छुप्या खाजगी सावकारांचा पाश आवळ्तोय ...


                                                                     
                                                                     
                                                                     
                                             
छुप्या खाजगी सावकारांचा पाश आवळ्तोय ... 
चाकण:अविनाश दुधवडे 
वर्तमानातील गरज भागवण्यासाठी माणूस सावकाराच्या उंब-यावर जातो त्याक्षणी तरी गरज भागते मात्र भविष्यात अनेक गरजाचे धन सावकाराच्या घशात जाऊ लागल्यानंतर
माणूस भिकेकंगाल झाल्याशिवाय रहात नाही.याचा प्रत्यय आता चाकण सह खेड तालुक्यातल्या अनेकांना येत असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.

 शासनाच्या विविध विकास प्रकल्पांमुळे चाकण सह खेड तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर झळकत असल्याचे अभिमानाने सांगण्यात येत असले तरीही येथे छुपी खाजगी सावकारी 
मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे.हि खाजगी सावकारी एवढी वाढली आहे की, प्रशासनाने या समस्येकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.खेड तालुक्यातील 
एका शेतकऱ्याला 75 हजार रुपये दिल्यानंतर त्याची जमीन हडपण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.संबंधित शेतकऱ्याने 
यातील निम्मी रक्कम परत केली असली तरी त्यातील बहुतांश रक्कम व्याजाच्या पोटीच लाटण्यात आली असून पुन्हा सगळे पैसे दे किंवा शेत जमीनीचा व्यवहार कर अन्यथा चाकण मधील गुंडांकरवी तुला 
पाहून घेतो अशा धमक्या दिल्या जात असल्याची विदारक स्थिती समोर आली आहे.असे प्रकार सर्रास सुरु असून दांडगाईने सुरु असलेल्या या प्रकारांबाबत प्रशासनाने वेळीच 
हस्तक्षेप करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सावकारी पाश ही अनेकांसाठी आयुष्यातील सर्वांत मोठी चुक ठरत असल्याचे सर्वश्रुत आहेच .अनेकांचे संसार लयास जात आहेत  तर सावकाराच्या जाचास कंटाळून अनेकांनी 
आत्महत्या केल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत . दारात सावकार आल्यानंतर आत्मभान 
हरपल्यागत संपूर्ण कुटुंब सुन्न होते.पैशासाठी तो काय बोलेल याचा नेम नसतो. तात्पुरती गरज भागवण्यासाठी सावकाराच्या उंब-यावर जातो त्याक्षणी तरी गरज 
भागते मात्र भविष्यात अनेक गरजाचे धन सावकाराच्या घशात जाऊ लागल्यानंतर मानुस भिकेकंगाल झाल्याशिवाय रहात नाही.व्याजाच्या पैशांसाठी डांबून ठेवणे , धमक्या देणे 
स्टॅम्पवर  मजकुर लिहून त्यावर सही करण्यास भाग पाडणे असे चित्रपटांना शोभणारे किळसवाणे प्रकार घडत असून खाजगी सावकारांची दहशत ,लागेबांधे आणि स्वतःच्या 
बदनामीच्या भीतीने अनेक जण हे प्रकार निमुटपणे सहन करीत असल्याची स्थिती समोर येत आहे. 
 बँकांकडून वेळेवर आर्थिक मदत मिळाली नाही तर शेतकऱ्याला त्यांच्या कुटुंबियांना खाजगी सावकारीचा आधार घ्यावा लागतो. पिक पिकले नाही, भाव मिळाला नाही,
अवकाळी संकट आले तर त्याला सावकाराचे कर्ज फेडणे अवघड होते आणि मग हाच शेतकरी आत्महत्येचा पर्याय स्वीकारतो.
सावकारी पाशाने आजवर हजारो जणांना बेजार केले आहे . खेड तालुका देखील  याला अपवाद नसल्याची स्थिती समोर आली आहे. 

म्हणून खाजगी कर्जांकडे कल :
  खाजगी कर्ज हे एखादी व्यक्ती, खाजगी बँक आणि खाजगी कंपनी (आस्थापन) उपलब्ध करून देते. व्यक्ती सरकारी बँकाच्या कागदपत्राची पूर्तता करू शकत नाही आणि
किचकट प्रक्रियांमधून जाण्याचा लोकांना कंटाळा येतो. अशा स्थितीत व्यक्ती ही खाजगी कर्जाकडे वळते.
खाजगी कर्जाचे व्याज हे प्रमाणापेक्षा जास्त असते. कर्जाच्या रकमेपेक्षा व्याजाची रक्कम ही कधी कधी दुप्पट असते. नियम आणि अटी यांचे काटेकोर पालन करावे लागते.
ठरलेल्या वेळेत कर्जाचा हफ्ता भरावा लागतो. हफ्ता भरण्यास उशीर झाला तर कंपनी दंड आकारते. हफ्त्याच्या दंडाची रक्कम जास्त असते.यामुळे खाजगी कर्जाची वाट
शक्यतो पकडू नये असे जाणकार मंडळींकडून सांगण्यात येते .
  खाजगी कर्ज देताना काही मालमत्ता, दागिने, पॉलिसी अशी अनेक कागदपत्रे गहाण ठेवावी लागतात. अशिक्षित आणि गरीब लोकांना सावकारी व्यक्ती पाहिजे तेवढी रक्कम 
देऊन कोऱ्या स्टँप पेपरवर सही घेतात. पैशाची गरज असल्यामुळे ते सही करतात. सावकारी व्यक्ती आपल्याला हवे ते स्टँप पेपरवर लिहितात, कर्ज फेडले तरीही खोटी नोंद
करून व्याज वाढवतात आणि फसवतात. 
अशी दांडगाई सर्वच क्षेत्रात दिसून येते . अगदी खाजगी बँक आणि कंपनी यांची कर्जाची परतफेड झाली नाही तर ते फोन करून त्रास देतात. घरी गुंड पाठवून धमक्या
देण्याच्या घटना फार मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.
त्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास स्वत: सोबत कुटुंबालाही भोगावा लागतो. ज्या गोष्टीसाठी आपण कर्ज घेतले आहे त्याची परत फेड केली नाही तर तारण किंवा गहाण
ठेवलेली वस्तू (घर, दुचाकी वाहन, चारचाकी वाहन) बँक कंपनी जप्त करते. खाजगी कर्ज घेणे हे प्रसंगी धोकादायक ठरू शकते. म्हणून सुरुवातीला थोडा त्रास झाला 
तरी सरकारी कर्ज घ्यावे. एखादी नैसर्गिक आपत्ती किंवा संकट आले असता ते कर्ज माफ होते याचा अनुभव अनेकांनी घेतला आहेच . खाजगी कर्जाचे धोके प्रसंगावधान 
बघून ओळखले पाहिजेत अशी स्थिती निर्माण झाली आहे.
------------------------
------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)