उत्तर पुणे जिल्ह्यात रक्तचंदनाचा मोठा साठा



उत्तर पुणे जिल्ह्यात रक्तचंदनाचा मोठा साठा 
उपसरपंचांसह अन्य तिघांवर गुन्हे; सर्व जन फरार 

चाकण : अविनाश दुधवडे 

 चाकण जवळ वाकी बुद्रुक (ता.खेड) येथे निर्यातबंदी असलेल्या व शासनाने संरक्षित केलेल्या रक्तचंदनाचा विक्री करण्यासाठी अवैध साठा केल्याप्रकरणी वाकीच्या उपसरपंचासह चौघांवर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील सर्वच जन फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
 चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रमेश गबाजी नाळे यांनी या बाबत दिलेल्या फिर्यादी वरून  वाकीचे उपसरपंच दतात्रेय संतू टोपे , कैलास गेनभाऊ टोपे ,रामभाऊ नारायण टोपे (सर्व रा.वाकी,ता. खेड,जि. पुणे ) व भारत प्रकाश काणे (रा.नेरूळ नवीमुंबई ) अशा चौघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आंध्रप्रादेशातून चाकण भागात आलेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेले सत्तावीस टन वजनाचा व अडीच कोटी रुपये किंमतीचा शासनाने संरक्षित केलेला निर्यातबंदी असलेल्या रक्तचंदनाचा अवैध साठा चाकण पोलिसांच्या पथकाने वाकी बुद्रुक (ता.खेड)येथून आज (दि.25) शिताफीने हस्तगत केला होता .
  या भागात चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार चाकण पोलिसांच्या पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी भारत पाटील व चाकणचे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मधुकर थोरात,एस.पी.येडे, राजू पवार ,रमेश नाळे ,नंदकुमार चव्हाण,अनिल जगताप,संतोष मोरे,संजय नाडेकर, नवनाथ सरमाने यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.25)  दुपारी एक वाजनेचे सुमारास या गोदामावर छापा मारला असता हा रक्त चंदनाचा साठा मिळून आला होता . औषध निर्मितीसाठी उपयोगात येणाऱ्या या चंदनाच्या निर्यातीवर बंदी असून शासनाने हे चंदन संरक्षित केलेले आहे . आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या चंदनाचे अडीच कोटी रुपयांहून अधिक मूल्य आहे .  याप्रकरणी वनविभागाचे अधिकारी व चाकण पोलिसांकडून तपास सुरु असून  भारतीय वन अधीनियम 1927 कलम 41 व 42 नुसार त्याचप्रमाणे मुंबई वन अधिनियम  1942 अन्वये विना परवाना वाहतूक ,बेकायदा साठा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व रक्तचंदनाची लाकडे सुमारे सत्तावीस टन व साडेसतराशे घनमीटर असून  त्याचे शासकीय मूल्य 1 कोटी 75 लाख 79 हजार रुपये असल्याचे चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशील कदम , उपनिरीक्षक एस.पी. येडे व वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

एकाच दिवसात दोन गोदामांवर छापे :
चाकण पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार त्यांनी वाकीचे सरपंच दतात्रेय टोपे व कैलास टोपे यांच्या मालकीच्या भारत काणे यांस भाड्याने दिलेल्या गोदामावर छापा मारला,  तेथे मोठा रक्तचंदनाचा साठा हस्तगत करण्यात आला. या चंदनाचा पंचनामा सुरु असतानाच या गोदामा जवळच असलेल्या आणखी एका गोदामात रक्तचंदनाचा साठा असल्याची खबर तपासात पोलिसांना मिळाली आणि तेथेही छापा मारला असता पहिल्या गोदामा एवढाच रक्तचंदनाचा साठा रामभाऊ टोपे यांच्या मालकीच्या दुसऱ्या गोदामात मिळून आला. त्यांनी हे गोदाम पुण्यातील एका व्यापाऱ्यास भाड्याने दिल्याचे समजते . त्यामुळे  मागे असलेल्या व्यापाऱ्यांची पाळेमुळे खोद्ण्याची गरज निर्माण झाली आहे. या चंदनाचे उत्पादन केवळ आंध्र प्रदेशात होत असल्याने हे सर्व चंदन आंध्रातून आल्याचे स्पष्ट झाले आहे.निर्यात बंदी असलेल्या या चंदनाला परदेशात मोठी मागणी असून आंतरराष्ट्रीय पातळीवर या चंदनाला मोठी किमत मोजली जाते.चंदन तस्करीच्या या गोरख धंद्यात या भागातील आणखी काही व्यापारी मंडळी गोदामांचे मालक गुंतले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तालुक्यातील चंदनाचे साठे व तस्करांच्या टोळ्यापर्यंत पोहोचण्याचे दिव्य वनविभाग व पोलिसांना पार करावे लागणार आहे.

---------------------------------
                                                                                              Avinash Dudhawade,chakan  9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)