पावसामुळे चाकण परिसरात नऊ तास वीजपुरवठा विस्कळीत

पावसामुळे चाकण परिसरात नऊ तास वीजपुरवठा विस्कळीत  
चाकण परिसरातील हजारो वीजग्राहक अंधारात
पहिल्याच पावसात वीजवितरणच्या मर्यादा स्पष्ट

चाकण: अविनाश दुधवडे 
  हावितरणच्या महाढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना नाहक सहन करावा लागत असून ,वादळी वारे आणि फारशा विजांच्या कडकडाटा शिवाय तुलनेने शांततेत बरसलेल्या पहिल्याच मान्सूनपूर्व पावसानेही वीज वितरणच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. आज (दि.3) पहाटे तीन वाजता खंडित झालेला वीज पुरवठा दुपारी बाराच्या सुमारास म्हणजे तब्बल नऊ तासांनी पूर्ववत झाला. त्यानंतरही विजेचा लपंडाव दिवसभर सुरूच होता. याचा फटका चाकण सह पंचक्रोशीतील हजारो वीज ग्राहकांना बसला ,चाकण सह लगतच्या गावांमधील वीज ग्राहक सकाळ पर्यंत अंधारातच होते.
  चाकण भागात झीरो लोड शेडिंगचा दावा करूनही महावितरण अखंड वीज पुरवठा करण्यात अपयशी ठरल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.किरकोळ पावसातही विजेचा खेळ खंडोबा सुरू असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक,  लहान मुले, तसेच रुग्णांचे हाल वाढत आहेत. असे असूनही महावितरणची ढिसाळ यंत्रणा नुसतेच ढीम्मपणे या गंभीर प्रकाराकडे पाहात तांत्रिक दोषामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याचे दाखले देऊन हात वर करत असल्यामुळे चाकण मधील ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शनिवार नंतर रविवारीही याभागातील रात्रीच्या वेळी खंडित झालेला वीज पुरवठा सकाळ पर्यंत पूर्ववत करण्यात वीज वितरण कंपनीला अपयशच आले.   त्यामुळे याभागातील हजारो वीज ग्राहकांना सलग दुसऱ्या दिवशी अक्षरशः रात्र जागून काढावी लागली . झिमझिम स्वरूपाच्या मान्सूनपूर्व पावसाचा फटका गेले दोन-तीन दिवस वीज ग्राहकांना बसत आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे येथील उपकेंद्रातील बिघाडामुळे  काही भागातील वीजपुरवठा रात्री तब्बल तीन तास खंडित झाला होता. रविवारी रात्रीच्या झिमझिम पावसानेही वीज पुरवठा रात्री तीनच्या सुमारास खंडित झाला तो सकाळ पर्यंत पूर्ववत झाला नव्हता. काही ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत झाला मात्र तो अत्यंत कमी दाबाने सुरु झाल्याने घरातील पंखेही चालू शकले नाहीत अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. या बाबत वीज वितरणचे अधिकारी मंगेश सोनवणे यांनी सांगितले की, दोन नंबर सेक्शनचा जंप गेल्याने हा पहाटे विस्कळीत झालेला वीज पुरवठा दुपार पर्यंत सुरु करण्यात अडचणी आल्या. दरम्यान पावसाळ्यात जंप जाणे, डीओ मध्ये बिघाड होणे, रोहित्र निकामी होणे,  तारा तुटणे, तापलेल्या इन्सुलेटर मध्ये पाणी जावून बिघाड होणे हे प्रकार सातत्याने घडतात व रात्रीच्या वेळी संबंधितांच्या वेळकाढू पणामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येतात हे नित्याचे झाले असून या बाबत उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

त्यांच्यावर कारवाईची मागणी:
पावसामुळे वीज रात्री अपरात्री मात्र गायब होते. फ्युज खराब होणे,जंप निसटणे ,अशा किरकोळ कारणांवरून रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडीत झाल्या नंतर  संबंधित कार्यालयात गेल्यास संपर्क करण्यासाठी दूरध्वनी,भ्रमणध्वनी उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. कार्यालयात गेल्यास रात्रपाळीतील कर्मचारी कार्यालयात हजर नसतात.त्यामुळे शहरातील काही भागांत वीज पुरवठा खंडित झाल्यास सुरळीत करण्यासाठी तीन ते चार तास लागत असल्याच्याही ग्राहकांच्या तक्रारी आहेत .चुकीची माहिती देणाऱ्या तसेच खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामात हलगर्जी करणाऱ्यांवर निलंबनासारखी कडक कारवाई झाल्यास अशा प्रकारांना आळा बसू शकतो. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वेळकाढू पध्दतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ,कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही ग्राहकांकडून केली जात आहे.

भरपाई देण्याची मागणी:
चाकण परिसरात शनिवार आणि रविवार ते सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत अधून मधून तासंतास वीजपुरवठा खंडित राहिला. विद्युत भरपाई निश्चितीकरण कायद्यानुसार वीज कंपनीने प्रतिग्राहक प्रतितास 50 रुपये याप्रमाणे भरपाई देण्याची मागणी चाकण मधील वीज ग्राहकांनी केली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. कोणाला पाणी भरता आले नाही, दुकाने, व्यवसाय बंद राहिले ,  परिणामी ग्राहकांना सलग तासंतास वीज पुरवठय़ापासून वंचित राहावे लागते. वीज कायदा 2009 सेक्शन 57   तथा भरपाईचे निश्चितीकरण कायद्यानुसार ठराविक तासात वीजपुरवठा पूर्ववत सुरू होणे आवश्यक आहे. परंतु तसे न झाल्यास प्रतिग्राहक प्रतितास 50  रुपये याप्रमाणे भरपाई देण्यात यावी. म्हणजेच प्रत्येक ग्राहकास 400   ते 450 रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी त्रस्त झालेल्या नागरिकांनी केली आहे.
----------------------------------Avinash Dudhawade,chakan 9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)