खेड परिसरात मॉन्सूनपूर्व पावसाची दमदार सलामी

खेड परिसरात मॉन्सूनपूर्व पावसाची दमदार सलामी

चाकणच्या पंधरा ट्रान्सफार्मर मध्ये बिघाड

चाकण :अविनाश दुधवडे  
   मॉन्सूनपूर्व पावसाने खेड तालुक्याच्या पूर्वभागातील आणि पश्चीम भागातील गावांमध्ये  आज (दि.4) खऱ्या अर्थाने दमदार हजेरी लावली. चाकण शहर आणि परिसराला सुमारे दीड तास जोरदार पावसाने झोडपून काढले. पावसाच्या या दमदार हजेरीने चाकणसह तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठाही दुपारी तीन नंतर खंडित झाला होता . काळूस रोडवर झालेल्या मोठ्या स्पार्किंग नंतर चाकण गावठाणातील तब्बल पंधरा ट्रान्सफार्मर मध्ये बिघाड झाल्याने रात्री उशिरा पर्यंत वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत टप्याटप्याने हा वीज पुरवठा सुरळीत केला .
   चाकण पंचक्रोशीतील मेदनकरवाडी ,कडाचीवाडी,खराबवाडी, रासे ,भोसे, मोहितेवाडी,बहुळ ,साबळेवाडी ,कुरुळी,मोई, निघोजे,महाळुंगे,खालुंब्रे ,येलवाडी,वाकी,भाम, पश्चीम भागातील बिरदवडी ,आंबेठाण, वसुली, वराळे ,आदी भागातही या पावसाने हजेरी लावली. कुरुळी, मोई, चिंबळी, चाकण ,नाणेकरवाडी,खराबवाडी, कडाचीवाडी भागात दुपारच्या दमदार हजेरी नंतर सायंकाळी उशिरापर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरूच होता. कुठे तुरळक तर कुठे जोराचा पाऊस असे चित्र याभागातील गावांमध्ये पहावयास मिळाले.  दमदार पावसाने सलामी दिल्याने शेतकरीवर्ग समाधान व्यक्त करीत असून चाकणसह तालुक्यात शेती मशागतीच्या कामांना वेग मिळणार आहे.
या पावसामुळे अनेक भागात नाल्या तुंडूब वाहत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. चाकणसह खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेले दोन दिवस कमी-अधिक स्वरूपाच्या पावसाने  रात्रीच्या वेळी हजेरी लावली होती. तरीही वातावरणातील उकाडा कमी झालेला नव्हता . आज दुपारपर्यंतही उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागत होते. मात्र दुपारी दोन वाजले पासून मात्र नैसर्गिक घडामोडींमध्ये कमालीचा बदल झाला,आणि मॉन्सूनपूर्व दमदार पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेसह पाऊस कोसळू लागल्याने सर्वांची धांदल उडाली.
  चाकण, महाळुंगे भागात रस्त्यावरील व्यावसायिकांना आपले दुकान गुंडाळून ठेवण्याची वेळ आली होती. रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहू लागल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला.  या पावसामुळे संध्याकाळी घराकडे परतणाऱ्या कंपनीकामगार वर्गासह वाहतूकदारांची तारांबळ उडाली. रस्त्यालगतच्या भागातील काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी बिरदवडी भागातील काही व्यावसायिकांनी केल्या.  सायंकाळी साडेपाच नंतर या परिसरातील काही गावांमधील पावसाचा वेग मंदावला.  मॉन्सूनपूर्व पाऊस दाखल झाल्याने कडक उन्हापासून नागरिकांची सुटका झाली आहे. तसेच हवेतही गारवा आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे काळूस रोडवर झालेल्या मोठ्या स्पार्किंग नंतर चाकण गावठाणातील तब्बल पंधरा ट्रान्सफार्मर मध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी वीज वितरणचे अधिकारी एन.बी.मिसाळ ,मंगेश सोनवणे व कर्मचारी उशिरा पर्यंत प्रयत्न करीत होते.
-----------------------Avinash Dudhawade,chakan  9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)