खेड तालुक्याला लालदिव्याची हुलकावणीच

'मेरा नंबर कब आयेगा' ? म्हणण्याची वेळ
खेड तालुक्यासाठी लाल दिवा झाले दिवा स्वप्न
चाकण: अविनाश दुधवडे
राज्यातील अनेक तालुक्यांना दुसऱ्यांदा -तिसऱ्यांदा लालदिवे मिळत असताना खेड तालुक्याला मात्र 'मेरा नंबर कब आयेगा' ? असे म्हणण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खांदेपालट करताना भास्कर जाधव, प्रकाश सोळंके, गुलाबराव देवकर, रामराजे नाईक निंबाळकर, बबनराव पाचपुते, लक्ष्मण ढोबळे या मंत्र्यांना वगळण्यात आल्या नंतर त्यांच्या जागी ज्या मंत्र्यांची निवड होणार त्यात खेड तालुक्यालाही प्रतिनिधित्व मिळणार अशी जोरदार हवा होती. मात्र खेडचे दिवंगत आमदार नारायण पवार यांच्या नंतर विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांनाही तोच (अ) न्याय पक्षाने दिल्याची चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
दोन दिवसांपूर्वी खेडच्या दौऱ्यावर असणाऱ्या राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समोरही आमदार मोहिते यांनी तालुका मागासलेला असून विकासासाठी मंत्रीपदाची सुप्त इच्छा व्यक्त केली होती. त्यावर शरद पवार यांनी वाढती कारखानदारी ,गोदामे यामुळे जमिनींना आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या मोलाने याभागाच्या विकासाकडे लक्ष वेधत तुमच्या तालुक्यातला मागासलेपणा अन्य तालुक्यांना हवा आहे अशी मिस्कील टिप्पणी करीत याभागाचा विकास अधोरेखित केला होता. त्यामुळे आमदारांची विकासासाठी मंत्रिपद ही मागणी जवळपास त्यांनी धुडकावून लावली होती. मात्र खेड तालुक्यात आल्यानंतर काहीतरी घडते असे सूचक भाष्य केले होते.त्यामुळे तालुक्याला मंत्रिपद मिळणार अशी चर्चा गेल्या दोन तीन दिवसांत आमदार मोहिते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली होती.
आमदार मोहितेंसमोर अडचणी:
आमदार मोहिते यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याची तक्रार करण्यात आली आहे . रास्ता पेठेतील आपल्या तीन फ्लॅटची माहिती लपविली अशी लोककार्य एवम लोकक्रांती दलाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती . या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे सदानंद शेट्टी व विलास गायकवाड यांनीही तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यावरून पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार रमेश बागवे व राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी विधानसभा निवडणुकीत खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा चौकशी अहवाल आणि त्यावरील कारवाईची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच मागविली असल्याची चर्चा तालुक्यात आहे . आमदार बागवे यांच्यावरील कारवाईचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे . मात्र , आमदार मोहिते यांच्यावरील कारवाईचा अहवाल अद्याप तयार झालेला नव्हता असेही सांगण्यात येत होते . या बाबतचा कारवाई अहवाल तयार झाल्यास आणि या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास निवडणूक लढविण्यास अपात्रतेची गंभीर कारवाई होऊ शकते असेही बोलले जात आहे. या समस्यांच्या वावटळीला दिवा लावण्याचे दिव्य आमदार मोहिते यांना पार करावे लागणार आहे.
--------------------------
-------------------------- Avinash Dudhawade,chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा