वाहन उद्योगांच्या उत्पादकतेत घसरण सुरूच
चाकण मधील स्थिती
ऑटो सेक्टरमध्ये खुशी गमचा सिलसिला कायम
चाकण: अविनाश दुधवडे
चाकण औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या वाहन उद्योगाशी संबंधित विविध उद्योगांवर सहा महिन्यांपूर्वी आलेले अंशतः मंदीचे सावट कमी होईल असे वाटत असतानाच ,ही मंदी पुन्हा
डोके वर काढीत असल्याचे चित्र चाकण औद्योगीक वसाहतीत पहावयास मिळत आहे . मागील काही काळापासून औद्योगिक उत्पादनावर परिणाम जाणवू लागला आहे. विशेषतः मोठ्या वाहन कंपन्यांना सुटे भाग पुरविणाऱ्या लघुउद्योगांना याचा मोठा फटका बसला असून, अनेक अस्थायी कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळत आहे. या गेल्या काही काळापासून मंदीच्या सिलसिल्यामुळे घटलेल्या उत्पादनाची गाडी पुन्हा रुळावर आणून त्याला गती देण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरत्या वर्षांत उद्भवलेल्या अंशतः मंदीने कोट्यावधी रुपयांचा फटका बसला होता ,आता पुन्हा उद्भवलेल्या या स्थितीने चाकण औद्योगिक क्षत्रातील काही उद्योगांचे हाय-पाय गळायला सुरवात झाली आहे.औद्योगिक मंदीची झळ चाकण या उद्यमनगरीत असलेल्या ट्रान्सपोर्टलाही बसत आहे.विविध प्रकारच्या मालाची ने-आण करण्यासाठी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून मालवाहतूक करण्यात येते. मात्र , सध्या कंपन्यांमधील उत्पादन मंदावल्याने त्याचा फटका या व्यवस्थेलाही बसत असून अनेक मालवाहतुकीची वाहने मालाअभावी जैसे थेच आहेत असे मालवाहतूकदारांकडून सांगण्यात येते.औद्योगिक विकासावरही मंदीचा परिणाम झाल्याचे विक्रीकर,विजेचा वापर व अबकारी कर या तीन घटकांमधूनही स्पष्ट होत असल्याचे या क्षेत्रातील मंडळींचे मत आहे .
चाकण औद्योगिक वसाहतीत अनेक कारखान्यांचे चलन-वलन वाहन उद्योगाशी संबंधित असून मोठ्या वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर मध्यम व लघु उद्योग अवलंबून आहेत .उत्पादित वाहनांना फारसा उठाव नसल्याने मोठ्या कारखान्यांनी आपल्या पुरवठादार कारखान्यांना कामे देताना हात आखडता घेतला आहे. त्याचाही फटका मध्यम व लघुउद्योगांना बसला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरातील चढ-उतार, गाड्यांच्या वाढत्या किमती यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी येत आहे; आंतरराष्ट्रीय व देशपातळीवरील वाहनउत्पादक कंपन्यांनी सुट्या भागांची आयात कमी केली आहे. त्यांचे पुरवठादार म्हणून काम करणाऱ्या स्थानिक उद्योगांना याचा फटका बसला आहे. मोठ्या कंपन्यांनी उत्पादन कमी करून देखभाल-दुरुस्त्यांची कामे सुरू केली आहेत. अनेकांनी प्रकल्पांचे विस्तार लांबणीवर टाकले आहेत. मागील कालखंडात मोठ्या उद्योगांनी ले ऑफचा आधार घेतला होता.गेल्या जूनपासून अनेक उद्योगांनी दुसरी व तिसरी पाळी बंद केली होती . कामगारांना विनापगार जादा सक्तीची सुटी दिली जात होती.त्यानंतर दीपावलीच्या दरम्यान उत्पादन वाढल्याने परिस्थितीत सुधारणा होते आहे असे वाटत असतानाच पुन्हा एकदा उत्पादन घटू लागले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या तसेच कंत्राटी कामगारांना सुटी देऊन खर्चात कपात करण्याचा उद्योगांचा प्रयत्न सुरु आहे. वाहन उद्योगां व्यतिरिक्त अन्य उद्योगांची येथील संख्या नगण्य असून हे उद्योग मात्र अद्याप चांगला तग धरून आहेत.वाहन उद्योगाबाबतही येत्या काही दिवसांमध्ये वाहनांना मागणी वाढून उत्पादनाच्या सकारात्मक आकडेवारीने ही अंशतः निर्माण झालेली मंदी कमी होईल अशी अपेक्षा काही उद्योजक आणि त्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
उत्पादकतेवर 25 ते 30 टक्के परिणाम :
वाहनांच्या सुट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या लघुउद्योजकांची संख्या चाकण औद्योगिक क्षेत्रात जास्त आहे. त्यांना मंदीचा परिणाम जाणवू लागला आहे. येथील बहुसंख्य कारखान्यांचे उत्पादन 25 ते 30 टक्क्यांनी घसरले आहे. टाटा मोटर्स सारख्या बड्या कंपन्यांवर अवलंबून असणाऱ्या मध्यम व लघुउद्योगांची स्थिती सध्या चिंताजनक आहे. महिंद्रा एंड महिंद्रा, व्होक्स वोगन, ह्युंदाई, बजाज आटों ,मर्सिडीज बेंज ,सॅनी इंडिया,अशा बड्या बहुराष्ट्रीय कंपन्याही हा फटका बसत आहे .मंदीतून बाहेर येण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्राला गती देण्यासाठी किमान काही महिन्यांचा कालावधी लागतो. दरम्यानच्या काळात सरकारने या उद्योगांसाठी काही खास योजना राबविली, तर ही गाडी लवकर रुळावर येऊ शकते, असे चाकण चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचे सचिव दिलीप बटवाल यांनी सांगितले.कारखान्यांची उत्पादकता घटल्याचे चाकण परिसरातील उद्योगांचे प्रतिनिधी व चाकण चेंबरचे उपाध्यक्ष अंकुश बेंडूरे ,मुमताज अन्सारी ,आदींनीही सांगितले. तर चाकण औद्योगिक क्षेत्रातून विजेचा वापर गेल्या दोन महिन्यांपासून तब्बल 20 टक्क्यांनी घटल्याचे वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
दृष्टिक्षेपात मंदी सदृश्य स्थिती ...
सर्वच ऑटोमोबाईल उद्योगांना झळ
कामांच्या रात्रपाळ्या बंद
काहींनी सुरु केली कामगार कपात
उत्पादन 25 टक्क्यांनी घसरले
विजेची मागणी 20 टक्क्यांनी घटली
वाहन उद्योगां व्यतिरिक्त उद्योग सुस्थितीत
----------
---------- Avinash Dudhawade,chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा