चाकणच्या पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा अखेर खंडित
सोळा लाखांचा धनादेश दिल्याने काही दिवसांची मुभा
चाकण:अविनाश दुधवडे
गावपातळीवर पाणीपुरवठा करणाऱ्या नळयोजनांकडे कोट्यावधी रुपयांची वीजबिलांची थकबाकी बाबत वीज वितरण कंपनीने कठोर भूमिका घेतली असून याचा सगळ्यात
पहिला झटका चाकण च्या पाणीपुरवठा योजनेला बसला आहे. तब्बल 67 लाख रुपये थकबाकी पोटी सोळा लाख रुपये तरी भरा म्हणून गेले काही दिवस तगादा लावणाऱ्या वीज वितरणने आज (दि.24)दुपारी चाकण च्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखत चाकण ग्रामपंचायतीच्या कारभार्यांनी ग्रामपंचायतीच्या तोजोरीतील शिलकीचा अंदाज न घेताच सोळा लाखांचा धनादेश वीज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करीत आडात नसतानाच पोहऱ्या सोडला आहे.खंडित वीज पुरवठ्याने पाणी पुरवठा विस्कळीत होऊन नागरिकांच्या संतापाचा सामना
करावा लागू नये म्हणून हा खंडित झालेला वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत सरपंच ,उपसरपंच व सदस्य प्रयत्न करीत होते.
ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा करण्यासाठी "पेयजल',"जलस्वराज' यांसह इतर योजनांतून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना केल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत त्यावर
कोट्यवधींचा निधी खर्च झाला आहे. या योजनेचे काम करण्यापासून देखभाल, सुरळीत पाणीपुरवठा करणे, पाणीपट्टी वसूल करून वीजबिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायत,
स्थानिक पाणीपुरवठा समितीकडे असते. मात्र, योजना झाल्यानंतर वीजबिले भरण्याबाबत दक्षता घेतली जात नाही. जिल्ह्यातील अनेक स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांकडे कोट्यावधींची थकबाकी असल्याचे वीज वितरणचे अधिकारी सांगतात. योजना पूर्ण झाल्यावर ती ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिल्यानंतर पाणीपुरवठा
विभागाचा या योजनांशी सबंध रहात नाही. चाकण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाकी केटी बंधाऱ्यावरील योजनेचीही अशीच अवस्था आहे. वाकी केटी बंधाऱ्यावरील आणि
एकता नगर जवळील जलशुद्धीकरण प्रकल्प या दोन वीज जोडांची थकबाकी 95 लाखांच्या पुढे गेली आहे. या बाबत वीज वितरणच्या अधिकार्यांनी चाकण ग्रामपंचायत प्रशासनाकडे वीज बिल देयकाबाबत तगादा लावला होता. वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला होता . मात्र चाकण ग्रामपंचायतीची अवस्था 'आडातच नाही तर ,पोहऱ्यात कुठून ' अशी झाली होती.त्यामुळे हे थकीत देयक ग्रामपंचायत अदा करू शकली नव्हती.अखेर आज दुपारी बारा वाजनेचे सुमारास वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी हा वीज पुरवठा खंडित करीत ग्रामपंचायतीच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रयत्न केला. तदनंतर चाकण चे सरपंच काळूराम गोरे,उपसरपंच साजिद सिकीलकर,ग्रामविस्तार अधिकारी दयानंद कोळी,सदस्य सुधीर वाघ,अमोल घोगरे,दतात्रेय बिरदवडे,दत्तात्रय जाधव,सुनील शेवकरी,आदींनी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता एच.ए.पिसे यांना16 लाखांचा धनादेश देवून वीज पुरवठा पूर्ववत करण्याची विनंती केली.या बाबत पिसे यांनी सांगितले की,वरिष्ठ (सर्कल)कार्यालयातून थकबाकीच्या पार्श्वभूमीवर वीज जोड तोडण्याच्या स्पष्ट सूचना मिळाल्या होत्या त्यानुसार हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून ग्रामपंचायतीने दिलेला धनादेश वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला आहे त्याची रिसीट प्राप्त झाल्यानंतरच
वीज पुरवठा रात्री उशिरा पूर्ववत करता येणार आहे.यासंदर्भात सरपंच गोरे व उपसरपंच सिकीलकर यांनी सांगितले की,वीज वितरणची कार्यालये व ग्रामपंचायत हद्दीतील विजेचे खांब यांचे थकीत सुमारे पन्नास लाखांचे भाडे वीज वितरण कडे थकीत आहे.वीज वितरण कंपनीची वीज बिल देयके थकली असली ती थकबाकी 1995 साला पासूनची आहे,तेंव्हा पासून 2010पर्यंत एक ते सव्वा कोटी रुपये वीज वितरणला देण्यात आले असून मागील अवघ्या दोन वर्षात 97 लाख रुपये अदा करण्यात आले आहेत.त्याबाबत कुठलीही शहानिशा न करता पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्याचा वीज वितरणचा प्रयत्न दुर्दैवी आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून थकीत वीजबिलामुळे वीज पुरवठा काही दिवस खंडित राहिल्यास आधीच पाण्याच्या मुद्द्यावर मेटाकुटीला आलेल्या चाकणकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती आहे.
असा वाटणार धनादेश :
सध्या ग्रामपंचायतीकडे वीज बिलाचे देयक देण्यासाठी दोन अडीच लाखांची शिल्लक आहे.मात्र 16लाखांचा धनादेश दिल्या शिवाय वीज पुरवठा सुरूच होणार नसल्याचे वीज वितरण कडून स्पष्ट करण्यात आल्याने पुढील दोनचार दिवस तात्पुरता प्रश्न सोडवीण्यासाठी हा धनादेश देण्यात आला आहे.पुढील दोन तीन दिवस आलेल्या सलग सुट्ट्यांच्या कालावधीत ग्रामपंचायतीची काही वसुली करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून तेवढी रक्कम पुढील दोनचार दिवसांत बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सरपंच काळूराम गोरे उपसरपंच साजिद सिकीलकर सदस्य सुधीर वाघ ,अमोल घोगरे,यांनी सांगितले असले असून त्यात दुर्दैवाने यश न आल्यास पाणी पुरवठा विस्कळीत
होऊन बंधाऱ्यात पाणी आणि घरात खडखडाट अशी चाकणकरांची अवस्था होणार आहे.
----------- Avinash Dudhawade,chakan 9922457475
-----------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा