पाण्याच्या प्रचंड दाबाने वाकी बंधाऱ्याजवळ खिंडार
वेगवान पाणी मिसळतेय भामा नदीत
संततधार पावसात बंधाऱ्याच्या फळ्या न काढल्याने नदीच्या पाण्याने फोडला किनारा
चाकण:
चाकण परिसरासह खेड तालुक्यातील पश्चिम भागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर भामानदीवरील वाकी (ता. खेड) गावच्या हद्दीतील चाकणच्या बंधाऱ्याच्या फळ्या न काढल्याने व बंधाऱ्यावरील पाण्याचा दाब प्रचंड वाढल्याने या पाण्याने किनाऱ्या लगतच्या शेताला चक्क शंभर - दीडशे फुटांचे खिंडार पाडले आहे. रविवारी रात्री पडलेल्या या खिंडारातून अतिशय वेगाने हे पाणी भामा नदी पात्रात मिसळत असून भामा नदी अक्षरश दुथडीभरून वाहत आहे.
संततधार पावसामुळे पाण्याचा दाब वाढल्याने व बंधाऱ्याच्या फळ्या बंद असल्याने वेगवान नदीच्या पाण्याने किनारा फोडला आणि प्रकार घडल्याचे चाकणचे सरपंच काळूराम गोरे व ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी यांनी सांगितले. मात्र या मुळे कोणत्याची प्रकारचा धोका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट पणे सांगितले आहे. या बंधाऱ्याच्या फळ्यांना सुद्धा काही ठिकाणी मोठी लिकेज असून त्यातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे. बऱ्याच वर्षांनी या बंधाऱ्या वरून पाणी वाहिले आहे. केवळ सुदैवानेच पाण्याचा एवढा दाब वाढूनही या बंधाऱ्याच्या गळती लागलेल्या फळ्यांना भगदाड पडले नाही असे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. बंधाऱ्या लगत पडलेल्या खिंडारा मुळे अर्धा एकर शेत जमीन वाहून गेल्याने शेतकरी बबन ज्ञानोबा कड यांचे मोठे नुकसान झाले असून भरपाई मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान पश्चिम भागात अद्यापही पावसाची रिपरिप सुरु आहे, त्यामुळे भामा नदीला पुन्हा पूर येण्याची शक्यता असल्याने चाकण ग्रामपंचायत प्रशासनाने या बंधाऱ्याच्या फळ्या काढण्यास सुरुवात केली आहे.
------
फोटो : भामा नदी वरील वाकी (ता. खेड)येथील बंधाऱ्यावर पाण्याचा दाब प्रचंड वाढल्याने या पाण्याने किनाऱ्या लगतच्या शेताला चक्क शंभर - दीडशे फुटांचे खिंडार पडले असून वेगाने हे पाणी भामा नदी पात्रात मिसळत आहे. (छाया:अविनाश दुधवडे,चाकण)
------------------------------------Avinash Dudhawade,chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा