इंटरनेट युगात टपाल विभागही "मल्टिपर्पज' होण्याच्या मार्गावर



आजच्या इंटरनेट युगात टपाल विभागही "मल्टिपर्पज' होण्याच्या मार्गावर आहे. टपाल विभाग "ई' सुविधेवर जोर देऊन ग्राहकांना नवीन योजना व सुविधा उपलब्ध करून देत आहे.
याचाच अर्थ टपाल विभागाने "ई-मेल', "कुरिअर'च्या जगात आपली विश्‍वासार्हता कायम ठेवलीआहे. ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी नेहमी प्रयत्नशील राहून नवनवीन योजना राबविण्यात
येत असतात. यामुळे चाकण सारख्या औद्योगिक दृष्ट्या विस्तारत्या भागामध्ये ग्राहकांना खासगी कुरिअर सेवेपेक्षा चांगली सुविधा देऊन आपला ग्राहकवर्ग टिकविला आहे.
* टपाल विभागाचा अस्तित्वासाठी संघर्ष :
आज इंटरनेट, ई-मेल तसेच खासगी कुरिअर कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी टपाल विभागाचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू असला, तरी खासगी कंपन्यांपेक्षाही अधिक चांगली
सुविधा देऊन स्पर्धा करण्यात येत आहे. यात टपाल विभागाने नवीन योजना सुरू करून विजेसह दूरध्वनी बिल भरणा करण्यासाठी "ई-पेमेंट' सुविधा; त्याचप्रमाणे किसान विकासपत्र, नॅशनल
सेव्हिंग सर्टिफिकेट, रिकरिंग डिपॉझीट अशा काही सुविधा सुरू केल्या आहेत.
ग्राहकांची विश्‍वासार्हता कायम
मोबाईल व इंटरनेटची सुविधा सुरू होण्यापूर्वी नातलगांना कोणताही संदेश देण्यासाठी पोस्टकार्डाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असे; परंतु आज पोस्टकार्डाचा वापर कमी झाला आहे.
याला पर्याय म्हणून "ई-पोस्ट'ची सुविधा आहे. आज ग्राहकांची टपाल विभागावर विश्‍वासार्हता कायम आहे. म्हणूनच आजही अनेक जण कोणतेही महत्त्वाचे काम म्हणजे मनिऑर्डर, अर्ज,
अहवाल यांसारखी कामे टपाल विभागामार्फतच केली जातात.
* नव्या योजनांचा लाभ :
टपाल विभाग जुना असला, तरी स्पर्धेच्या युगात ग्राहकांच्या अपेक्षेनुसार नवीन योजना सुरू केल्या. त्यात ई- सुविधांचा समावेश आहे. "ई-पोस्ट', "ई-पेमेंट' या सुविधा सुरू करण्यात आल्या.
या सुविधांना चांगला प्रतिसाद मिळत असून, यातील वीजबिल भरणा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या "ई-पेमेंट' सुविधेला ग्रामीण भागातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सहाय्यक
अधीक्षक संजय फडके यांनी सांगितले. यामुळे स्पर्धेच्या युगात टपाल विभागाला फायदा तर होतोच; शिवाय ग्राहकांनाही "ई-सुविधा' सोयीची ठरत आहे.
* टपाल विभाग बनतोय व्यावसायिक! :
नवीन सुविधा सुरू करण्याबरोबर आता टपाल विभाग व्यावसायिक बनण्याच्या मार्गावर आहे. यामुळेच टपाल विभागातर्फे एका कंपनीशी टाय करून "छोटू कुल' (लहान फ्रीज) विक्रीचे काम
करण्यात येणार आहे. ही नवीन सुविधा काही ठिकाणी सुरू करण्यात आली असून, जळगाव जिल्ह्यात येत्या काही महिन्यांत ती सुरू करण्यात येणार असल्याचे श्री. फडके यांनी सांगितले.
ग्राहकांचा टपाल विभागावर विश्‍वास आहे. तो कायम राहवा यासाठी ग्राहकांना विभागामार्फत नवीन चांगल्या योजना सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

*टपाल विभागाच्या सुविधांना तोड नाही :
- टपाल विभागामार्फत ज्या सुविधा देण्यात येतात, त्यांना कोणतीही खासगी कंपनी तोड देऊ शकणार नाही. कारण, टपालामार्फत केलेले काम विश्‍वासाचे आहे. मनिऑर्डर टपालामार्फतच
करतो.टपाल विभाग जुना असून, त्याच्यावरच सर्वांचाच विश्‍वास आहे. कोणतेही काम टपालातर्फे केले तर ते पूर्ण होतेच. अर्ज, मनिऑर्डर केल्यानंतर बिनाधास्त राहता येते.
यामुळे सर्व कामे टपाल विभागातूनच करणे अधिक संयुक्तीक व निर्धोक वाटत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते.
----------------------------------------------- अविनाश दुधवडे चाकण ,९९२२४५७४७५, ९७६५५६६९०८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)