रमाणात होत आहे. गावठी उन्हाळ कांद्याची आवक अंतिम टप्प्यात आली आहे.
उन्हाळ कांद्याला भाव 300 ते 651 रुपये व सरासरी भाव 375 रुपये होता. या भागात लाल कांद्याला 300 ते 600 रुपये व सर्वसाधारण
भाव 470 रुपयांपर्यंत मिळत आहे.
निर्यातबंदी उठविताना केंद्र शासनाने कांदा किमान निर्यात 475 डॉलर इतकेच ठेवल्याने शासनाने कांदा उत्पादकांची फसवणूक केली, अशी भावना शेतकर्‍यांनी
व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर भारतातील कांदा परदेशी फारसा निर्यात झालाच नाही, परिणामी कांदा भाव सुधारलेच नाही.
कांद्यावरील निर्यातबंदी उठविताना कांद्याचा निर्यात किमान दर हा 475 डॉलर्स इतकाच ठेवलेला होता, त्यामुळे परदेशी बाजारपेठेत इराण, पाकिस्तान, चीन
या देशांचा कांदा 300 डॉलरने मिळत होता. मात्र महाराष्ट्रातील निर्यातदार व्यापार्‍यांचा कांदा 475 डॉलरमध्ये कोणी खरेदी केला नाही. याउलट
चिनचा कांदा फारच कमी दरात परदेशी बाजारपेठेत विक्री झाला.
डिसेंबर 2010 मध्ये शासनाने अचानक कांद्याची निर्यातबंदी घोषित केली व हीच निर्यातबंदी उठविताना दि. 15फेब्रुवारी 2011 रोजी कांद्याची किमान
निर्यातमूल्य 600 डॉलर्स इतके ठेवले. त्यामुळे त्यावेळी कांदा निर्यात झाली नाही. त्याचीच पुनरावृत्ती केंद्र शासनाने याही वर्षी सप्टेंबरमध्ये कांदा
निर्यातबंदी उठविताना 475 डॉलर्स निर्यात किमान दर ठेवला. सन 2009-10 मध्ये साडेअठरा लाख मेट्रीक टन तर सन 2010-11 मध्ये साडेअकरा
लाख मेट्रीक टन कांदा निर्यात झाली. त्यात डिसेंबरमध्ये निर्यातबंदी घालण्यात आली होती. चालू वर्षी कांदा निर्यात फारच कमी झाली आहे. शासनाने
475 वरून सध्या 250 डॉलर्स इतके कांदा निर्यात न्यूनतम दर खाली आणले असले तरी सध्याचा कोसळलेला बाजार पाहता150 डॉलर्सवर कांदा निर्यातमूल्य
आणले तरच भारतातील कांदा बाहेर जाणार आहे. त्यामुळे कांदा निर्यातमूल्य 150 डॉलरवर आणावे, अशी मागणी या भागातील कांदा उत्पादक शेतकरी
व आडते आसोशिएन यांनी केली आहे.या बाबत आडते असोशिएशनचे अध्यक्ष राम गोरे यांनी सांगितले की , अद्यापही जुना कांदा बाजारातून हटलेला नाही,
त्यामुळे काढणीला आलेला कांदा पाणी देऊन शेतकऱ्यांनी तसाच शेतात ठेवला असून जानेवारी ,फेब्रुवारीच्या दरम्यान कांद्याला चढा भाव मिळेल या आशेवर
आहेत .चांगल्या हवामाना मुळे सध्या कांद्याचे उत्पादन भरघोस असल्याचेही त्यांनी सांगितले.
या सर्व अस्थिरतेने कांदा पिकाने या वर्षात शेतकऱ्यांना दोनदा उद्ध्वस्त केले आहे. कांदा हे महाराष्ट्रातील काही भागातील सर्वात महत्वाचे नगदी पीक असले
तरी अस्थिर कांद्यापेक्षा अन्य पिकेच घेतलेली बरी अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होत आहे.

*निर्यातदारांचे डोळेही ओले :
सरकारने कांदा निर्यातीचे किमान दर 125 डॉलर्सनी कमी केले तरी तुलनेने ते अधिक असल्याने कांदा निर्यातदारांचे वांधे झाले आहेत. सध्याच्या 250
डॉलर्स या किमान निर्यातमूल्यावर खरेदीसाठी उत्सुक नसल्याने निर्यातीला मोठा फटका बसला आहे. कांदा निर्यातीत 24 टक्के घट आल्याने निर्यातदारांच्या
डोळ्यात पाणी आले आहे.
या संदर्भात चाकणशी संबंधित काही निर्यातदारांनी सांगितले की ,एप्रिल ते नोव्हेंबर या काळात देशाच्या कांदा निर्यातीत 2.13 लाख टनांची घट झाल्याचे
नाफेडने स्पष्ट केले आहे. नाफेड ही सहकारी कृषी संस्था कांदा निर्यातीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देते. सरकारने 475 डॉलर्स प्रतिटन या कांदा निर्यातीच्या
किमान मूल्यात काही दिवसांपूर्वी 125 डॉलर्सची कपात करून हे मूल्य 350 डॉलर्स प्रतिटन असे केले होते. निर्यातवाढीसाठी मूल्य आणखी घटवण्याबाबत
चर्चा होऊ शकते, असे मत कृषिमंत्री शरद पवार यांनी ही व्यक्त केले होते. त्या नंतर पुन्हा कपात करण्यात ही आली होती .मात्र सध्याची स्थिती पाहता
या मध्ये आणखी घट होण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर फेब्रुवारी महिन्यात सरकारने कांदा निर्यातीवरील
बंदी उठवली खरी मात्र दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस तोंड द्यावे लागले.
गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या काळात देशातून 11,14,426 टन कांद्याची निर्यात झाली होती, तर एप्रिल ते नोव्हेंबर 2011 या काळात फक्त
9,05,150 टन कांद्याची निर्यात झाल्याचे निर्यातदार सांगतात. वार्षिक तुलनेत ही घट 24 टक्के आहे. कांद्याचे चढे किमान निर्यातमूल्य (एमईपी)
आणि सरकारचे निर्यातीबाबतचे धरसोडीचे धोरण यामुळे हा फटका बसल्याचे स्पष्ट होत आहे .
*चीन, पाकिस्तानची सरशी
जगात सर्वाधिक कांदा उत्पादन करणाऱ्या चीनच्या कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. तेथे कांद्याचे किमान निर्यातमूल्य 210 डॉलर्स
प्रतिटन असे आहे, तर कांदा उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतात कांद्याचे किमान निर्यातमूल्य 250 डॉलर्स आहे. पाकिस्ताननेही
कमी निर्यातमूल्य ठेवल्याने पाकिस्तानातूनही कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होत आहे.
*आवक जास्त, भाव कमी
येथील निर्यात दरांनी सांगितले की , देशाच्या विविध भागांतून दररोज 600 टनांहून अधिक कांद्याची आवक होते. एवढ्या मोठ्या प्रमाणातील आवक
आणि कमी मागणी यामुळे सध्या शहरात घाऊक कांद्याचे भाव 5 ते 6 रुपये प्रतिकिलो असे आहेत.
*धोरणामुळे अडचण
कांदा निर्यातीबाबतचे धरसोडीचे धोरण, कधी निर्यातबंदी, तर कधी निर्यातील मुभा या धोरणामुळे कांद्याच्या एकूण निर्यातीवर परिणाम झाला आहे.
चीनमध्ये किमान मूल्य 210 डॉलर्स आहे. त्यामुळे चीनच्या कांद्याला सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे.
---------

*पणन मंडळ म्हणते ....
कांद्याचे महागडे निर्यातमूल्यच निर्यातीतील घटीला कारणीभूत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात काद्याचे निर्यातमूल्य 225 डॉलर्सहून कमी असल्यामुळे
भारतीय कांद्याला तेथे कोणी खरेदीदारच नाहीत असे निर्यात दारांकडून सांगण्यात येत असले तरी त्या बाबतची सत्यता तपासली पाहिजे असे पणन मंडळाच्या
पुणे कार्यालयातून सांगण्यात आले .भारतातील कांद्याला चीन व पाकिस्तान हे दोन देश नेहमीच स्पर्धक असतात ,त्या मुळे ते निर्यात किंमत भारताच्या
तुलनेत नेहमीच कमी ठेवतात .मात्र भारतीय कांदा चव व गुणवत्तेच्या बाबत त्यांच्या पेक्षा सरस असल्याचेही पुणे पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्याची कांद्याची किमान निर्यात किंमत 250 डॉलर्स असून त्याच्या चढ उतारा बाबत काहीही सांगता येणार नसून तो विषय संपूर्ण पणे केंद्र शासनाच्या
अखत्यारीतील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

--------------------------- (अविनाश दुधवडे,चाकण) ९९२२४५७४७५/ ९७६५५६६९०८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)