चाकणच्या बंधाऱ्याला गळती;हजारो लिटर्स पाणी जातेय वाया
चाकण:अविनाश दुधवडे
चाकणला पाणी पुरवठा करणाऱ्या वाकी के.टी.बंधाऱ्याची दुरवस्था झाली असून हजारो लिटर्स पिण्याचे पाणी बंधाऱ्याच्या फळ्यांच्या लिकेज मुळे वाया जात आहे. या बंधाऱ्याची देखभाल करण्याचं काम चाकण ग्रामपंचायती कडे आहे. पण आर्थिक चणचणी मुळे याचे कामकाज पूर्णपणे ढेपाळल्याचा अनुभव सध्या चाकण परिसरातील नागरिक घेत आहेत.
चाकण शहराला पाणीपुरवठा व्हावा यासाठी वाकी येथे भामा नदीवर हा वाकी के. टी.बांधला करण्यात आला आहे. यामध्ये लाखो दशलक्ष घनफूट पाणीसाचण्याची क्षमता आहे. या पाण्याचा चाकण परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी वापर होतो. पण सध्या या बंधाऱ्यात घातलेल्या फळ्यांमधून पाण्याची गळती होत आहे. फळ्या घातल्यानंतर त्यातून पाण्याची गळती होऊ नये म्हणून त्यात रबरी पॅकिंग घातले जातात. पण त्याचा वापरच केला नसल्याने बारा महिन्यांपर्यंत वापरासाठी बंधाऱ्यात साठवलेलं पाणी लवकरच आटण्याची शक्यता आहे.सुमारे वीस वर्षांपूर्वीच्या या लोखंडी फळ्यांच्या
देखभाल आणि दुरुस्ती कडे गेल्या दोन वर्षांपासून लक्ष देण्यात आलेलेच नाही .या लोखंडी फळ्या अक्षरशः सडल्या असून त्यांना मोठमोठी भोके पडली आहेत.त्यातून सातत्याने पाणी गळती सुरु आहे.
या वाकी के. टी. बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी अडवल्यास त्याचा चाकण परिसरातील लाखभर नागरिकांना पिण्यासाठी आणि वापरासाठी लाभ होतो. पण बंधाऱ्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप इथले नागरिक करू लागले आहेत. विशेष म्हणजे जलवाहिन्या -बंधाऱ्याच्या दुरुस्तीपोटी लाखो रुपयांचा खर्च केला जात असताना ही स्थिती असल्याने तो खर्च निष्फळ ठरल्याचं नागरीकांच म्हणणं आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनास विचारले असता बंधाऱ्याची दुरुस्ती कडे लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
----- Avinash Dudhawade chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा