फर्नेस ऑईलमध्ये भेसळ करणारे सात टॅंकर ताब्यात



फर्नेस ऑईलमध्ये भेसळ करणारे सात टॅंकर ताब्यात

चोवीस लाखांचा माल जप्त ; एक जन ताब्यात
करंजविहीरे येथे एलसीबीची कारवाई

चाकण:अविनाश दुधवडे
कारखान्यांसाठी आवश्यक फर्नेस ऑईलमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी आज (दि.26)  पहाटे चार वाजता करंजविहीरे (ता. खेड,जि.पुणे ) येथे छापा टाकला. त्यामध्ये सात टँकर ,एक दुचाकी ,कॉस्टीक सोड्या सह सुमारे चोवीस लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे . या छाप्यात पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत अनेक जणांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिली असली तरी एकाला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. मागील दोन वर्षातील चाकण परिसरातील ही आणखी एक मोठीं कारवाई मानण्यात येत आहे.

 इजाज अहमद महबूब अली (वय 34,  रा. चंगुरीया,ता.दुधारा ,जि.कबीरनगर खलीलाबाद ) असे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या एकाचे नाव आहे.
या बाबतची फिर्याद पुणे ग्रामीण नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब नारायण पाटील यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या फिर्यादी नुसार इजाज अहमद महबूब अली याच्यासह पापाशेठ , मेहता , व सादिक (तिघांचेही पूर्ण नाव समजले नाही) या चौघांवर भेसळ करून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या माहिती नुसार त्यांनी आज (दि.26) पहाटे चार वाजनेचे सुमारास करंजविहीरे गावाचे हद्दीत धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत सुरु असलेल्या फर्नेस ऑईल भेसळीवर अचानक छापा मारला. त्याठिकाणी फर्नेस ऑईल मध्ये पाणी व कॉस्टीक सोडा मिसळण्याचे काम सुरु होते. पोलीस घटनास्थळी पोहोचताच वाहने जागेवरच सोडून सर्व जणांनी पळापळ सुरु केली. मात्र त्यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  घटनास्थळावरून पोलिसांनी  सात टँकर ( क्रमांक एम एच 05 के  9453 , एम एच 43 यु 8465 , एम एच 04 ई एल 1199 ,एम एच 12 टी 7922,  एम टी एफ 8151 , एम एच 04 एच 4663 , एम सी यु 1511 )  व एक दुचाकी (क्र. एम एच 14 वाय 478)  असा एकूण 24 लाख  23 हजार 600 रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे. त्यातील एका टँकर मध्ये (क्र.एम एच 04 ई एल 1199)  3 लाख 13 हजार  500 रुपयांचे एकूण 28 हजार 500 लिटर फर्नेस ऑईल भेसळ करताना मिळून आले आहे , असे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस अधिकारी घोरपडे यांनी सांगितले.  औद्योगिक कारखान्यांना आवश्यक फर्नेस ऑईलमध्ये पाणी , कॉस्टीक सोडा आणि जळालेले ऑईल मिक्स करून त्याची विक्री करणाऱ्या  तेलमाफियांच्या टोळीचा या प्रकरणात हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
 दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब नारायण पाटील यांच्या फिर्यादी नुसार चौघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरारी झालेल्यांचा शोध सुरु असल्याचे चाकणचे पोलीस निरीक्षक सुशील कदम व ठाणे अंमलदार कमलाकर शिंदे यांनी सांगितले.

गरीब गाया कारवाईत मारके बैल मोकाट :
महिन्याला कोट्यवधींच्या इंधनाची हेरफेर करणारे राज्यभरातील तेलमाफियांचे निर्ढावलेले नेटवर्क गेल्या दोन वर्षात चाकणच्या  वर्तुळात चर्चेला आले आहे. दोन वर्षात सातत्याने झालेल्या मोठमोठ्या कारवायांमुळे गेल्या सात-आठ महिन्यांत थंडावलेले भेसळखोर पुन्हा सक्रीय झाल्याचे या कारवाई मुळे स्पष्ट झाले आहे. वारंवारच्या या घटनांमुळे  तेलमाफियांचे तगडे राज्यस्तरीय जाळे चाकण मध्ये कार्यरत आहे ही बाब आता लपून राहिलेली नाही . चाकण हा औद्योगिक परिसर ऑटोहब प्रमाणे भेसळीच्या यागोरखधंद्याचा 'हब' होऊ लागला आहे. जून 2011 मध्ये खराबवाडी (चाकण )येथे झालेल्या कारवाईत  संशयास्पदरीत्या ज्वलनशील तेलाची वाहतूक करणारे दहा टॅंकर भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार ताब्यात घेण्यात आले होते . या टॅंकरचे चालक मात्र पळून गेले, त्यामुळे पोलिसांना सखोल माहिती मिळाली नव्हती , त्यानंतर जुलै 2011चाकण जवळ वाकी (ता.खेड) येथे बोथरा याच्या ऑइल डेपोवर नऊ टॅंकर पोलिसांनी काळ्या ऑइलमध्ये (फनेर्स ऑइल) भेसळ करताना उपविभागीय पोलीस अधिकारी भारत पाटील व पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी पकडले होते  . त्यानंतर पोलिसांना 20 हजार लिटरच्या दोन टाक्‍यांत सुमारे साडेतेरा हजार लिटर काळे ऑइल आढळून आले होते . मार्च 2012 मध्ये खालुंब्रे गावच्या हद्दीत तेलमाफिया टोळीला क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी जेरबंद केले होते.  जिल्ह्याचे  पोलीस अधीक्षक ,  स्थानिक गुन्हे अन्वेषण,पासून थेट मुंबईच्या क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी याभागात अशा भेसळ खोरांवर कारवाया केल्या आहेत. मात्र भेसळीचा सिलसिला काही थांबलेला नाही. सातत्याने होणाऱ्या भेसळीची खरीखुरी पाळेमुळे शोधून भेसळखोर वाहन चालकांवर कारवाई करण्याबरोबरच त्यांच्या सूत्रधार असलेल्या मोठ्या माशांनाही जाळ्यात घेण्याची गरज आहे. भेसळ उद्योगातील वाहन चालकांसारख्या 'गरीब गायांवर' कारवाया होताना सूत्रधार असणारे 'मारके बैल' मात्र मोकाट राहत असल्याचे वारंवार समोर आले आहे.
----------------------------- Avinash Dudhawade,chakan 9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)