कांद्याच्या बाजारभावाचे गणित निर्यातीवर अवलंबून
कांद्याच्या बाजारभावाचे गणित निर्यातीवर अवलंबून
चाकण : अविनाश दुधवडे
कांद्याचा हंगाम सुरु झाल्याने शनिवार या आठवडेबाजाराच्या दिवसासह बुधवारच्या बाजारातही कांद्याची अशी मोठी आवक सुरु झाली आहे. मात्र
प्रत्येकच वर्षी या हंगामात मागणी पेक्षा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नाईलाजाने कांदा कवडीमोल भावाने द्यावा लागत असल्याच्या तक्रारीने यंदाच्या
वर्षापासून या हंगामात कांद्याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार दैनंदिन पद्धतीने करण्यात येत आहेत.त्यामुळे केवळ आठवडे बाजाराच्या दिवशी कांद्याची मोठी आवक
होऊन भाव गडगडण्याची नामुष्की ओढवणार नसल्याचा बाजार समिती प्रशासनाचा कयास आहे.याच पार्श्वभूमीवर चाकण मार्केट यार्डात कांद्याचे कामाल भाव अजूनही 1800 रुपयांवर वर स्थिरावले आहेत.
प्रत्येक वर्षी या हंगामात चाकण सह सर्वच बाजारपेठेतील कांद्याचे भाव मोठ्या आवकेच्या पार्श्वभूमीवर कोसळत असल्याचा अनुभव असून असून, हे भाव जवळजवळ 400 रुपयांच्या सर्वसाधारण पातळीच्याही खाली आल्याच्या नोंदी बाजार समित्यांकडे आहेत .कांद्याच्या लागवडी नंतर
बाजार भावाचे गणित जुळवीत, लाखांचे आकडे जुळवीनाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्षात उत्पादन खर्चही येत नसल्याची स्थिती अनेकदा निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांनीही आयत्या वेळी आंदोलनांची हत्यारे उपसल्याची व कांद्याचे लिलाव बंद पाडून पुन्हा आपलेच नुकसान करून घेतल्याची स्थिती चाकण येथे अनेक
शेतकऱ्यांनी अनुभवली आहे.ग्राहक ते शासनापासून निर्यातदारापर्यंत डोळ्यात पाणी आणण्याचा गुणधर्म कांद्याने सर्वानांच वेळोवेळी दाखविला असला तरी कांद्याच्या बाजारभावावर वर्षभराचे आर्थिक नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या कांद्याने सर्वाधिक रडविले आहे. केलेला खर्चही भरून निघत नसल्याने उत्पादकांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणल्याचा अनुभव नेहमीचाच आहे . सतत च्या या अनिश्चितते मुळे या भागातील कांदा उत्पादनात अग्रेसर असणारा मोठा कांदा उत्पादक शेतकरी कमीत कमी अडचणीत यावा याच हेतूने यंदाच्या वर्षीपासून दैनंदिन पद्धतीने कांद्याची खरेदी विक्री सुरु करण्यात आल्याचे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास कातोरे व सचिव सतीश चांभारे यांनी सांगितले.
नळी फुंकिली सोनारें...
सध्या कांद्याचा हंगाम सुरु झाल्याने दैनंदिन पद्धतीने खरेदी विक्री सुरु झाली असली तरी येत्या काही दिवसांमध्ये दर शनिवार आणि बुधवारी येथील बाजारात किमान 70ते 80 हजार पिशव्यांची आवक होणार आहे .शासनाचेही कांद्याच्या बाबतचे धोरण दुटप्पी आहे.पर्यायाने बाजार भावाचे गणित पुरतेच कोलमडण्याची शक्यताही नाकारता येणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे .या सर्व पार्श्वभूमीवर कांद्याला शासनाने हमीभाव द्यावा अशी नेहमीची मागणी होत आहे व शासन याबाबत नेहमीप्रमाणे 'नळी फुंकिली सोनारें नि इकडून तिकडे गेले वारे'या भूमिकेत आहे.कांद्याचे सध्याचे निर्यात मूल्य तसेच ठेवून केंद्र शासनाने निर्यातीस प्रोत्साहन पर अनुदान देऊन कांद्याची निर्यात परदेशात केल्यास शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळून कांद्याचा उत्पादन खर्च भरून येऊ शकेल अशी अपेक्षा यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना आहे.
---------------
अविनाश दुधवडे,चाकण 9922457475
Avinash Dudhawade ,chakan 9922457475
chakanreporter@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा