मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी देणार संघटीत लढा
महाराष्ट्र कामगार सभेची चाकणला स्थापना
चाकण:
शासनाच्या विविध योजना गावपातळीवर राबविणारे ग्रामपंचायत कर्मचारी स्वातंत्र्य काळापासून अगदीच तुटपुंज्या मानधनावर काम करीत असल्यामुळे कर्मचारी गेल्या 40 वर्षांपासून वेतनश्रेणीच्या प्रतीक्षेत आहेत.एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थातील पहिला स्तर असणाऱ्या ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी त्यांना थेट निधी देऊ केला असताना दुसरीकडे ग्रामपंचायतचा कारभार पाहणाऱ्या या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्यामुळे ग्रामपंचायत तुपाशी तर कर्मचारी उपाशी असल्याची भावना व्यक्त करीत चाकण परिसरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी या विरोधात लढा देण्याचा
निर्धार करीत महाराष्ट्र कामगार सभा या संघटनेची येथे आज (दि.20) स्थापना केली आहे .
चाकण ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत "काम बंद' आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा पर्यंत या पूर्वीही केला होता. मात्र या बाबत कुठलाही ठोस निर्णय झाला नव्हता. त्यामुळे या सर्व कामगारांनी महाराष्ट्र कामगार सभेचे संस्थापक अध्यक्ष ऍड.नाना क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण (ता. खेड) येथील मारुती मंदिरात आयोजित करण्यात
आलेल्या बैठकीत पूर्वीची संघटना सोडून महाराष्ट्र कामगार सभा या संघटनेचे सभासदत्व स्वीकारले आहे .
या वेळी ऍड.नाना क्षीरसागर म्हणाले की, ग्रामविकासाचा पाया असलेले व शासनाच्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी करणारे चाकण प्रमाणेच अनेक ग्रामपंचायत कर्मचारी अजूनही वेतश्रेणी व निवृत्तिवेतनाच्या प्रतीक्षेत असून, त्यांना न्यास मिळावा म्हणून या पुढे लढा दिला जाणार आहे.
गावची स्वच्छता, पाणीपुरवठा, करवसुली, दिवाबत्तीची व्यवस्था आदी कामांची जबाबदारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर असते. सणासुदीच्या काळातही कामापासून त्याची सुटका नसते. गावातील नागरिक सण समारंभ किंवा उत्सव साजरा करताना दुसरीकडे हे कर्मचारी आपली जबाबदारी सांभाळत असतात. त्यांना तुटपुंज्या वेतनावर आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो हि बाब खेदजनक असून त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी लढा उभारला जाईल. या वेळी कामगार सभेच्या अध्यक्षा शांता धोत्रे ,उपाध्यक्षा विजयमाला साळवे, खजिनदार फकीरा धनवटे ,संगीता घोगरे, राहुल गोरे, शंकर बिसनारे आदींसह चाकण ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगार, पुरुष सफाई कामगार , पाणीपुरवठा कामगार,मोठ्या संखेने उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या -
. कर्मचारी वेतनश्रेणीचा धोरणात्मक निर्णय घ्यावा.
. अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.
. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा चतुर्थ श्रेणीत समावेश करावा.
. पेंशन योजना लागू करावी.
. सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळावी.
. भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्वरित भरावी.
. पगार वेळेवर व्हावा.
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा