चाकण मागोवा 2012
भाग 1
चाकण:अविनाश दुधवडे
मावळते वर्ष चाकण करांना जमीन व्यवहार वगळता अन्य क्षेत्रात फलदायी ठरले नाही. लहरी पावसामुळे शेती क्षेत्रात निरुत्साह, उद्योगक्षेत्रात काही नव्या कारखान्यांच्या
आगमनानंतरही व मंदी सदृश्य स्थिती झाल्याने निर्माण झालेली चिंता, गुन्हेगारी क्षेत्राची झालेली पळापळ ,अतिक्रमणांवरील बुलडोझर ,वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषद -
पंचायत समिती निवडणुकांचा धुराळा ,चाकण नगरपालिकेचा शासन स्तरावरील निर्णय मात्र हद्दीच्या निर्बंधांमुळे नागरिकांमधील नाराजी अशा घटनांनी सरते 2012 वर्ष गाजले.
सरते 2012 वर्षे आध्यात्मिक ,सांस्कृतिक, कार्यक्रमांमधून सामाजिक भान जोपासून काही अंशी उत्साहवर्धक वाटणारे ठरले .तर डेंग्यू -मलेरिया आजारांचा
धुमाकूळ , चाकण एमआयडीसी वर काही काळ घोंघावलेले मंदीचे सावट , कारखानदारांची संघटना चाकण इंडस्ट्रीज असोसिएशन मध्ये उफाळलेले वाद,
कांद्याच्या किमतीत आलेली मोठी घट, फर्नेस ऑईलमध्ये भेसळीच्या करोडो रुपयांच्या काळ्या गोरख धंद्यांवरील चाकण भागातील कारवाया ,शेतकऱ्यांसाठी शेतमालाचे
उत्पादन घटल्याने निरुत्साहाचे ठरले . सरत्या वर्षाने कांदा-बटाटा उत्पादकांना पुन्हा एकदा देशोधडीलाच लावले.
गुंडोबांवरील धाडसी कारवाई :
विधानसभेत पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारीचा विषय ऐरणीवर आल्याने पोलिसांनी राज्य शासन आणि गृहमंत्री यांच्या आदेशावरून चाकण भागात
गुंडोबांवर धडक कारवाई करीत एकाच रात्रीत अनेक नामचीन गुंडांची पोलीस ठाण्यात पकडून आणून बेदम धुलाई केली . या कारवाई ने कारवाईने
जिल्ह्यातील गुंडगिरीचा बुरखा सरत्या वर्षात टराटरा फाटला . कारवाई करण्यात आलेल्या 47 जणांपैकी 19 जण राष्ट्रवादीचे ,3 जण शिवसेनेचे ,2 जण कॉंग्रेस चे
तर मनसे आणी भाजपा चे प्रत्येकी एक जण सक्रीय पदाधिकारी होते. यात केवळ पंटर मंडळींवर कारवाई झाली, काही निरपराधी पदाधिकार्यांना नाहक त्रास दिला
गेल्याची त्यानंतर मोठी चर्चा झाली.
साडेतीन हजार हेक्टर जमीन संपादित :
पुणे जिल्ह्याचा औद्योगिक पट्टा आणी आसपासच्या परिसरात जागांच्या किंमतीत झालेली प्रचंड वाढ गेल्या काही वर्षांपासून गँगस्टर लोकांचे लक्ष वेधून घेण्यास कारणीभूत
ठरली असल्याचे सर्वश्रुत आहेच .औद्योगिक विकासाच्या चर्चेमुळे जमिनींचे व्यवहार वाढले. विशेषत:चाकण च्या पश्मिकडील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाले.
औद्योगिक जमिनींचे दर दीड कोटींच्या पर्यंत प्रती एकरास ,पोहोचले तर फ्लॅटचे दरही कमाल साडेतीन हजार रुपये चौरस फुटापर्यंत भिडले. शासनाच्या विविध विकास
प्रकल्पा सह बांधकाम व्यवसायातील बूम मुळे शेकडो हेक्टर जमिन वळतेय शेतीपासून बिनशेतीकडे यंदाच्या वर्षी वळविली गेली. एमआयडीसी टप्पा 1 ते 5 मध्ये सरत्या
2012 वर्षाअखेरी पर्यंत 3 हजार 596 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे .
सरत्या वर्षात पेटला राष्ट्रवादीच्याच दोन आमदारांतला संघर्ष :
राष्ट्रवादीच्याच दोन आमदारांमध्ये संघर्ष पेटल्याचे चित्र जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड मध्ये सरत्या वर्षात पहावयास मिळाले . खेड चे आमदार दिलीप
मोहिते आणि भोसरीचे आमदार विलास लांडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांना धोबीपछाड देण्याचे सत्र चाकणकरांनी अनुभवले .आमदार मोहिते यांच्या विरोधात विशाल
मुंगसे खून प्रकरणी हात असल्याचा संशय व्यक्त करीत आमदार लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको आणि घोषणाबाजी केल्याच्या प्रकारानंतर आमदार मोहिते समर्थक
कार्यकर्त्यांनी चाकण- शिक्रापूर रास्ता रोखून आमदार लांडे यांच्या पुतळ्याचे प्रचंड घोषणाबाजी करीत दहन करून हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खेड-आळंदी
विधानसभा मतदार संघाचा संघर्ष आणखी एका विधानसभा मतदार संघाशी सरत्या वर्षातच सुरु झाला.
विज वितरणचा सुखद धक्का :
राजगुरुनगर डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या चाकणसह लोणावळा,तळेगाव,वडगाव मावळ भागात नियमित पणे होणारे सुमारे साडेपाच तासांचे
भारनियमन सरत्या वर्षात रद्द करण्यात आले आले .राजगुरुनगर विभागाची वसुली उत्तम असून हा भाग पूर्वी कमी वसुली आणि निरनिराळ्या कारणांमुळे 'डी'गटात
(ग्रुप मध्ये) होता.सरत्या वर्षात चांगल्या वसुलीने हा भाग 'बी'गटात पोहचला. त्यामुळे येथील भारनियमन रद्द अथवा कमीत कमी झाले आहे.
----------------
----------------
चाकण मागोवा 2012
भाग 2
चाकण : वार्ताहर
सरत्या वर्षात झाली चाकण विमातळ जागेची निश्चिती :
चाकण हे पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे. तेथील धावपट्टी हवाई दलाच्या लोहगाव येथील विमानतळाला समांतर ठेवणे अवघड होते. त्यामुळे
हवाई दलाच्या विमानांचा मार्ग सुरक्षित राहणे शक्य नव्हते. चाकण येथून जवळ असलेल्या भामचंद्र डोंगराचाही उड्डाणासाठी अडथळा होणार असल्याचे मत
हवाई दलाने व्यक्त केले होते. त्यामुळे चाकणपासून आठ किलोमीटरवर शिरोली-चांदूस परिसर नव्याने निवडण्यात आला होता. तेथे विरोध होऊ
लागल्याने उद्योजकांकडून तिसरा प्रस्ताव सरकारला देण्यात आला होता. भारत फोर्जच्या एसईझेडसाठी खेड तालुक्याच्या पूर्वेला भूसंपादन केली जाण्याची जोरदार
हवा येथे निर्माण झाली होती.प्रत्यक्षात मात्र खेड तालुक्यातीलच मात्र नवीनच पाईट परिसरातील जागेवर एमएडीसी आणि
शासनाचे एकमत झाले आहे.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मुंबईत बैठक घेवून त्यासाठी जमिनी संपादित करण्यास 200 कोटी रुपयांचा निधी देण्यास सरकारने
सहमती दर्शविली असल्याने हीच जागा निश्चीत झाली आहे.तालुक्यातीलच नवीन जागी हे विमानतळ उभे राहणार असले तरी ते 'चाकण विमानतळ'या नावेच ओळखले
जाणार असल्याचे प्रशासना कडून बोलले जात आहे.
निवडणुकांचे टोकाचे राजकारण अन काहींचे नथीतून तीर :
सरत्या 2012 वर्षाच्या सुरुवातीलाच सगळीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची लगीन घाई पहावयास मिळाली. आपलीच उमेदवारी
निश्चित होईल या अविर्भावात इच्छुक उमेदवार अंग झटकून कामाला लागलेले राजकारणी, मी सांगेन त्यांनीच निवडणुका लढवायच्या असा दमदार सल्ला
दादांनी भरल्यानंतरही चाकण भागात गुडघ्याला बाशिंग बांधलेले उमेदवार ,दादांची मर्जी राखण्यासाठी कडव्या इच्छुकांनी दादा नामाचा सुरु केलेला
जोरदार जप ,हाताच्या बोटावर मोजण्या इतपत दिवसांत प्रचाराची धुळवड, मतदारांपर्यंत पोचताना उमेदवारांची थोडी झालेली पाळता भूई , गावागावातील
प्रचंड टोकाचे झालेले राजकारण, आणि स्वतःला नाही तर पत्नीला राजकारणात पुढे करणारे पदराआडचे राजकारणी, आणि पदाधिकार्यांमधील उफाळलेले वाद
यामुळे या निवडणुका सर्वांच्याच चांगल्या लक्षात राहिल्या .
सरत्या वर्षात सर्वात मोठी अतिक्रमानांवरील कारवाई :
जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावरील अतिक्रमणे अनेक वर्षानंतर हटविण्यात येथील पोलिसांसह ग्रामपंचायत प्रशासनास यश आले आहे. व वाहतुकीच्या कोंडीतून नागरिकांना काहीसा
दिलासा मिळण्या इतका रस्ता रस्ता रुंद झाला असून त्यामुळे अनेक वर्षानंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला . चाकण माणिक चौक ते मार्केटच्या पुढे चाकण च्या
वेशी पर्यंत हॉटेल ,कापड व्यवसायिक, निरनिराळे दुकानदार, आणि छोटय़ा टपरीधारकांनी अगदी रस्त्यालगत पर्यंत आपली दुकानांची हद्द वाढविली होती. मग या
दुकानांसमोर वाहने लावण्याची सोय नसल्याने अशी वाहने थेट रस्त्यावर उभी करण्यात येत असल्याने गेल्या काही वर्षांपासून चाकण च्या
अरुंद होत चाललेल्या रस्त्यांचा,अतिक्रमणांचा ,आणि वाहतूक कोंडीचा विषय ऐरणीवर आला होता, महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थ्यांनी जीव मुठीत धरुन या रस्त्यावरून
ये जा करावी लागत होती. रस्त्यावर वाहनांसाठी पार्किंग अथवा थांबा नसल्याने वाहन चालक आपल्या मर्जीप्रमाणे मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी
वाहने लावीत असत . या पार्श्वभूमीवर येथील पोलीस अधिकार्यांनी पुढाकार घेत आजवरची सर्वात मोठी अतिक्रमण हाताव कारवाई केली. या कारवाईची थेट गृहमंत्री आर.
आर.पाटील यांनी पाहणी करून कौतुक केले.
सरते वर्ष ठरले पोलिसांची कसोटी पाहणारे :
सरत्या वर्षात चाकण पोलिसांनी अनेक "हेवी क्राईम' अनुभवले. चाकण औद्योगिक क्षेत्रात असामाजिक प्रवृत्ती दडल्याच्या संशयाने पोलिसांची झोप उडवली होती.
त्यामुळे कारखानदारांनी आपल्याकडील कामगारांची माहिती द्यावी यासाठी चाकण चे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी मोहीम उघडली होती.
नोव्हेंबर 2012 अखेर पर्यंत 6 खून ,4 खुनाचे प्रयत्न ,4 बलात्कार, 2 विनयभंग , एक दरोडा, चार जबरी चोऱ्या, 23 घरफोड्या, इतर 97 स्वरूपाच्या चोऱ्या,
14 गर्दी मारामारीचे प्रकार, 8 ठगबाजीचे प्रकार, 82 प्राणघातक अपघात , अशा गुन्ह्यांच्या आलेखाने आणि आव्हानात्मक गुन्ह्यांच्या तपासामुळे सरते वर्ष चाकण
पोलिसांची कसोटी पाहणारे ठरले.
----------------
---------------- अविनाश दुधवडे,९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा