भगिनींच्या सुरक्षेसाठी पोलीसदादांचा पुढाकार
चाकण पोलीस देणार महिलांना स्वसंरक्षणाचे धडे
चाकण:
गेल्या वर्षात (2012) चाकण परिसरात 4 बलात्काराच्या घटना घडल्या , विनयभंग आणि महिला ,विद्यार्थिनी महाविद्यालयीन तरुणींच्या छेडछाडीचे अनेक प्रकार
वेळोवेळी समोर येतच असतात. अशा घटना स्थानिक पातळीवरील दबावांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कसोटी लावणाऱ्या ठरतात. दिल्ली येथील दुर्दैवी घटनेच्या
पार्श्वभूमीवर महिलांमधील असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी चाकण पोलिसांनी महिला आणि तरुणींमध्ये लोकजागृती करून स्वसंरक्षणाचे धडे देवून
ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.
सामाजिक जबाबदारी म्हणून हे काम पोलिसांनी हाती घेतले असून,यासाठी सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी महिला संघटनांनीही या मध्ये सक्रीय होण्याचे आवाहन पोलिसांनी
केले आहे. महिलांवर अत्याचार झाल्यास ठराविक पोलिसांना फक्त या कामी नियुक्त करून अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी
चाकण परिसरातील महिलांचे मेळावेही घेण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी सांगितले. महिलांनी तक्रार केल्यास त्यांचे नाव गुपित ठेवून संबंधितांना
आपल्या पोलिसी स्टाइलने धडा शिकविण्याचा निर्धार येथील पोलीस प्रशासनाने केला आहे.
कौटुंबिक हिंसाचाराविरूद्ध महिलांना संरक्षण मिळावे म्हणून देशात अनेक कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या. तरीही कौटुंबिक हिंसाचार, हुंडा, लैंगिक अत्याचार, अपहरण
आणि शारीरिक तसेच मानसिक स्वरूपाच्या त्रासाच्या घटना स्त्रियांसोबत घडत असतात. भारतीय पुराणात स्त्री संरक्षणाला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. प्राचीन भारतीय
संस्कृतीत स्त्रीला देवी, दुर्गा, शक्ती स्वरूपात आराध्यदैवत समजून पूजनीय असल्याचे पुरावे आढळतात. परंतु आधुनिक काळात मानवाच्या नीतिमूल्यातील घसरणीमुळे आणि
वाढत्या औद्योगिक विकासामुळे स्त्रीची अशा वंदनीय अवस्थेतून दयनीय रूपात परिवर्तन झालेले पहावयास मिळते . दररोज नित्य नवनवीन प्रकारचे होणारे स्त्री
अत्याचाराचे प्रकार माध्यमातून समोर येत आहेत. चाकण सारख्या भागात शाळा महाविद्यालये सुटल्यानंतर रोड रोमीओंचा उच्छाद वाढल्याच्या पालकांच्या तक्रारी असून
त्याकडेही सर्वांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. ह्याशिवाय ज्या कुटुंबात अथवा घरात ती स्वत:ला सुरक्षित समजते त्याच तिच्या घरात ती कौटुंबिक हिंसाचाराला
बळी पडते आहे. स्त्रियांवर होणाऱ्या निरनिराळया अत्याचारापासून व कौटुंबिक हिंसाचारापासून तिला संरक्षण व हक्क प्राप्त करून देण्यासाठी आजपर्यंत अनेक कायदे अस्तित्वात
आहेत.
भारतीय दंड विधान कायदा (1860) ,हुंडा प्रतिबंधक कायदा(1961),सती प्रथा विरोधक कायदा (1987),स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन विरोधी कायदा(1986),
घटस्फोट कायदा, कुटुंब न्यायालय कायदा, मुस्लिम महिलांसाठी कायदा ,गर्भलिंग परिक्षण व गर्भपात विषयक कायदा इ.कायदे अस्तित्वात आहेत.
अशाप्रकारच्या निरनिराळया कायद्याअंतर्गत स्त्रियांना मिळणारे हक्क किंवा संरक्षण आणखीन प्रभावीपणे लागू होण्यासाठी `कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण
कायदा (2005) निर्माण झाला. कौटुंबिक हिंसा ही घरात घडते ज्याला आपण आपल्या सर्वांचे सर्वात सुरक्षित स्थळ समजतो. आजपर्यंत बरेच स्त्री अत्याचार विषयक कायदे
निर्माण झालेत, परंतु घराच्या चार भिंतीआड होणारा हिंसाचार आजवर उपेक्षिलाच जातो . अश्लील एस एम एस वैगरे पाठविल्यास अजामीन पात्र माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये
कारवाई होऊ शकते .महिलांना दिलासा देणारे कायदे अस्तित्वात असले तरी तरी महिलांमध्ये या बाबत जागृती नसल्याने अनेक महिला आपल्या वरील अत्याचार
गुपचूप सहन करताना सर्रास दिसून येतात.त्यातून काही वेळा नैराश्यग्रस्त होऊन बेपत्ता ते त्या पुढील आत्महत्ये सारखे आत्यंतिक टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनाही अनेकदा
समोर आल्या आहेत.घरात किंवा बाहेर हिंसाचाराला बळी पडणाऱ्या स्त्रियां आपल्या हक्कासाठी वा संरक्षणासाठी जो पर्यंत जागृत होणार नाहीत तोपर्यंत ह्या
चुकीच्या प्रवृत्तींचा बुरखा टराटरा फाटणार नसल्याने महिलांमध्ये जागृती आवश्यक झाली आहे, असे चाकण चे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी सांगितले.
----------------------- अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
---
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा