ग्राऊंड फ्लोअरवर अडकले चाकणचे सुसज्ज रुग्णालय

ग्राऊंड फ्लोअरवर अडकले चाकणचे सुसज्ज रुग्णालय

 

चाकण: अविनाश दुधवडे 


सातत्याने होणारे अपघात, लोकसंखेचे वाढते लोंढे ,यामुळे रुग्ण त्यांचे नातेवाईक व नागरिकांची वारंवार होणारी मागणी यामुळे दोन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पामध्ये चाकण ग्रामीण रुग्णालयासाठी निधीची तरतूद करण्यात आल्या नंतर काम सुरु करण्यात आलेले चाकण रुग्णालय पुढील कामासाठी निधीच्या तरतुदी अभावी
ग्राऊंड फ्लोअर वरच अडकले असून सध्याच्या जुन्या रुग्णालयात पुरेशा सुविधांची वाणवा असल्याने अपघातग्रस्त रुग्णांना पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण किंवा पुण्याच्या ससून रुग्णालयात अथवा महागड्या खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे . त्यामुळे रुग्णांची ससेहोलपट होत आहे .

 दिवसेंदिवस प्रचंड वेगाने विस्तारणाऱ्या चाकणच्या उद्योगनगरीतील  चाकण ग्रामीण रुग्णालयात गेली पाच दशके असुविधा व समस्यांच्या शृंखलेने अडचणीत सापडले आहे. सन 1964 मध्ये तत्कालीन पंतप्रधान (स्व.) इंदिरा गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू झालेले चाकणचे प्राथमिक आरोग्य केंद्र नंतर या भागाचा उद्योगीकरण व विकास प्रकल्पांनी झालेल्या लोकसंख्यावाढीने अपेक्षित सेवा देण्यात नेहमीच अपयशी ठरले. 2006 साली या आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाला, मात्र काडीच्याही सोयीसुविधा मिळाल्या नाहीत. औद्योगिकरण होण्यापूर्वी येथील मर्यादित लोकसंख्या पाहून येथे मिळालेल्या सुविधा नंतर च्या काळात मोठ्या प्रमाणावर लोकसंखेचे लोंढे येथे आल्याने तोकड्या पडल्या. त्यातच अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी, विशेष तज्ज्ञांचा अभाव, अस्वच्छता, जुनाट बंद यंत्रणा, खिळखिळ्या झालेल्या कॉट, अपुरे पंखे आदी समस्यांच्या गर्तेत अडकलेले चाकण ग्रामीण रुग्णालय दुरावस्थेच्या फेऱ्यात सापडले.
ग्रामीण रुग्णालयाच्या दुरवस्थेचे फेरे संपुष्टात येण्यासाठी दोन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पामध्ये चाकण ग्रामीण रुग्णालयासाठी निधीची तरतूद करण्यात आल्या नंतरकोट्यावधी रुपये खर्चून तयार होत असलेले सुसज्ज ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर सुरु होण्याची याभागातील नागरिक वाट पाहत आहेत. प्रत्यक्षात काम सुरु झाल्या नंतर रुग्णालय लवकरात लवकर सुरु होईल अशी नागरिकांची, रुग्णांची अपेक्षा असताना ग्राऊंड फ्लोअरचे काम झाल्या नंतर वरच्या मजल्याच्या  कामासाठी निधीच्या तरतुदी अभावी हे काम  गेल्या काही महिन्यांपासून  रेंगाळले आहे. नव्या सुसज्ज रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.
 सद्य स्थितीत 11 हजार स्क्वेअर फुट बांधकाम झालेल्या या नवीन रुग्णालयाच्या सुसज्ज इमारतीमध्ये अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग, बाह्य़ रुग्ण विभाग, ट्रामाकेअर एक्स-रे  रूम, स्टोअर रूम व तीस रुग्णांसाठी कॉटची व्यवस्था,महिला वॉर्ड, वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी तीन खोल्या,ड्रेसिंग रूम,प्रयोगशाळा, औषध भांडार गृह दैनंदिन ओपीडी,बाळंतपणासाठी प्रसूतिगृह ची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.   दुमजली रुग्णालय होणार असल्याचे सुरुवातीला प्रशासनाकडून सांगण्यात आले होते ,मात्र प्रत्यक्षात दुसऱ्या (वरच्या)मजल्याचे 6 हजार स्क्वेअर फुट बांधकाम करण्यातच आले नसून महिला व पुरुष रुग्णांना वेगवेगळी व्यवस्था असल्या शिवाय रुग्णालय सुरु करणे अशक्य असून त्यासाठी वरच्या मजल्याचे काम नितांत गरजेचे झाले आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून  निधीची तरतूद झाल्यानंतर काम सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे .  चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एल.डी.कोसे यांनी सांगितले की, पुणे विभागाच्या आरोग्य विभागाच्या उपसंचालक कांचन जगताप यांनी तातडीने हे काम मार्गी लागण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे भेटी दरम्यान आश्वासन दिले आहे.

नवीन इमारतीला भेगा:
 ज्या नव्या इमारतीवर दुसरा मजला बांधला जाणार आहे त्या इमारतीची आत्ताच दुरावस्था झाली असून इमारतीस जागोजागी भेगा व चिरा पडल्या आहेत. त्यामुळे या कामाच्या दर्जा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून  दुसरा मजला झाल्यानंतर ही इमारत धोकादायक तर ठरणार नाही ना ? याचीही पुरेपूर खातरजमा करण्याची गरज निर्माण झाली आहे .

-------

फोटो  : चाकण येथील रुग्णालयाची ग्राऊंड फ्लोअरवर अडकलेली नवीन इमारत व या नवीन बांधकामाला पडलेल्या भेगा
--------------------------Avinash Dudhawade, chakan  9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)