''मुले म्हणजे देवाघरची फुले''




''मुले म्हणजे देवाघरची फुले'' या उक्तीला लाजिरवाणी, न साजेशी अपकृत्ये जेव्हा भोवतालच्या समाजात घडून येताना आढळतात तेव्हा मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेणार्‍या, त्यांना कुस्करणार्‍या कुप्रवृत्तींचा राग आल्यावाचून राहवत नाही. परंतु कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर हे विषय उघडपणे मांडणे हेही अनेकदा निषिध्द मानले जाते. अतिशय गंभीर अशा ह्या विषयावर घरात किंवा घराबाहेरही चर्चाविचार करण्यास लोक अनुत्सुक दिसतात. ''माझा काय संबंध?'' ह्या प्रवृत्तीपासून ते ''असले विषय दूर राहिलेलेच बरे'' इथपर्यंत असलेली सामाजिक उदासीनता कायदा व सुव्यवस्थेला आणि समाजाला घातकच ठरते. मात्र त्यामुळे वस्तुस्थिती लपत वा बदलत नाही तर अधिकच बिकट होत जाते. प्रस्तुत लेखात बालकांच्या सुरक्षेच्या फक्त एका पैलूविषयी माहिती संकलन केले असून ह्या विषयावर सर्व समाजात अधिक मंथन करण्याची व जागृती निर्माण होण्याची गरज आहे.
आंतरजालावर देखील बातमीपत्रांखेरीज अथवा सरकारी/ सेवाभावी संस्थांखेरीज मराठीतून ह्या विषयावर क्वचितच माहिती आढळते.

लहान मुले ही समाजाचा दुर्बल घटक मानली जातात, कारण ती आपल्या योगक्षेमासाठी, पालन-पोषणासाठी मोठ्यांवर अवलंबून असतात. परंतु दुर्दैवाने ह्या दुर्बल घटकाचे शोषण सर्वाधिक रीत्या समाजात दिसून येते.
हिंसाचार, शिव्या, मारामार्‍या, आतंकवाद ह्यांना सध्याची लहान मुलांची पिढी प्रत्यक्ष व प्रसारमाध्यमांतून रोजच सामोरी जात असते. पालकांनी किंवा शिक्षकांनी मुलांना चोपणे, स्त्रीभ्रूणहत्या, मुलीला जन्मानंतर नष्ट करणे, जातिभेद किंवा धर्मामुळे पोळली जाणारी मुले, मुलींची कुटुंबात व समाजात होणारी अवहेलना, बालविवाह, बलात्कार, छळ अशा अनेक परिस्थितींचा, वस्तुस्थितींचा सामना आजच्या मुलामुलींना करायला लागतो.

पण वास्तवात अशी समाजातील ग्रासलेली किंवा अवहेलना झालेली मुले जर तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या/ कुटुंबियांच्या संपर्कात आली तर एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही काय करता अथवा कराल?

•नशिबाला दोष द्याल ?
•वाद घालाल की "आमच्या लहानपणी असेच होते, मग ह्यांनी सहन केले तर काय बिघडले ? "
•वाद घालाल की "हीच संस्कृती आहे, म्हणून हे असेच चालत राहील?"
•गरीबीला दोष द्याल?
•भ्रष्टाचाराला दोष द्याल?
•कुटुंबाला दोष द्याल व दुर्लक्ष कराल?
•किंवा आपला संबंध नाही म्हणून दुर्लक्ष कराल ?
•खरंच ह्या बालकाला सुरक्षिततेची गरज आहे का हे पाहाल?
•कारण-मीमांसा होईपर्यंत वाट पाहाल ?
किंवा तुम्ही .....

◦त्या मुलाच्या सुरक्षिततेची काळजी घ्याल?
◦त्या बालकाला व त्याच्या कुटुंबाला गरज पडल्यास मदत कराल?
◦त्या मुलाच्या सुरक्षितेत काय त्रुटी आहेत हे पाहाल?
◦जे त्या बालकाच्या हिताच्या विरोधात आहेत त्यांच्यापासून त्या बालकाचा बचाव कराल?
◦गरज भासल्यास पोलिसांत किंवा बालक संरक्षण संस्थांना कळवाल ?
तुम्ही कसे वागाल हे तुमच्यावर आहे. तुम्ही स्वतःला फक्त एक सामान्य नागरिक म्हणून पाहता की समाजातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून?

जर तुम्ही स्वतःला जबाबदार समजत असाल तर सर्वप्रथम मुलांचे - बालकांचे हक्कही जाणून घ्या.

''बालक'' म्हणजे कोण?

आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे, ‘बालक’ हा १८ वर्षाखालील कोणीही व्यक्ती असू शकतो. ही आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त व्याख्या आहे आणि युनायटेड नेशन्स कनवेन्शन ऑन द राईटस् ऑफ द चाइल्ड (यु.एन.सी.आर.सी.) ने व बर्‍याच देशांनी देखील ही व्याख्या मान्य केली आहे.

भारतात १८ वर्षावरील व्यक्तींनाच मतदानाचा हक्क व वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) व कायदेशीर मान्यता मिळते. १८ वर्षाखालील कोणत्याही मुलीचे लग्न व २१ वर्षाखालील मुलांचे लग्न हे कायद्याने गुन्हा आहे, बालविवाह कायदा १९२९ प्रमाणे. कायद्याप्रमाणे लग्नास पात्र व्यक्तीचे वय हे १८ मुलींचे व २१ मुलांचे आहे.

लहान मुलांची काळजी का घ्यावी लागते?

■लहान मुलं मोठ्यांसारखी प्रत्येक संकटाला तोंड देऊ शकत नाहीत.
■बहुतेक समाजात असा समज झालेला आहे की मुले ही फक्त त्यांच्या पालकांची संपत्ती आहे, किंवा त्यांचा अन्य समाजाशी काहीही संबंध नाही.
■लहान मुलांना स्वतःचे विचार मांडणे, चांगल्या वाईटाची निवड करणे, निर्णय घेण्याची कुवत नसते असा समज आहे.
■त्यांना समजून मदत करण्याऐवजी त्यांच्यावर मोठ्यांचे विचार लादले जातात.
■लहान मुलांना मतांचा अधिकार नाही, राजकीय सहभाग नाही, व आर्थिक स्वातंत्र्य नाही. आणि त्यांचे म्हणणे देखील कोणी ऐकत नाही.
■मुख्य म्हणजे लहान मुलांना अत्याचारांना व शिव्याशापांना तोंड द्यावे लागते व त्याचा मुकाबला करण्यास ती असमर्थ असतात.
बालकांचे / मुलांचे शोषण म्हणजे नक्की काय?

ज्याद्वारे मुलाच्या शरीराला इजा किंवा हानी पोहोचेल असा संपर्क/ स्पर्श, आणि अशी कोणतीही कृती/ भाषण/ वर्तन ज्यामुळे ते मूल घाबरेल/ लज्जित होईल/ अवमानित होईल ते सर्व बालकाच्या शोषणा अंतर्गत मोडते. तसेच अशी कोणतीही कृती किंवा दुर्लक्ष ज्यामुळे मुलांची निकोप वाढ होण्यास बाधा येईल.

कोणत्याही धर्म, वय, वंश, लिंग वा सामाजिक/ आर्थिक स्तरातील मूल हे शोषणाला व अवहेलनेला बळी पडू शकते.

जर पालक व्यसनाधीन असतील तर मुलांच्या शोषणाची शक्यता जास्त वाढते.

भावनिक शोषण : (शिव्या देणे, मानसिक अत्याचार करणे किंवा मानसिक दृष्ट्या हानिकारक वर्तन करणे) ह्यात पालक किंवा देखभाल करणार्‍या व्यक्तीचे असे कृत्य किंवा कृत्य न करणे ज्याचा परिणाम गंभीर स्वरूपाच्या मानसिक/ भावनिक/ वर्तनात्मक वा त्यासंबंधी विकारात होतो किंवा होऊ शकतो.
ह्यात पालक/ देखभाल करणार्‍याने टोकाची किंवा विचित्र प्रकारची शिक्षा देणे (उदा : मुलाला अंधार्‍या खोलीत/ कपाटात बंद करणे किंवा बराच वेळ खुर्चीला बांधून ठेवणे किंवा मुलाला धमकावणे, घाबरविणे इत्यादी) यांचा समावेश होतो.
कमी तीव्रतेचे भावनिक शोषण म्हणजे मुलाला सदा हीन/ तुच्छ लेखणे, त्याला दूर लोटणे व नकोसे असल्याची वागणूक देणे, त्याचा हीन प्रकारे उल्लेख करणे, त्याचेवर निष्कारण दोषारोपण करणे किंवा त्याला बळीचा बकरा बनविणे.

उपेक्षा : बालकाच्या किमान गरजा न भागविणे. उपेक्षा ही शारीरिक, भावनिक किंवा शैक्षणिक असू शकते. शारीरिक उपेक्षेत अन्न, वस्त्र, पुरेशी वैद्यकीय काळजी, देखरेख न पुरविणे हे येते. तसेच मुलाचा त्याग करणे हेही ह्यात येते. शैक्षणिक उपेक्षेत मुलाला योग्य प्रकारे शाळेत दाखल न करणे, त्याची शाळेची फी न भरणे किंवा शाळेला अतिरिक्त दांड्या मारण्यास मुलाला भाग पाडणे/ उत्तेजन देणे इत्यादी येते. मानसिक उपेक्षेत मुलाला भावनिक आधार व प्रेम न देणे, मुलाकडे लक्ष न देणे, त्याची काळजी न घेणे, आई-वडिलांमधील भांडणांना त्याला सामोरे जावे लागणे, मुलांसमोर व्यसने (दारू, ड्रग्ज इत्यादी) करणे आणि त्यांना दारू व मादक पदार्थांच्या सेवनात सामील करून घेणे हे प्रकार येतात.

शारीरिक शोषण : बालकाला/ मुलाला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा करणे. डाग देणे, जाळणे, मारणे, गुद्दे घालणे, लाथा मारणे, छडीचा मार, मुलाला गदगदा हालविणे किंवा मुलाला इजा पोहोचेल असे वर्तन. त्यात मुलाला इजा करण्याचा हेतू नसला तरी जर ती कृती मुलाच्या वयासाठी अयोग्य अशा अती-शिस्तीचा किंवा शारीरिक शिक्षेचा परिणाम असेल तर त्याची गणना शारीरिक शोषणातच होते.

काही आकडेवारी :

युनिसेफ व भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने २००७ साली केलेल्या 'बाल शोषणावर एक अध्ययन: इंडिया २००७' सर्वेक्षणानुसार बाहेर आलेली काही धक्कादायक आकडेवारी :

५ ते १२ वयोगटातील मुलांना शोषणाचा व त्यांच्याशी गैरवर्तन केले जाण्याचा सर्वात जास्त धोका असतो. या अत्याचारांमध्ये शारीरिक, लैंगिक तसेच मानसिक अत्याचारांचा समावेश होतो.

बालकांचे शारीरिक शोषण :

१. सर्वेक्षणात दर ३ मुलांमधील २ मुले शारीरिक शोषणाला बळी पडतात हे दिसून आले.
२. नमुन्यादाखल १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणांत ६९% मुलांचे शारीरिक शोषण होत होते. त्यात ५४.६८% मुलगे होते.
३. तेरा राज्यांमधील ५०% पेक्षा जास्त मुले ही कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या शारीरिक शोषणाला व मारहाणीला सामोरी जात होती.
४. कौटुंबिक वातावरणात शारीरिक शोषण होणार्‍या मुलांमध्ये ८८.६% मुलांना त्यांच्या पालकांकडून शारीरिक शोषण होत होते.
५. शाळेत जाणार्‍या ६५% मुलांना शारीरिक दंडाची शिक्षा ( कॉर्पोरल पनिशमेन्ट) सहन करायला लागली होती. म्हणजेच ३ मधील २ मुलांना शाळेत अशी शिक्षा झाली होती.
६. त्यातील ६२% दंड शिक्षा ह्या सरकारी आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये दिल्या गेल्या होत्या.
७. इतर राज्यांपेक्षा आंध्र प्रदेश, आसाम, बिहार आणि दिल्लीत मारहाण व शोषणाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
८. बहुतेक सर्व मुलांनी ह्याबद्दल कोणाकडेच तक्रार केली नाही.
९. ह्यातील ५०.२% मुलं आठवड्याचे सातही

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)