चाकणच्या प्रस्तावित नगरपरिषदेचा घोळ


                                                                     
                                                                     
                                                                     
       चाकणच्या प्रस्तावित नगरपरिषदेचा घोळ 
चाकण नगर परिषदेचे घोंगडे पडणार भिजत ?
नागरिक संघर्षाच्या पवित्र्यात 

चाकण: अविनाश दुधवडे 
एकीकडे चाकण नगर परिषदेसाठी उद्घोषणा राज्य शासनाने जाहीर केल्या नंतर कुठल्याही क्षणी चाकणला नगरपरिषद अस्तित्वात येणार अशी जोरदार हवा निर्माण झालेली असतानाच चाकणचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत करण्या संदर्भात मागील आठवड्यात मंगळवारी (दि.7) मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकी मुळे चाकणशहरासह परिसरातील नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.खेडच्या लोकप्रतिनिधींनी पिंपरी चिंचवडमध्ये चाकणच्या समावेश करण्यास कडाडून विरोध केल्या नंतर आता सर्वपक्षीय कार्यकर्तेही चाकणचे स्वतंत्र अस्तित्व असावे यासाठी एकत्रित येवू लागले असून संघर्षाची भूमिका घेतली आहे .
  
 चाकण परिसराचा औद्योगिक विकास झाल्यानंतर चाकण शहर व परिसराचे स्वरूप बदलले. चाकण शहरा लगतच्या नाणेकर वाडी,खराबवाडी ,महाळुंगे.निघोजे,कुरुळी,मेदनकर वाडी आणि आता नव्याने आंबेठाण लगतच्या परिसरात शासनाची सकारात्मक भूमिका आणि येथे जागेच्या उपलब्धतेने कारखानदारी मोठ्या प्रमाणात स्थापन झाली.त्यामुळे चाकण परिसरात लोकवस्ती झपाट्याने वाढली आहे, लोकसंखेचे लोंढे चाकण भागात वास्तव्यास आले.त्यामुळे नागरी सुविधा अपुऱ्या पडून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.वाढत्या लोकसंख्येमुळे चाकण शहराला दिवसेंदिवस पाणी ,कचरा ,सांडपाणी ,अंतर्गत रस्ते, गटार, शौचालय व्यवस्था,अशा एकमेकांत गुंतलेल्या समस्यांनी सर्वसामान्य नागरिकांना भंडावून सोडले आहे.पाण्याची समस्या अद्यापही संपूर्ण पणे सुटू शकली नाही.सध्या काही प्रभागात पूर्ण क्षमतेने पाणी मिळते, तर काहींना पाणी मिळत नाही. मिळालेच तर कमी दाबाने पाणी मिळते. त्यामुळे काही प्रभागातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते. पाणीप्रश्‍नावरून ग्रामसभेत वारंवार महिला संताप व्यक्त करत असतात. औद्योगीकरण झाल्यामुळे चाकण ला लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढल्याने एकमेकांशी संबंधित समस्यांच्या शृंखलेत शहर पुरते अडकून पडले आहे .वाढत्या औद्योगिकीकरणामुळे चाकणची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या शहराची लोकसंख्या दीड लाखावर पोचली आहे. त्यामुळे येथे  रस्ते, वीज, पाणी, अशा अनेक  पायाभूत समस्या सातत्याने वाढत आहेत. एकीकडे कारखानदारी थाटायची आणि हजारो कोटी रुपयांचे कर रूपी उत्पन्न मिळवायचे मात्र सुविधा द्यायच्या नाहीत  असे अप्रामाणिक धोरण घ्यायचे यामुळे नागरिकही मेटाकुटीस आले होते . त्यामुळे गेल्या चार -सहा वर्षांत वेळोवेळी येथील ग्रामसभेत चाकणला नगरपालिका करण्यात यावी, असा ठराव पुन्हा पुन्हा सर्वानुमते ग्रामसभेत  मंजूर करण्यात आला होता, व त्याबाबत कागद पत्रांची पूर्तता करून प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला होता.
मंत्रालयात मंजुरीसाठी असताना चाकण नगरपरिषदेचा हा प्रस्ताव मंत्रालयाला लागलेल्या आगीत खाक झाला होता.त्यानंतर  चाकण नगरपरिषदेचा प्रस्ताव जळालेल्या कागद पत्रांचे पुनर्गठन कार्यक्रमांतर्गत मंत्रालयाने जिल्हाधिकारी   कार्यालयाकडून विभागीय आयुक्तां मार्फत मागवून घेतला होता. अन्य बाबींच्या पूर्ततेनंतर पुन्हा मागविण्यात आलेला हा प्रस्ताव अंतिम  मान्यतेसाठी  मुख्यमंत्र्यांसमोर मागील पाच महिन्यांपूर्वी  दाखल करण्यात आला होता . मुख्यमंत्र्यांची अंतिम मान्यता मिळाल्या नंतर राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने या बाबतची उद्घोषणा जाहीर केली होती.मात्र मागील आठवड्यात चाकणचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत करण्या संदर्भात मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकी मुळे येथे कमालीचा गोंधळ निर्माण झाला आहे.

-------------------
-------------------

 
नगरपरिषद हद्दी मुळे नागरिकांची नाराजी कायम 
नगरपरिषद म्हणजे बडा घर पोकळ वासा

चाकण:  

चाकण ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 अनुसार लवकरच विलीनीकरण होणार असून यासंदर्भात आलेल्या हरकतींवर निर्णय झाल्यानंतर या बाबतची कार्यवाही होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात येत असताना पिंपरी चिंचवड समावेशाच्या शक्यतेने आश्चर्य व्यक्त होत आहे .
    जिल्ह्यात मोठ्या ग्रामपंचायतींची संख्या 34 आहे. मात्र त्यापैकी पाच ते सहा ग्रामपंचायतींचेच नगरपालिकेमध्ये रूपांतर करता येऊ शकणार असल्याचे 
प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी ,चाकण व राजगुरुनगर या दोन ग्रामपंचायतींनी जिल्ह्यात सर्वप्रथम पुढाकार घेतला होता. जिल्ह्यात सध्या 
खेड तालुक्यातील आळंदी सह बारामती,जेजुरी, लोणावळा, तळेगाव दाभाडे, इंदापूर, दौंड, शिरूर, सासवड,  जुन्नर, भोर आदी अकरा 
नगरपालिका कार्यरत आहेत.  राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचे नगरपालिकेत रूपांतर करण्याची घोषणा ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनीही  केली होती. तदनंतर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार खेड तालुक्यातील  चाकण व राजगुरुनगर या दोन ग्रामपंचायतींनी याबाबतचा ठराव केला होता.त्यानंतर येथे नगरपरिषदा अस्तित्वात येण्याचा मार्ग खुला झाला होता .मात्र चाकणची सध्याची जी हद्द आहे ती कायम ठेवून नगरपालिकेची हद्द निश्‍चित करण्यात आल्यास मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असलेल्या कंपन्यांचे महसुली उत्पन्न शहराला मिळणार नाही ,नागरी सुविधांबाबत फारसा फरक पडणार नाही ,चाकण नगरपरिषदे पेक्षा लगतच्या कारखानदारी असणाऱ्या छोट्या वाड्यांच्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न अधिकच राहणार आणि निरनिराळ्या करांमध्ये भरमसाठ वाढ होऊन चाकण हद्दीतील नागरिकांवरच अन्याय होईल अशी भूमिका चाकण ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची आहे ,
  शासकीय स्तरावर कागदोपत्री पाठपुरावा करून  मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर चाकण, नगर परिषदेच्या प्रस्तावाला राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी देवून  तसा अध्यादेश पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला खरा परंतु नगरपरिषदे साठी सध्या ग्रामपंचायतीची जी हद्द आहे तीच कायम ठेवण्यात आली असल्याने भविष्यात अस्तित्वात येणाऱ्या चाकण नगरपरिषदे पेक्षा लगतच्या कारखानदारी असलेल्या छोट्या वाड्यांच्या ग्रामपंचायतींचे  उत्पन्न अधिक राहणार असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर आळवला जात होता .चाकण नगर परिषदेच्या संदर्भात चाकण ग्रामपंचायतीची ची सध्याची जी हद्द आहे ती कायम ठेवून नगरपालिकेची हद्द निश्‍चित करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारी व अन्य मोठे महसुली क्षेत्र यातून बाजूला राहणार असल्याने भविष्यात अस्तित्वात येणाऱ्या चाकण नगरपरिषदे पेक्षा लगतच्या कारखानदारी असणाऱ्या छोट्या वाड्यांच्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न अधिक राहणार आहे अशी स्पष्ट भूमिका चाकण ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ,नागरिकांसह खुद्द जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे यांनीही मांडली आहे. नगर परिषद अस्तित्वात येवूनही  विस्तारत्या चाकण मध्ये किमान मुलभूत सुविधांपासून ते मोठी विकासाची कामे कशी मार्गी लागणार याबाबत नागरिकांमध्ये  संभ्रमाचे वातावरण आहे.चाकण नगरपरिषदेसाठी चाकण गावाचे गट क्रमांक 1 ते 2555 मध्ये असलेले संपूर्ण क्षेत्र पूर्व - नदी व कडाची वाडी गावची शिव, पश्चिम -खराबवाडी गावची शिव उत्तर -वाकी खुर्द गावची शिव  ,दक्षिण -मेदनकरवाडी व नाणेकरवाडी गावची शिव ,अशी सध्याची जी हद्द आहे ती कायम 
ठेवून नगरपालिकेची हद्द निश्‍चित करण्यात आली आहे. या हद्दीत कारखानदारी येत नाही त्यामुळे सध्या असलेले सुमारे दीड कोटी रुपयांचेच उत्पन्न कायम राहणार आहे.फार तर निरनिराळे अधिकीचे कर ,मोठे घर भला मोठा कर या माध्यमातून नागरिकांकडून वसुली होवूनही  महसुली उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढणार नाही असा नागरिकांचा नाराजीचा सूर आहे.जिल्ह्यातील नगरपरिषदांची अवस्था बिकट असल्याचे दाखले खुद्द जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे हे देत आहेत.
  
-------------
-------------
चाकणच्या प्रस्तावित नगरपरिषदेचा घोळ भाग 3
पिंपरी-चिंचवड समावेशाचा नवा घोळ कशासाठी 

चाकण:  
 चाकण ग्रामपंचायतीची सध्याची जी हद्द आहे ती कायम ठेवून नगरपालिकेची हद्द निश्‍चित करण्यात आल्याने  मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असलेल्या कंपन्यांचे महसुली उत्पन्न शहराला मिळणार नाही ,नागरी सुविधांबाबत फारसा फरक पडणार नाही ,चाकण नगरपरिषदे पेक्षा लगतच्या कारखानदारी असणाऱ्या छोट्या वाड्यांच्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न  अधिकच राहणार आणि निरनिराळ्या करांमध्ये भरमसाठ वाढ होऊन चाकण हद्दीतील नागरिकांवरच अन्याय होईल अशी भूमिका चाकण ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या समोर मांडली होती.या संदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने थेट हरकत घेण्याच्या विषयावर मतमतांतरे झाल्याने व संभ्रमावस्था वाढल्याने ग्रामस्थाकडून मागणीचा रेटा वाढल्याने  पुढाकार घेत खुद्द चाकण ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच साजिद सिकीलकर,माजी उपसरपंच अशोक बिरदवडे,दतात्रेय जाधव,रुपेश जाधव,आदींनी हरकती दाखल केल्या होत्या . या हरकतींवर निर्णय झाल्या नंतर पुढील कार्यवाही होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील संबधित अधिकारी वालगुडे यांनीही सांगितले होते.

चाकण नगर परिषदेचा प्रस्ताव अंतिम  मान्यतेसाठी  मुख्यमंत्र्यांसमोर मागील पाच महिन्यांपूर्वी  दाखल करण्यात आला होता . मुख्यमंत्र्यांची अंतिम मान्यता मिळाल्या नंतर राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने या बाबतची उद्घोषणा  जाहीर केली होती.2013 वर्षाच्या सुरुवातीलाच चाकण ला नगर परिषद लागू होणार असल्याची शक्यता खुद्द प्रशासनाकडून व्यक्त होत असताना व तशी जबरदस्त हवा निर्माण झालेली असताना 
  मागील आठवड्यात मंगळवारी (दि.7) मुंबईत राज्याचे नगरविकास खात्याचे सचिव श्रीकांत सिंग जिल्हाधिकारी विकास देशमुख, महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी आणि ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव,महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव,नगर परिषद प्रशासनाचे संचालक,व अन्य अधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करून पिंपरी चिंचवड मध्ये चाकण भागाचा समावेश करण्याचा विषय समोर आला.  एकीकडे चाकणला नगरपरिषद लागू करण्यासाठी सर्व पूर्तता केल्या नंतर नव्यानेच आलेल्या यापुढे आलेल्या या प्रस्तावाला या भागातून कडवा विरोध होऊ लागला आहे.प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या चाकणचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू झाल्याने या भागातील सर्वच पदाधिकारी,नागरिक ,लोकप्रतीनी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
   2013 या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच चाकणला नगरपरिषद येण्याची अपेक्षा नागरिकांना होती. नगरपरिषदेसारखे हे प्रशासन कुठल्याही क्षणी अस्तित्वात येण्याची शक्यता असताना चाकणचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू झाल्याने नागरिकांसह चाकण ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.चाकणच्या बाजूला पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्द मोशीपर्यंत आहे. मोशी ते चाकणदरम्यान अनेक लहान-मोठी गावे आहेत, त्यामुळे चाकणचा समावेश करताना ही गावेही महापालिकेत समाविष्ट करावी लागणार आहेत. त्यामुळे महापालिका हद्द ते चाकणदरम्यान असणाऱ्या सर्व गावांची लोकसंख्या, तेथील रोजगार आणि इतर गोष्टींचा अभ्यास करण्याची सूचना श्री.नगरविकास खात्याचे सचिव श्रीकांत सिंग यांनी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांना केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर अभ्यास अहवाल सादर केल्यानंतर चाकणचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करायचा की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.चाकणचे सरपंच काळूराम गोरे ,माजी उपसरपंच अशोक बिरदवडे, साजिद सिकीलकर ,पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी,शिवसेनेचे अशोक खांडेभराड आदींसह सर्वच पक्षीय पदाधिकाऱ्यांनी  चाकण चे अस्तित्व संपवून पिंपरी चिंचवड मध्ये विलीन होण्यास विरोधाची भूमिका घेतली आहे. 
---------------------
--------------------- 


लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी म्हणतात...

मुख्यमंत्र्यांची भूमिका दुटप्पी  : आमदार मोहिते 
 पिंपरी-चिंचवड मध्ये चाकण चा समवेश होऊ देण्यास आपण विरोधाची भूमिका घेणार असल्याचे खेड चे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.  तालुक्यातील नागरिकांना विश्वासात न घेता चाकण परिसराचा समावेश पिंपरी चिंचवड मध्ये करण्याचा डाव आपण यशस्वी होऊ देणार नाही.राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खेड तालुक्याच्या बाबतची भूमिका दुटप्पी आहे. तालुक्याचे पाणी पुण्याला ,अन्य जिल्ह्यांना पळवायचे,विकास प्रकल्प आमच्याच माथी मारायचे आणि कुठल्याही सुविधा द्यायच्या नाहीत अशी शासनाची भूमिका असल्यास आम्ही येथे होऊ घातलेल्या विमानतळाला , उर्वरित एमआयडीसीला ,आणि तालुक्यातील पाणी पुण्याला देण्यास कडव्या विरोधाचीच भूमिका घेवू असा सज्जड दम खेड चे आमदार दिलीप मोहिते यांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये चाकण चा समवेश हे 'पिल्लू ' मुख्यमंत्र्यांनीच सोडल्याची जळजळीत टीकाही  आमदार दिलीप मोहिते यांनी केली आहे.
 


...तर संघर्ष अटळ :सुरेश गोरे 
चाकण नगर परिषदेसाठी उद्घोषणा राज्य शासनाने जाहीर केल्याने अन्य तांत्रिक बाबी विचारात घेवून चाकण साठी ग्रामपंचायती एवजी नगरपरिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था लवकरच अस्तीत्वात येणार आहे.पिंपरी-चिंचवड समावेशा संदर्भात केवळ अभ्यास अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.मात्र पिंपरी-चिंचवड मध्ये चाकणच्या समावेशासाठी प्रयत्न झाल्यास तीव्र संघर्ष करण्याची भूमिका घेतली जाईल असे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश गोरे यांनी सांगितले.चाकण व पिंपरी-चिंचवड महापालिकेतील क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 'औद्योगिक क्षेत्र'निर्माण केले आहे.सदर औद्योगीक क्षेत्र राज्यपालांच्या आधी सूचनेने जाहीर करण्यात आले असल्याने ते महापालिकेत समविष्ट करता येणार नाही.चाकण औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक 1 ते 4 हे महापालिकेत समाविष्ट केल्यास उद्योग धंदे स्थलांतरित होण्याची शक्यता आहे.त्यामुळे टप्पा क्रमांक 1 ते 4 या औद्योगिक प्रभाव क्षेत्राखालील गावांसाठी स्वतंत्र औद्योगिक प्राधिकरण स्थापन करण्यात यावे व चाकण साठी स्वतंत्र नगर परिषदच  स्थापन करण्यात यावी अशी मागणीही गोरे यांनी केली आहे. 



चाकण साठी हवी संयुक्त महापालिका :शरद बुट्टे शासनाकडून अशा नगरपरिषदांना नेमका किती अधिकीचा निधी मिळतो असा प्रश्न पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांनी उपस्थित केला असून जिल्ह्यातील अनेक नगर परिषदांची अवस्था दयनीय असल्याचे सांगितले.चाकण परिसरासाठी लगतची गावे मिळून नवीन महापालिका अस्तित्वास आल्यास आद्योगिक क्षेत्रातील कारखानदारीचे उत्पन्न एकत्रित पणे चाकणपंचक्रोशीतील समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल .अण्णा साहेब मगर यांनी पिंपरी आणि चिंचवड  सारखी दोन गावे एकत्रित करून महापालिका स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला .आज ही महानगर पालिका उत्तमपणे कार्यरत आहे.मात्र चाकण चा समावेश त्या महानगर पालिकेत करणे संयुक्तिक ठरणार नाही.चाकणला नगर परिषद आल्यानंतर अधिकीचे कुठलेही निधी मिळणार नसून केवळ ग्रामपंचायत सदस्यां एवजी नगरसेवक चाकण शहराला मिळतील,व निधी अभावी समस्या जैसे थे राहतील.चाकणची सध्याची जी हद्द आहे ती कायम ठेवून नगरपालिकेची हद्द निश्‍चित करण्यात आली असल्याने औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारी व अन्य मोठे महसुली क्षेत्र यातून बाजूला राहणार असल्याने भविष्यात अस्तित्वात 
येणाऱ्या चाकण नगरपरिषदे पेक्षा लगतच्या कारखानदारी असणाऱ्या छोट्या वाड्यांच्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न अधिक राहणार आहे.ठाण्यासारख्या जिल्ह्यात अनेक महानगर पालिका अस्तित्वात असताना पुणे जिल्ह्यात दोनच महानगरपालिका कशासाठी असा सवालही असेही बुट्टे यांनी उपस्थित केला आहे.
 

-------------------   Avinash Dudhawade,chakan 9922457475                                    
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)