चाकण पोलिसांनी आवळल्या रोड रोमिओंच्या मुसक्या




                                                                     
                                                                     
                                                                     
                                             
चाकण पोलिसांनी आवळल्या रोड रोमिओंच्या मुसक्या 
महाविद्यालयांच्या परिसरात धरपकड 
रोड रोमिओंना बसला वचक

चाकण:अविनाश दुधवडे 

रस्त्याने चालताना एखाद्या शाळकरी - महाविद्यालयीन विद्यार्थिनीला कुणा तरुणाचा धक्का लागला... चौकातील टोळक्याने एखाद्या मुलीकडे पाहून कमेण्ट केली, तरी काय करणार ? टारगट मुले असतील ... शाळा कॉलेज मधून घरी निघालेल्या मुलीकडे पाहून कमेण्ट केली, तर तेही नेहमीचेच... अशी विद्यार्थिनी - तरुणींची झालेली मानसिकता .. त्याविरोधात वृत्तपत्रे वगळता क्वचितच उठविला गेलेला आवाज...  कदाचित त्यामुळेच राजरोस धिंगाणा घालत दुचाक्या - चारचाक्या घेवून फिरणारे रोडरोमिओ ...
अशी अवस्था  शाळा महाविद्यालयांच्या आवारात चाकण परिसरात पहावयास मिळत होती. मात्र अशा घटना वारंवार चव्हाट्यावर आल्याने खडबडून जागे झालेल्या चाकण पोलिसांनी अखेर आज (दि.28)  रोड रोमिओंच्या मुसक्या आवळण्यासाठी उशीरा का होईना कठोर उपाययोजना करीत अनेकांना पोलिसी खाक्या दाखविला.

 महाविद्यालयीन विद्यार्थिनी ,युवतींच्या छेडछाडीच्या तक्रारी पालकांकडून खाजगीत वारंवार होत होत्या. मात्र याबाबत बदनामी आणि आणखी त्रास होऊ नये यामुळे पोलिसांत रीतसर तक्रार करणाऱ्यांचे प्रमाण तसे नगण्य होते. मात्र वर्तमान पत्रांमधून हि बाब वारंवार चव्हाट्यावर येत होती. याच पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांनी आज (दि.28)  रोड रोमिओंच्या मुसक्या आवळण्यासाठी धडक कारवाई करीत अनेकांना काठ्यांचा प्रसाद देत ,अवघ्या तासाभरात 4 हजार 100 रुपयांची दंडात्मक कारवाई केली . 
 चाकण शहरातील शाळा तसेच महाविद्यालय परिसरातही 'रोड रोमिओं'चा वावर गेल्या काही काळात मोठय़ा प्रमाणात वाढला होता . तरुणींच्या छेडछाडीचे प्रकारही वाढल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या. महिला, मुलींच्या छेडछाडीच्या या वाढत्या घटनांची दखल येथील पोलीस प्रशासनाने घेतली असून 'रोड रोमिओच्या मुसक्या आवळण्यासाठी खास पथक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महिला, महाविद्यालयीन तरुणींचा जास्त वावर असणाऱ्या भागातही महिला पोलिसांचा जागता पहारा ठेवता येईल का, याची चाचपणीही पोलिसांनी सुरू केली आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात चाकण पोलिसांच्या संतोष मोरे ,संदीप जगदाळे,नितीन बनकर,अमोल चासकर,सचिन जतकर ,महेंद्र चांदणे आदींच्या पथकामार्फत लक्ष ठेवण्याच्या सूचनाही पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी दिल्या आहेत. आज  (दि.28) सकाळी साडेअकरा वाजनेचे सुमारास चाकण पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी येथील शिवाजी विद्यालयाच्या समोरील भागात रस्त्याच्या दुतर्फा सापळा लावला व भर रस्त्यात वेगाने दुचाक्या दामटणाऱ्या छेड काढणा-या रोड रोमिओंना शिताफीने अडवून प्रसंगी पाठलाग करून पकडून कारवाईच्या कात्रीत आणले. या सर्वांकडून दंड वसूल करण्यात आला .तर काहीना पोलिसांच्या काठ्यांचा प्रसाद ही मिळाला. शाळा- महाविद्यालये भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी आवर्जून येथे घिरट्या घालणारे अनेक रोड रोमिओ पोलिसांच्या या धडक कारवाईने  याभागात फिरकलेच नाहीत.  रोड रोमिओंना वचक बसावा यासाठी पोलिसांनी केलेल्या आजच्या धडक कारवाईचे चाकण परिसरातील विद्यार्थिनी ,विद्यार्थ्यांचे पालक, नागरिक तसेच चाकण परिसरातील कार्यकर्ते रामदास जाधव, अतिश मांजरे , प्रवीण खळदकर , नितीन जगताप, संतोष खराबी आदी अनेक नागरिकांनी स्वागत केले आहे. अशी कारवाई चाकण भागात सातत्याने सुरु राहणार असल्याचे वाहतूक विभागाचे प्रमुख संतोष मोरे यांनी सांगितले. 

रोड रोमिओंना शिक्षा किती?
छेडछाड झाल्याची तक्रार झाल्यास संबंधित व्यक्तींवर कलम 354 अंतर्गत कारवाई होऊ शकते. कमाल दोन वर्षांची कैद किंवा दंड किंवा दोन्ही असे या कलमांतर्गत अंतर्भूत असलेल्या शिक्षेचे स्वरूप आहे. हा गुन्हा जामीनपात्र असला तरी कोर्टाच्या खेपा घालायला लावणारा आहे .
---------------                         Avinash Dudhawade,chakan 9922457475



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)