टोमॅटो,कोबी,वांगी,पालक,आदी भाज्यांचे भाव गडगडले
टोमॅटो,कोबी,वांगी,पालक,आदी भाज्यांचे भाव गडगडले
सणामुळे व्यापाऱ्यांची बाजाराकडे पाठ ; मालाला उठावच नाही
भाज्या फेकून देण्याची वेळ
बाजार समितीच्या आवारात आवक झालेल्या फळभाज्या व पालेभाज्यांचा उत्पादन खर्चही भरून येवू न शकल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावरच टोमॅटो,वांगी व भाज्या फेकून दिल्या होत्या. (छाया:अविनाश दुधवडे,चाकण) |
चाकण:वार्ताहर
मागील पंधरवड्यात भाज्यांचे भाव गगणाला भिडलेले असताना भाजीपाला खरेदी करणे म्हणजे सर्व सामान्यांची कसोटी लागत होती. मात्र आज (दि.२३) अचानक आवक वाढल्याने व दोन दिवसांपासून सणामुळे बाजारात व्यापारी वर्गाने बाजाराकडे पाठ फिरवल्याने शेती मालाला उठावच मिळाला नाही, आणि टोमॅटो,कोबी , वांगी ,पालक ,आदी भाज्यांचे भाव अचानक गडगडले. टोमॅटो,कोबी यांची एक रुपया किलो प्रमाणेही विक्री होत नव्हती . भोपळा,वांगी, आदी फळभाज्यांची अवस्थाही अशीच झाली. काढणी खर्चदेखील वसूल होत नसल्याचे पाहून चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात शेतकऱ्यांवर पालेभाज्यांच्या हजारो जुड्या व टोमॅटो भोपळा ,वांगी रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती .
दिवाळी सणामुळे व्यापाऱ्यांनीही बाजाराकडे पाठ फिरविली व मालालाही उठाव नसल्याची खंत उत्पादक व विक्रेत्यांनीही व्यक्त केली. यामुळे चाकणच्या किरकोळ बाजारातही भाज्यांचे भाव मागील आठवड्यापेक्षा अचानाक कोसळले . दोन दिवसांपासून उठाव नसल्याने नाशवंत शेतीमाल खराब होऊ लागला होता. यात सर्व सामान्य तात्पुरता सुखावला असला तरी शेतक-यांच्या कपाळावर मात्र चिंतेचे सावट ऐन दिवाळीच्या सणात पसरले आहे. तीन चार दिवसांपासूनचे ढगाळ हवामान व अचानक येणाऱ्या पावसाचा तडाखा यामुळेही खेड तालुक्याच्या विविध परिसरातून आणि उत्तर पुणे जिल्ह्यातून बाजार समितीत पालेभाज्या व फळभाज्यांची प्रचंड आवक झाली. यामुळे तरकारी बाजारात भाज्यांचे भाव कोसळले. सणाच्या पार्श्वभूमीवर भाज्या एक रुपया किलोने विक्री करूनही खरेदीदार नव्हते. बाजार समितीत दोन दिवसांपासून पालेभाज्यांना उठाव नसल्याने , खराब होऊ लागलेला शेतीमाल जागेवरच सोडून दिल्याचे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. या बाबत चाकण आडते असोसिएशनचे अध्यक्ष राम गोरे , कुमार गोरे यांनी सांगितले कि, शेतकऱ्यांना भाजीपाल्याची बेभाव विक्री करावी लागत असून, अनेक शेतकरी टोमॅटो,कोबी , वांगी ,पालक , आदी भाज्यांचे ढिगारे रस्त्यावरच सोडून निघून जात आहेत. चारच दिवसांपूर्वी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील उपबाजारात टोमॅटोच्या ६२० पेट्यांची आवक होऊन १५० ते २०० रुपये असा प्रती दहा किलोंसाठी भाव मिळत होता. गेल्या दोन दिवसांपासून सणामुळे भाज्यांवर संक्रांत आली असून बेभावाने भाजीपाला विक्री करुन उत्पादन खर्चच वसूल होत नसल्याने शेतकरी बाजरात आणलेला शेतीमाल जागेवरच सोडून जात आहेत. बाजार समितीचे सचिव सतीश चांभारे यांनी सांगितले कि, शेतीमालाला उठाव नसल्याने हि स्थिती निर्माण झाली असून सणामुळे व्यापारी बाजाराकडे पाठ फिरवीत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून हि अवस्था निर्माण झाली आहे.
---------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा