चाकण मध्ये सापडणाऱ्या प्राचीन वस्तूंकडे लक्ष देण्याची मागणी

चाकण मध्ये सापडणाऱ्या प्राचीन वस्तूंकडे
लक्ष देण्याची मागणी
चाकण: अविनाश दुधवडे 

चाकण जवळ चार महिन्यांपूर्वी इतिहासकालीन आठ किलो तेवीस ग्रॅम वजनाची चांदीची नाणी आढळली होती. पुरातत्त्व विभागाकडे पाठविण्यात आल्यानंतर ही नाणी दुसऱ्या शतकातील असल्याचे स्पष्ट झाले होते  .त्यामुळे चाकणचा संबंध थेट इ.स. पूर्व दुसऱ्या शतकाशी जोडला गेला.  चार वर्षांपूर्वी येथे अतिप्राचीन यज्ञवराहाची मूर्ती आणि एका मूतीर्चे भग्न शिल्प ही सापडले होते. मात्र चाकण परिसरात सापडणाऱ्या अतिप्राचीन अवशेषांकडे दुर्लक्ष होत असल्या बाबत चाकणकरां मधून नाराजी व्यक्त होत आहे.
  पूणे - नाशिक मार्गावर असलेला चाकणचा संग्रामदुर्ग भूइकोट किल्ला  हा फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराने बलाढ्य मोगली सेनेसमोर सलग 55 दिवस लढवल्यामुळे शिवचरीत्रात प्रसिध्द आहे. औद्योगीकारणाने आणि शासनाच्या अनास्थेमुळे दुर्लक्षित झाला असला तरी याच भुईकोट किल्ल्यामुळे प्राचिन व दैदिप्यमान इतिहास चाकणला लाभला आहे. त्यामुळे येथे सापडणाऱ्या या अवशेषांकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक दुर्गप्रेमी करीत आहेत. चार महिन्यांपूर्वी  (फेब्रुवारी 2013 मध्ये) आगरवाडी येथील किसन आगरकर यांच्या शेतात आढळलेली आठ किलो 23 ग्रॅमची प्रत्येकी  एक ते दोन ग्रॅम वजनाची एकूण चार हजार चांदीची नाणी ही दुसऱ्या शतकातील "क्षत्रप' राजा यशोदामन व रूद्रसेन (दुसरा) यांची असल्याची बाब पुढे आली आहे.
वीरदामनचा पुत्र दुसरा रूद्रसेन महाक्षत्रप याची ही नाणी असून  त्यावरील काळाचा उल्लेख  इसवी सन 255-277 या काळातील व या नाण्यांवर  क्षत्रप राजा यशोदामन व रूद्रसेन (दुसरा) यांची मुद्रा असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार वर्षांपूर्वी चाकण किल्ल्याच्या उत्तर खंदकालगत  प्राचीन यज्ञवराहाची मूर्ती आणि एका मूतीर्चे भग्न शिल्प सापडले होते . दीड फूट उंच आणि दोन फूट लांबीच्या या वराहाच्या मूर्त्यांच्या चारही मांड्यांवर प्रत्येकी एक देवता कोरलेली आढळून आली  होती . यादव काळात चाकण येथे विष्णू आणि शिवाची भव्य मंदिरे होती. बडा अरब राजाने चाकणचा किल्ला बांधला. किल्ल्याच्या  निमिर्तीसाठी चाकण  परिसरातील अनेक मंदिरांचा विध्वंस करून त्याचे अवशेष बांधकामासाठी वापरले. या दोन्ही मूर्ती यापैकीच आहेत असा अंदाज इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी  वर्तविला आहे .चक्रेश्वर मंदिरावरून प्राचीन काळी चाकण हे प्रमुख शिवपीठ होते हे सिद्ध होते. तर सापडलेल्या यज्ञ वराहावरून विष्णूपीठही असले पाहिजे, असेही इतिहास संशोधकांना वाटते. चाकण भागात सापडणाऱ्या अतिप्राचीन वस्तूंवरून या भागाचा भौगोलिक, ऐतिहासिक व धार्मिक स्थितीचा सखोल अभ्यास करण्यात यावा अशी मागणी इतिहास प्रेमी, विविध संघटनांकडून व नागरिकांकडून होत आहे.

दुर्लक्षून चालणार नाही : पांडुरंग बलकवडे 
 इतिहासाची साक्ष देणाऱ्या प्राचीन वस्तू , मुर्त्या ,दुर्ग किल्ले प्रत्येकासाठी प्रेरणादायक व उमेद जागविणारे आहेत. त्यांचे जतन करणे, त्यांची अस्मिता जपणे हे आद्य कर्तव्य आहे, त्यांना दुर्लक्षून चालणार नाही . चाकण संग्रामदुर्ग परिसरात आणि लगतच्या भागात अशा अनेक मुर्त्या आहेत, त्या सर्वांचे एकत्रीकरण करून संग्रहालय उभारले पाहिजे .त्यामुळे अभ्यासकांना संशोधन सोयीचे होईल. शासनाने या बाबत पुढाकार घेतला पाहिजे असे इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले. 


---------------------------------------------------------------------Avinash Dudhawade,chakan  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)